सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Wednesday, 10 May 2017

माझी कविता

माझी कविता

मला तोडते मला जोडते माझी कविता
विषात अमृत गोड गोड ते, माझी कविता

नभात दाटुन येता खोटी ढगाळ गर्दी
पाऊसवेड्या सरी सोडते माझी कविता

आयुष्याला चढवळणांचा येतो थकवा
चैतन्याचा झरा फोडते माझी कविता!

नियम, निकष, बेड्यांत भावना व्यक्त न होती
अशात संकेतांस मोडते माझी कविता!

हातावर हळूवार भावना उमलुन येती
तळहातीचे जणू फोड ते.... माझी कविता!

मनावरी अधिराज्य कुणी गाजवले आहे?
मनातला मळ  तरी खोडते माझी कविता!

~ राजीव मासरूळकर
11.4.2012    19:00
Edited 11.4.2017 12:15 pm

तरी तुझी आठवण येते

तरी तुझी आठवण येते

पानगळीनं झुरत जातो
रक्त मातीत जिरत जातं
जंतुंसारख्या वळवळणाऱ्‍या
जाणीवाही मरत जातात

आभाळ पायाखाली दाबून
पृथ्वी डोक्यावरती घेऊन
आयुष्याची नाली चिवडत
पोथीपानं चाळत जातो

व्याघ्रगुहा प्रकाशलेली
वाघ तमी झोपलेला
जंगल जळत असतांनाही
पाणी कुठून गळत नाही

हात नसलेल्यांच्या टोळ्या
असणारांचे हात घेतात
फूल काट्यांच्याच ताब्यात
बाण हृदयात टोचत जातात

अशी आजची मृगतृष्णा
डोकं माझं विकत घेते
तुझ्या स्मृतीस अळ्या पडतात
तरी तुझी आठवण येते

~राजीव मासरूळकर
दि १५.४.१२

स्वाहा

स्वाहा

खोटे खोटे सारे
खरे आहे काय?
मातीचेच पाय
माणसाला

मातीचेच पाय
मनालागी पंख
पोकळचि शंख
श्वासांविण

पोकळचि शंख
आभासी पसारा
सुखदु:ख कारा
जगामाजी

सुखदु:ख कारा
नाती, इतिहास
स्मरणांचा पाश
जीवघेणा

स्मरणांचा पाश
पोटातली गुहा
स्वप्नातच स्वाहा
जीवन हे

~ राजीव मासरूळकर
11/08/2014
रात्री11:30 वा

मी जिथे होतो तिथेही मस्त होतो

जीवनाशी जेवढा मी व्यस्त होतो
तेवढा ठेचाळतो अन् त्रस्त होतो

लागतो काढू कळीची छेड वारा
एक हळवा बाग चिंताग्रस्त होतो

रोज एखादा मनी कल्लोळ उठतो
रोज माझा एक भ्रम उध्वस्त होतो

मोजतो माणूस जेव्हा माणसाला
माणसासाठीच माणुस स्वस्त होतो

का? वया, तू आणले आहेस इथवर
मी जिथे होतो तिथेही मस्त होतो

प्रेम देहावर तिचे निस्सीम असते
देह जळता सावलीचा अस्त होतो

~ राजीव मासरूळकर

कठीण आहे


जगणे कठीण आहे मरणे कठीण आहे
त्याहून फार गझला करणे कठीण आहे

जलथेंब पावसाचे मी ओंजळीत घेतो
तलवार पण विजेची धरणे कठीण आहे

विझल्यावरी निखारे राखेत स्तब्ध होती
तारूण्य संपले की तरणे कठीण आहे

आभाळ चांदण्यांचे आहे किती शहाणे
ते संपले तरीही सरणे कठीण आहे

रक्तात माणसाच्या भरले विकार नाना
वाणीमधून अमृत झरणे कठीण आहे

सानिध्य यातनांचे इतुके मला मिळाले
आता कुण्या तनाला वरणे कठीण आहे

- राजीव मासरूळकर

Monday, 8 May 2017

आत्मगंध

आत्मगंध !

कर्णमधुर शब्द शब्द
वर्ण पर्ण चुंबकीय
भवाशयी पोत तुझा
वक्रोक्ती भ्रुकूटीय

अर्थवलयी खाणाखुणा
नादात्मी तुझी चाल
रशरशीत बांधा अन्
अमृतरसी तुझे गाल

सालंकृत देह तुझा
सुवर्णमयी जणू गेह
वरवरून शांत नितळ
गुढ गहिरा काळडोह

सोड अता खुळी लाज
हुंदळू दे रूपबंध
जाहलो तुझाच आज
दरवळू दे आत्मगंध !

- राजीव मासरूळकर

Tuesday, 2 May 2017

मराठी जाणीवेचा आधुनिक स्वर : कैदखान्याच्या छतावर

*व्यापक जीवनाशय मांडणारा गझलसंग्रह : मराठी जाणीवेचा आधुनिक स्वर: कैदखान्याच्या छतावर*

समकालीन गझललेखनातलं एक वेगळं, अद्भुत प्रकरण म्हणजे सतीश दराडे! अगदी जीव ओतून शेर लिहिणारा, सांगणारा किलर (जीवघेणा) गझलकार! सतीशचा नुकताच प्रकाशित झालेला *कैदखान्याच्या छतावर* हा गझलसंग्रह हाती आला. एका बैठकीत वाचून काढला. मेंदुला झिणझिण्या आल्या. काही वेळानंतर पुन्हापुन्हा वाचला. वाचताना कितीतरी वेळा आपसूक वाह.... आह..... क्या बात है.... असे शब्द निघत राहिले. मन सतीशला कडक सॅल्युट ठोकत राहिलं.

प्रत्येक गझलकाराचा एक स्वभाव असतो, खासियत असते. ती शेराशेरांतून अभिव्यक्त होत असते. सतीशच्या गझलेचं वेगळेपण त्याच्या शेरांतून असंच प्रतिबिंबित झालं आहे. तो म्हणतो,
*कुठल्या परंपरेचा नाही गुलाम मी*
*तू ही कुण्या प्रथेच्या हाती पडू नको*
स्वत:ची स्वतंत्र शैली सतीशने विकसित केली आहे. परंपरेचा दास होऊन घाणा ओढत बसण्यापेक्षा नवतेची स्वतंत्र वाट पकडून इतरांनाही आपली वाट धुंडाळण्याचा मंत्र सतीश देतो आहे.
*एक स्वच्छंदी पिलु माझ्यात आहे*
*ज्यास कुठलाही थवा माहित नाही*
किंवा
*कणा सांगेल तेव्हा मी फणा काढेल स्वच्छंदी*
*मला पुंगीवरी कोण्या नका डोलायला सांगू*
या शेरांतूनही सतीश आपलं वेगळेपण अधोरेखित करतो आहे.

एक उत्कृष्ठ कवीच चांगली गझल लिहू शकतो हे तत्व सर्वमान्य आहेच. सतीश दराडे या विधानाचं समर्पक उदाहरण आहे. शब्दांना, आशयाला हवं तसं, लिलया उद्धृत करण्याची जादू सतीशच्या लेखणीत आहे. कधी आपण एकमेकांशी बोलतो आहोत अशा साध्या शब्दांतून, विधानांतून तर कधी अफाट कल्पनाशक्तीतून सतीशचा शेर सहज साकार होतो आणि थेट काळजात शिरतो.

*तिथे ती ही सुखी आहे, इथे मी ही सुखी आहे*
*असे सांगून देतो मी मला कोणी हटकले तर!*
असे मनाशी सहज संवाद साधणारे असंख्य आल्हाददायक शेर *कैदखान्याच्या छतावर* या गझलसंग्रहात जागोजागी आस्वादायला मिळतात. त्याचबरोबर
*ती मैफिलीत माझ्या बसते अशाप्रकारे*
*तारेवरी विजेच्या पक्षी जसा बसावा*
अशा अद्भुत कल्पनाशक्तीचे दर्शनही वारंवार या गझलसंग्रहातून घडत राहते.

खरं तर सतीश दराडे वास्तववादी कवी गझलकार आहे. तो वायफळ दिवास्वप्नांत सहसा रमत नाही. गझलतंत्रावर त्याची मजबूत पकड आहे. सूचकता, व्यापक जीवनाशय व्यक्त करण्याची क्षमता, वर्तमानावर मर्मभेदी भाष्य करण्याची क्षमता, अल्पाक्षरत्व, सेंद्रीयत्व ही सतीशच्या (कवितेची) शेर - गझलेची वैशिष्ट्ये आहेत. सतीशचे अनेक शेर संवेद्य आहेत, चित्रदर्शी अनुभव देणारे आहेत. प्रसंग हुबेहुब डोळ्यांसमोर साकारणारे आहेत. काही उदाहरणे पाहुयात:

*उपाशी साप सापाला गिळाया चालला होता*
*मला हे दृश्य बघताना स्वत:चे पोट आठवले*
किंवा
*बांधते पट्टी सकाळी बायको बोटास त्या*
*बाटली रात्रीच ज्याने फोडली भिंतीवरी*
किंवा
*मी त्या रस्त्यावर बिडी फुंकतो*
*नीरवता जेथुन खोकत जाते*

तरलता हा सतीशच्या गझलशैलीचा आणखी एक खास पैलू आहे.
*पापण्या आहेत की फुलपाखरे*
*एवढी साशंक फडफड वाटली*
किंवा
*लेकरासारखी चूक भोळी हवी*
*माय देते तसा कोवळा दम हवा*
किंवा
*बाभळीचे फूल कानी घालते*
*वेगळे कसले तिला कुंडल हवे*
किंवा
*अक्षर अक्षर मायेने कुरवाळत बसतो*
*मी तान्ह्या कवितेचे जावळ हुंगत बसतो*
किती ही हळवी तरलता.... व्वाह!

सतीश दराडे हा ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडलेला कवी आहे. परंतु व्यवसायाने शिक्षक असल्याने नागर संस्कृतीचाही त्याला चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे त्याच्या गझलेत शेती आहे, माती आहे, मंदिर आहे, शहर आहे, जातधर्म आहे, प्रेम आहे आणि संघर्षही आहे.

शेतकरी, शेती, पीक, पावसाची अनिश्चितता आणि त्यातून शेतक-याची होणारी दयनीय अवस्था सतीश खालीलप्रमाणे शब्दबद्ध करतो:
*पेरणी नथ विकून केल्यावर*
*पोथ विकली मशागतीसाठी*

*मी पिकांना गायला लावीन भजने*
*वाजवावी फक्त टाळी पावसाने*

*लाळगाळ्या ढगांची अपेक्षा बघा*
*दोनदा दोनदा पेरणी पाहिजे*

*पोरगी उजवायच्या स्वप्नात मी*
*मोजली कणसे कितीवेळा तरी*

*ढग म्हणतो पळवीन तोंडचे पाणी*
*आणि बियाणे म्हणते नाही उगवत*

*दु:ख आताच लावले झोपी*
*गोष्ट सांगून पीकपाण्याची*

*फासास लटकुनी गेला स्वप्नाळ सुगीचा स्वामी*
*जन्माचा सरवा वेचित रानात हिंडते विधवा*

हृदय हेलावून टाकणारी ही उत्कटता सतीशच्या गझलेला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते.

प्रेम आणि शृंगार सतीशने अत्यंत नाजूक हळव्या शब्दांत अभिव्यक्त केला आहे. उदा.
*ती वेलांटीगत लवचिक होते*
*व्याकरण पुढे मग बिघडत जाते*

*श्वास माझे बोलले, वेणी उकल ना*
*केवढी झाली तुझ्या लगबग उशाला*

*कोण ही लाजून माझी ऐकते गाणी*
*होत आहे घोगरा आवाज आयुष्या*

तर कधी थेट सूचक मागणीही आहे:
*दे एकदा मिठी मग देतो विशेषणेही*
*देहास मी तुझ्या का स्पर्शाविना नवाजू*

विरहातही तो प्रेयसीला 'कोवळा दम' देऊन जातो तो असा:
*माझ्या समूळ नोंदी डोळ्यांमधे तुझ्या*
*मी नामशेष होइल इतकी रडू नको*.

वरवर पाहता सतीश डोळस आस्तिक असल्याचे जाणवते. तो म्हणतो,
*देवा सदैव आपण खेळू लपाछपी*
*मी शोधण्यास येतो तू सापडू नको*
आणि विरक्त होण्यात धन्यता मानताना दिसतो:
*जप्तीस काळ येता हासून जप्त हो*
*माझ्यातल्या फकिरा इतका विरक्त हो*

*देहधारी कौतुके खोटी चिते*
*तूच अस्तित्वाहुनी मोठी चिते*
असा भावनाविवश होऊन दार्शनिक शेर मांडत असतानाच सतीश जात, धर्म, देव, कर्मकांडाचे थोतांड यांविरूद्ध आपल्या शेरांतून विद्रोह करतानाही आढळतो. उदा.

*जातीने वरचढ आहे, ना धर्माने धड आहे*
*मी इथल्या मानवतेच्या भाग्याची पडझड आहे*

*मला भिंतीमधे ऐसा रूजू देऊ नको देवा*
*तुझा तडकेल गाभारा ऋतुंनी कान भरले तर*

इथल्या धर्मसंस्थेला सतीश रोखठोक प्रश्न विचारीत आहे, जे वाचकालाही निरूत्तर केल्याशिवाय राहत नाहीत:
*मी रोखठोक माझ्या आत्म्यास प्रश्न केला*
*देहात राहिल्याचा देतो कधी किराया?*

*फक्त ग्रंथातल्या शक्यता दावतो*
*कोण साधू कधी देवता दावतो?*

*महंताच्या उशीखाली दिसे निर्माल्य गज-याचे*
*कुण्या शिष्यास आता चादरी बदलायला सांगू?*

किंवा मग
*भांग प्यालेल्या कवींनी घातले जन्मास ईश्वर*
*जानवे चित्तास माझ्या सांग बांधावे कुणाचे?*

स्वप्न आणि वास्तव यांतील संघर्ष अविरत चालू आहे. चांगुलपणावर वाईट गोष्टी सतत मात करताना आढळून येत आहेत. व्यवस्था समस्येचा समूळ नायनाट न करता वरवर मलमपट्टी करते. माणूस व्यवस्थाशरण होत जातो. या व्यवस्थेवर सतीश आसूड उगारतो...
*फुगतात का भिताडे याचा कयास घ्यावा*
*नुसताच पोपड्यांवर फासू नये गिलावा*

सध्या गावात असो कि शहरात विभक्त कुटुंबपद्धतीचाच बोलबाला आहे. यावर आपले अचूक निरीक्षण नोंदवत सतीशने प्रेमाचा सल्लाही दिला आहे.
*मुद्दाम एक भांडे भांड्यास लागते*
*माझ्या हुशार भावा आता विभक्त हो*
लगेच संघर्ष उद्भवतो. प्रेमावर स्वार्थ हावी होतो. माघार घ्यायला कुणीच तयार होत नाही. कोणत्या क्षणी युद्ध सुरू होईल सांगता येत नाही. सतीश याही परिस्थितीत थेट वै-यांना साद घालतो
*यश उभे राहून दारी रक्त प्याया मागते*
*युद्ध हा पर्याय वै-यांनो पटत नाही मला*
अशी आस्थेनं समजूत घालणारा सतीश मग फार जवळचा वाटू लागतो.  परंतु कुणाच्यातरी आधाराने, छत्रछायेखाली नुसतेच ऐषाराम करणा-यांना तो बेधडक शब्दांत फटकारतोही....
*आयते फळ खायची लागे सवय*
*नेहमी झाडाजवळ राहू नये*

सतीश स्वत: हाडाचा शिक्षक आहे. आजच्या शिक्षण पद्धतीतील समस्या त्याच्या गझलेत प्रतिबिंबीत न झाल्या तर नवलच!  शिक्षणक्षेत्र आज एक प्रयोगभूमी बनून राहिले आहे. शिक्षकांवर व विद्यार्थ्यांवर दररोज नवा प्रयोग करून बघितला जातो आणि निष्कर्ष काय त्याचे अहवालही लगेच मागितले जातात. प्रचंड प्रमाणात माहिती मागवली जाते आणि त्यात शिक्षक व विद्यार्थ्यांचे होणारे मरण कुणाच्या लक्षातही येत नाही. ही परिस्थिती सतीशने चपखल शब्दांत मांडली आहे:

*खोल गेली मुळे किती सांगा*
*रोप उपटून माहिती सांगा*

विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या वाढत्या ओझ्याची समस्या सध्या शिक्षणक्षेत्राला मेटाकुटीला आणते आहे. दप्तराचं व अभ्यासाचं ओझं, पालकांच्या मोठ्या अपेक्षा या ओझ्याखाली बालकांचं निरागस बालपण चिरडलं जात आहे. बालकांची यातून मुक्तता व्हावी असं सतीशला मनोमन वाटतं. म्हणून विद्यार्थ्याच्या मनोगताचा आधार घेऊन तो लिहितो:
*एक विद्यार्थी सरांना बोलला*
*फेकुनी दप्तर शिकावे वाटते*

आजकाल व्रतस्थ शिक्षकतरी कुठे बघायला मिळतात. पगारापुरतं काम करायचं, जास्त हुशारी दाखवायची नाही अशी कातडीबचाऊ वृत्ती वाढत चालली आहे. त्यातूनच मग घोकंपट्टी, कॉपी असे प्रकार वाढून शाळा केवळ बेकारांची फौज तयार करण्याचे कारखाने बनत चालल्या आहेत. पण सतीशमधल्या शिक्षकाला हे मान्य नाही. तो आपल्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना उद्देशून लिहितो:
*घास मिळवायचे धडे देइन*
*घास तोंडात द्यायचो नाही*

सतीशच्या गझलेत अधूनमधून साहित्यिक, मानवी अपप्रवृत्तींचा उपहासही डोकावलेला आहे: उदा.
*लागला आहे रचू तो सूर्यस्तोत्रे*
*ज्यास साधा काजवा माहित नाही*
किंवा
*फाटके आहोत सारे आतुनी*
*फक्त चर्येने सुबक आम्हीतुम्ही*

समकालीन स्वार्थी प्रवृत्तीवर सतीश मार्मिक शब्दांत हल्ला चढवतो:

*वाटली नव्हती कुणाला काळजी माझ्या हिताची*
*वाटले नव्हते मलाही चांगले व्हावे कुणाचे*

*वैद्य देवास प्रार्थना करतो*
*येउ दे काळ रोगराईचा*

मुलींच्या बाबतीत आजही समाज कसा दुजाभाव बाळगतो हे सांगताना सतीश लिहितो:
*त्यांनी तयार केली ही धुर्त खेळभांडी*
*खेळातही मुलींनो या भाकरीच भाजू*

 कुमारी माता, परित्यक्त्या व त्यांच्या मुलांचा प्रश्न हाताळताना अत्यंत आगतिक होऊन तो लिहून जातो:
*बाप आयुष्य लादुनी गेला*
*जाहलो नाइलाज आईचा*

*सतीश दराडेच्या गझलेची भाषा* अतिशय सहजसोपी, चित्रसंवेदी, नाजूक भाव नजाकतीने रेखाटणारी आणि जणू काही आपण एकमेकांशी बोलतो आहोत अशा सोप्या विधानांत शेर सांगणारी आहे. बहुतांश शेर गोटीबंद आहेत. आशयाला धरून जमीनीची निवड करण्याचं कसबही चांगलंच साधलं आहे. आयुष्या, भिंतीवरी, चिते, आम्हीतुम्ही असे आगळेवेगळे रदीफही यशस्वीपणे योजून उत्तम गझलबांधणी करण्यात सतीश यशस्वी झाला आहे. अनेक शेर वाक्प्रचार अथवा म्हणी म्हणून लोकभाषेत सहज मिसळून वापरण्यायोग्य झालेले आहेत. हे ही एक मोठं यश आहे.

संपूर्ण गझलसंग्रहात मुख्यत: प्रमाण भाषेचा तर क्वचित प्रसंगी ग्रामीण बोलीतील शब्दांचा वापर केला आहे. बिडी, भिताडे, पोपडा, बुड या शब्दांवरून याची प्रचिती येते.

डोक्यावर छप्पर असणे या वाक्प्रचाराऐवजी 'बुडाला सावली भेटणे' हा नवा वाक्प्रचारच सतीशने जन्माला घातला आहे. तसेच शिळोप्याची बरळ न राहणे, तंद्री विकून खाणे, वेलांटीगत लवचिक होणे, जिंदगीची वीट भाजणे, पाचोळ्याशी नाते करणे, उसाला ज्याने त्याने कोयता दावणे, झक मारून जगणे, वेदनांच्या हाती चुडा भरणे इ. या नव्या वाक्प्रचारांमुळेही सतीशच्या गझलेची भाषा लक्षवेधी ठरली आहे.

सतीशने या गझलसंग्रहात अनेक नव्याको-या प्रतिमाही वापरल्या आहेत. मनाच्या खिन्न देठाचे नैराश्य, कटाक्षाची निळाई, तोतया यम, मृत्युधार्जिण जिज्ञासा, शिंदळ जीभ, मानवतेच्या भाग्याची पडझड, भटक्या संसारातील सांजेची बडबड, आभाळाच्या सुपात चांदण्या फटकणे, तांबूस ओठांचा उतारा, देवदासी झुळूक, अंडार्थी बदक, पळसाची सन्यस्त पानगळ, मिंधी रात्र, सात्विक मुंग्या, पापण्यांचे ओलित इ. उत्तमोत्तम प्रतिमांमुळे गझलेच्या भाषेचे सौंदर्य नक्कीच वाढले असून गझलकाराच्या आत दडलेला कवी उजळून दिसू लागला आहे.

कैदाखान्याच्या छतावर बसलेलं कबुतर हे स्वातंत्र्याच्या साशंकतेचं प्रतिक तर गझलसंग्रहाच्या शिर्षस्थानावर विराजमान झालं आहेच.

'कैदखान्याच्या छतावर'मध्ये एकूण 75 गझला व काही सुटे शेर आहेत. सुटे शेरही दाद द्यावी असेच आहेत. 75 गझलांपैकी दोन गझला 3 शेर असलेल्या व दोन गझला 4 शेर असलेल्या आहेत. उर्वरीत 5 किंवा अधिक शेर असलेल्या आहेत. यावरून एकात वृत्तात मतल्यासह तीन किंवा तीनपेक्षा अधिक शेर असल्यास त्या रचनेस गझल मानावे हा नवा पायंडा सतीशने स्विकारल्याचे स्पष्ट होते. आजकाल जवळपास सर्वच गझलकार एका गुरूसाठी सूट घेत दोन लघु योजतात. सतीशच्या गझलेतही क्वचित अशी सूट घेतल्याचे आढळते. ते फारसे गैरही मानले जात नाही. या संग्रहातल्या अधिकाधिक गझला अक्षरगणवृत्तात आहेत. मोजक्या गझलांसाठी मात्रावृत्त वापरले गेले आहे. काही शेरांच्या विशेषत: छोट्या बहरातील शेरांच्या उला मिस-यांत क्रियापद नसल्याने ते शेर गझलेपासून वेगळे केल्यावर शेर न वाटता नुसता एक मिसरा बनून राहण्याची भिती वाटते. उदा.
पाय स्वप्नांवर दिल्याने
डूख धरते झोप नंतर
किंवा
वाटसरूच्या पायाला का
पुन्हा पुन्हा घर चिकटत आहे.

असो.
'श्वासांच्या समिधा' व 'कैदखान्याच्या छतावर' या दोन गझलसंग्रहांतील गझलांचं यश बघता सध्याच्या गझलकारांत अत्यंत प्रगल्भ गझल लिहिणा-या मोजक्या नावांत सतीश दराडे हे नाव निश्चितच वरच्या स्थानावर आहे यात शंका नाही. या आस्वादक लेखानिमित्ताने सतीशला व त्याच्या या गझलसंग्रहाला यशाचे नवे उच्चांक गाठण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

~ राजीव मासरूळकर
   सावंगी, औरंगाबाद