सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Wednesday, 10 May 2017

हा रस्ता सरळ आहे

हा रस्ता सरळ आहे
फक्त...
वळण आलं की वळायचं....!

कुणासाठी कमान आहे
कुणासाठी तोरण
कुणासाठी कुरण तर
कुणासाठी धोरण
कुठे आहे पाऊलवाट,
कुठे दुर्गम घाट
कुठे किर्र जंगल तर
कुठे सागरकाठ
मिळेल ते फळ चाखतमाखत
सावध पाऊल टाकत चालत
निर्धार करून पळायचं...
हा रस्ता सरळ आहे
फक्त... वळण आलं की वळायचं...!

इथले फिरस्थ ऋतू आहेत
सतत आपल्या सोबत
खेळण्यामधल्या भोव-यासारखी
त्यांची-आपली गत
कुठे कळ्या, कुठे फुले
कुठे विकृत कचरा
कुठे सण-उत्सव, कुठे
तमासगीर..... जत्रा
आली तरी येऊ द्यावी
कधी आपली छाती वर
पंख फुटले तरी आपण
चालत जावे मातीवर
झाडे, वेली, शेती, तळे
प्राणी, पक्षी, मोकळी हवा
दिवसभर तेजस सूर्य
रात्री चांदण्यांचा थवा
आहेत थोडे काटेकुटे
हिरव्या पाऊलवाटेवर
थकल्यावरती आहेच इथे
बिनछपराचं मोहक घर
मुक्काम करून ओव्या गात
दुखणं आपलं दळायचं....
हा रस्ता सरळ आहे
फक्त..... वळण आलं की वळायचं...!

इथे आहेत भ्रमविभ्रम
इथे आहेत सापळे
अडथळ्याची शर्यत अन्
कडूगोड फळे
जिंकत हारत यायचंच आहे
पुन्हा याच रस्त्यावर
कारण काळ नसतो कधी
सारखा एकाच था-यावर
उंच पर्वत चढल्यावरही
शेवटी एक घसरण आहे
रस्ता कधीच संपत नाही
मात्र अटळ वळण आहे
तेंव्हा काही मुक्काम सहज
स्मृती बनून दिठीत येतात
सांत्वनाचे कोरडे ढग
दुष्काळाच्या भेटीस येतात
अशावेळी थांबा घेऊन
विश्वासाने नि:श्वास सोडत
मुद्दामच अडखळायचं....
डोळ्यांमध्ये पाणी ठेऊन
हसत हसत जळायचं.....
हा रस्ता सरळ आहे..
फक्त... वळण आलं की वळायचं ......!!!

~ राजीव मासरूळकर
   दि.14/9/2014

No comments:

Post a Comment