सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Thursday, 11 May 2017

तुला भेटून जावे तू मला भेटून जाताना

मला भेटून जाताना

दिसावी तू मला माझ्यात डोकावून जाताना
तुला भेटून जावे तू मला भेटून जाताना

कसे शब्दात एका मी मनीचे गूज सांगावे
तुला वाटू नये खोटे, खरे सांगून जाताना

सहन केलाय ग्रीष्माचा प्रखरसा दाह झाडांनी
जरा कर पावसा वर्षाव मृग संपून जाताना

किती केलेस तू माझ्या मनाचे  प्रीतरस शोषण
नको ना दूर जाऊ हा झरा आटून जाताना

भरू दे रात्रभर चंद्रासवे आकाशसंमेलन
सकाळी दव बनू तृणपान ओथंबून जाताना

किती तू हुंदके देउन रडायाचीस विरहाने
उसासा फक्त एकच का मला सोडून जाताना??

~ राजीव मासरूळकर
   दि.23/05/2015
   सायं7:30 वाजता
   सिल्लोड जि.औरंगाबाद

अटळ

अटळ

घाव होऊ नये वा उठावा न वळ
फक्त यावी उरी एक साधीच कळ

बोललो मी मला काय बोलायचे
बोल तूही मनातील थोडे सरळ

राग मानू नको, दूर जाऊ नको
फार असते कठिण परत येणे जवळ

फूल चुरगाळणे सोड वेड्या अता
गंध आहे तुझ्यातच खरा, तो उधळ

नाव यादीत माझे तुझ्या घेच पण
ती असेतो यमा नाव माझे वगळ

रंग काळा म्हणे पांढ-याला, बघू
कोण आहे उजळ, कोण आहे उथळ

अंत आहे सुखाला कुठे या जगी
दु:ख आहे तरी माणसाचे अटळ!!!

~राजीव मासरूळकर
   दि.24/05/2015
   रात्री11:55 वाजता
    सिल्लोड, औरंगाबाद

माझी शाळा

3)।।माझी शाळा।।

माझी शाळा माझी शाळा
मज आवडते माझी शाळा ।।धृ।।

छोटुकल्यांना लळा लाविते
धाटुकल्यांचा मळा फुलवते
अज्ञानाच्या झळा पळविते
झुळझुळते निर्मळा।।१।।

फुलामुलांच्या गोष्टींमधुनी
प्राणी पक्षी सृष्टीमधुनी
गुरूजनांच्या दृष्टीमधुनी
दिसती जीवनकळा।।२।।

सुंदर सवयी अंगी बाणवी
पशूस जगणे देई मानवी
नष्ट कराया वृत्ती दानवी
झिजते ही प्रेमळा।।३।।

गाव राज्य अन् देशासाठी
विश्वाच्या समृद्धीसाठी
प्रेम दया मानवतेसाठी
स्फुर्ती दे तिळतिळा।।४।।

- राजीव मासरूळकर
  प्रगशिअ, पं.स.सोयगाव
  जि.औरंगाबाद

गुर्जी बोलू नका मले

2) गुर्जी , बोलू नका मले

आसं आडवंतिडवं गुर्जी बोलू नका मले
आसं गुराढोरावानी रोज टोलू नका मले

नही मोठ्ठा शिरीमंत, मव्हा बाप शेतकरी
तरी धस्कटासारकं तुम्ही मोलू नका मले

वास शाळंचा नव्हता मह्या सत्रा पिढ्याह्यले
जड डोख्याचा म्हणून उभा सोलू नका मले

हात दनकट महे चीज घामाचं महित
ह्यो तं बैलाचाच बाप आसं तोलू नका मले

हिर्वं सपन पहून मी बी कशीन जमीन
दूर आक्षरन्यानाच्या पण कोलू नका मले !

- राजीव मासरूळकर
   प्रगशिअ, पं.स.सोयगाव
   जि औरंगाबाद


प्रसन्नतेचा झरा असावा माझा शिक्षक

@माझा शिक्षक@

मनापासुनी खरा असावा माझा शिक्षक
प्रसन्नतेचा झरा असावा माझा शिक्षक !

ज्ञानपिपासू उदार निर्भय सत्यप्रियही
कठोर पण शर्करा असावा माझा शिक्षक !

अन्यायाला भेदाला अंधत्वालाहि
निःस्वार्थी हादरा असावा माझा शिक्षक !

सूर्यासम तेजस्वी, चंद्रासम शीतल अन्
क्षमाशील, जणु धरा, असावा माझा शिक्षक!

माता बंधु बाप मित्र दिग्दर्शक प्रेरक
दुःखातहि आसरा असावा माझा शिक्षक !

- राजीव मासरूळकर
   प्रगशिअ, पं.स.सोयगाव
   जि.औरंगाबाद


Wednesday, 10 May 2017

पारा

पारा

मज स्पर्शून जातो हळवा
संध्येचा विरही वारा
मेंदूतुन झिरपून जातो
तव आठवणींचा पारा !
तुज शोधित जातो तुझिया
अंधुकशा वाटेवरती
का रंग लपवती झाडे ?
काळोख उधळते पणती ?

- राजीव मासरूळकर
17.01.2013 7.00PM

वेडी कुठली!

वेडी कुठली

दुरून बघते, सलज्ज हसते, वेडी कुठली
जिवापाड माझ्यावर मरते, वेडी कुठली!

नजर तिच्यावर जेव्हा माझी थबकत नाही
पुन्हा आरशासमोर बसते, वेडी कुठली!

डोळ्यांमध्ये माझ्या कोणी भरू नये ना,
कायम माझ्यासमोर असते, वेडी कुठली!

बोलावे मी, स्पर्श करावा, मिठीत घ्यावे
एकांती या स्वप्नी रमते, वेडी कुठली!

समाधीस्त मी जगण्यामधुनी जागा होतो
हळूहळू ती मनात ठसते वेडी कुठली!

"प्रेम तुझ्यावर मी ही करतो ", मी म्हटल्यावर
"वेडा कुठला " मलाच म्हणते, वेडी कुठली!

~ राजीव मासरूळकर