सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Wednesday, 10 May 2017

दिवाळी

दिवाळी

दिव्यातील वातीस जाळे दिवाळी
जगाला सुखाचे उमाळे -दिवाळी !

मने काळवंडून जाती धनाने
तनातील काळे उजाळे दिवाळी !

फटाके, फराळे, वसन, रोशनाई
हिशेबी खिसे, ठोकताळे दिवाळी !

कुठे बंगल्यांतून लोळे झळाळे
कुठे झोपडीलाच जाळे दिवाळी !

दहा दिन मजेची सुखाची उबेची
हिवाळ्यातले मग उन्हाळे - दिवाळी!

इथे नांदता शांतता दीपकांची
धरेवर जणू स्वर्ग भाळे :  दिवाळी !

- राजीव मासरूळकर
मासरूळ , बुलडाणा
दि ७.११.१२

��HAPPY DIWALI��

अंधारात खितपत पडलेल्यांना,
त्यांच्यासाठी वातीप्रमाणे जळून
त्यांचेही जगणे प्रकाशमान करणा-यांना,
मनात कुणाकुणाविषयी काळेबेरे असलेल्यांना,
ते दूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असलेल्यांना,
झगमगाटातच सुख मानणा-यांना,
त्यांचा झगमगाट बघण्यातच
आपलीही दिवाळी साजरी झाल्याचे सुख मानणा-यांना.....

बाजारपेठा आतोनात सजवून
ग्राहकांना आकर्षित करणा-या विक्रेत्यांना,
खरेदीची लवंगी लडीसारखी लांबलचक यादी दाखवून
 नव-याच्या छातीत धडकी भरवणा-या बायकांना,
पगारदारांना....
बोनसवर जल्लोष करणारांना,
बिगरबोनस दिवाळखोरी करणारांना,
सीमेवर देशासाठी रात्रंदिन गोळीबाराचीच दिवाळी साजरी करीत
वेळ आलीच तर प्राणांची आहुती देणा-या
राष्ट्राभिमानी जवानांना,
घडणा-या चांगचांगल्या घटनांचे श्रेय स्वत:कडे घेणारांना,
स्वत:च्या यशाचे श्रेय नम्रतेने इतरांना देणारांना,
दुष्काळी स्थितीतही मानधनात, निवृत्तीवेतनात
 दुप्पट वाढ करून घेणा-या आपल्या प्रतिनिधींना,
त्यांच्या नावाने खडे फोडणा-या सुशिक्षित अडाणी नेमस्त मतदारांना.....

बरंवाईट लिहिणा-या सर्व साहित्यिक बंधुभगिनींना,
बरंवाईट छापणा-या सन्माननीय प्रकाशक व पत्रकारांना,
समस्त दिवाळी अंकांना....
त्यात जाहिराती देऊन पृष्ठसंख्या वाढवत
शुभेच्छांद्वारे हातभार लावणा-या हितचिंतकांना....

कर्ज काढून का होई ना
 लेकीबाळींचा माहेरवास सुखाचा करणा-या
समस्त वंदनीय सहनशील शेतक-यांना,
मामाच्या गावी जाऊन
फटाक्यांचा जल्लोष अनुभवण्यासाठी
दिवाळीच्या सुट्ट्यांकडे डोळे लावून बसलेल्या बाळगोपाळांना....

तुम्हा सर्वांना
हा दिपोत्सव शारीरिक, मानसिक, आर्थिक,
नैसर्गिकदृष्ट्या आरोग्यदायी व सुखमय जावो ही सदिच्छा!!!

शुभ दीपावली!!

~राजीव मासरूळकर

No comments:

Post a Comment