सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Wednesday, 10 May 2017

एक निनावी कविता

सोडून द्यायचीय मलाही whatsapp वर
माझीच एक कविता निनावी....

सोडून द्यायचीय मलाही whatsapp वर
माझीच एक कविता निनावी
जोडून तिला एक वेधक शिर्षफलक
कि
"फारच सुंदर कविता आहे ही.
कुणाची आहे माहित नाही.
पण एकदा अवश्य वाचा,
अन् आवडली तर अवश्य share करा... "
असं इंग्रजीत वगैरे टायपून....

कविता असेल इतकी साधीभोळी
कि
कवितेची अॅलर्जी असलेल्यांनीही
ती वाचावी अगदी मन लावून....

कवितेत पाळलेलं नसेल कुठलंच काव्यमुल्य
सोडलेला नसेल मी ही
माझ्या काव्यशैलीचा कुठलाच ठसा बेमालुमपणे...
नसेल कुठलंच आडवळण,
कोणताच आडपडदा वगैरे...
असेल सगळं सरळ.... सहज.... सुंदर....

कवितेत पेरलेली असेल अलगद
एखादी आल्हाददायक प्रेमधून
पावसात भिजलेल्या प्रेयसीच्या ओठांतून
स्वप्नवत निघालेली....
ओतलेला असेल ऋतुगंध
ज्या त्या हंगामाप्रमाणे...
शब्दबद्ध केलेला असेल प्रत्येक सण,
त्याची समकालाशी विसंगत पुराणकथा वगैरेे,
मिसळलेल्या असतील रितीभाती, फराळ, मेनु, इत्यादी
हातोहात......

रंगविला असेल आतोनात वर्तमान
राजकारणाला मारली असेल
वर्मावर घाव घालणारी कोपरखळी,
काढला असेल शब्दांचाच मूकमोर्चा,
मनात काहीही असलं तरी
हासडलेली असेल एखाददुसरी अर्वाच्य शिवी
बलात्का-यांच्या नावानं....
हतबल शेतक-यांच्या समस्यांना दिलेला असेल गळफास....
रंगविलेली असेल
रंगेल रगेल दुष्काळअवर्षणाची कोरडी कथा,
सीमेवर पराक्रम गाजवणा-या सैन्यासाठी
नोंदविलेला असेल कोपरापासून सलाम
अन् शहिदांसाठी ढाळलेले असतील दोनचार शब्दाश्रू......
अभिव्यक्त झालेली असेल
शत्रूराष्ट्राविषयी जिवंत ज्वालामुखीइतकी तिव्र खदखद....

कविता असेल अघळपघळ
यमकांची सोसलेली असेल तीने झळ
ओकलेले असेल नसेल
जातीधर्मांबाबत, शासनप्रशासनाविरूद्ध गरळ
व्यक्त झाली असेल झाडाप्राणीमात्रांविषयी हळहळ
दिवसाढवळ्या घातलं असेल
सुज्ञ वाचकाच्या डोळ्यांत काजळ.....

वाटेल प्रत्येकाला
अरे, ही तर माझीच कविता आहे...
विचारेल कुणीतरी कुणाला
अरे, कित्ती सुंदर आहे ही कविता!
कुणाची आहे....?
करेल कुणीतरी तिला share
खाली अज्ञात, अनामिक वगैरे लिहून
किंवा सहेतुक स्वत:च नाव लिहून
करेल कुणीतरी कुणालातरी impress.....

सोडून द्यायचीय मलाही whatsapp वर
माझीच अशी एक साधीशी कविता
निनावी....
जी होईल share प्रत्येक ग्रुपवर अनेकदा
येईल माझ्याही वैयक्तीक चॅटवर
अथवा मी असलेल्या असंख्य ग्रुप्सवर
माझ्या जवळदूरच्या मित्रमैत्रीणींकडून
"नक्की वाचा'' या खास प्रतिसादासह....
आणि घेता येईल मलाही व्हर्च्युअल आनंद
माझी कविता प्रचंड वाचली जात असल्याचा...... ☺☺

(लोच्याच आहे राव...
 तरीही सुरूवात म्हणून नाव लिहिण्याचा मोह काही सुटत नाही...)

~ राजीव मासरूळकर
   दि.5/11/2016
   सकाळी 10:30 वा
   सावंगी(हर्सुल), औरंगाबाद

No comments:

Post a Comment