सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Thursday, 11 May 2017

आशा

आशा....

आभाळ भरून येतंय....
लखलखीत विजेरी सुळे दाखवून भिववित
गडगडून हासत
काळ्याकुट्ट राक्षसी मेघांची मोकाट फौज
व्यापतेय निलाकाश......
माझं भयव्याकुल हृदय
शोधतंय
आसरा
कदाचित तुझा...
तुझ्या आठवणींचा......!
हे प्रचंड राक्षस धावताहेत अंधाधुंद
क्षणोक्षणी आकार बदलत
झेपावताहेत त्यांचे सुसाट श्वास तुझ्याकडे
हेलपाटून टाकताहेत तुला
झपाटताहेत........ माझ्यासमोर.......
त्यांचे लक्षावधी थेंबहात
घेताहेत तुला कवेत
करताहेत स्पर्श
तुझ्या गुलाबी अंतरंगास आरपार
आणि मी पाहतोय..........
तुझ्या चेह-यावरील तृप्ती...
तुझं आनंदविभोर अंगांग...
डोळे बंद करून
थेंबांची तू घेतलेली कोवळी चुंबनं..
कवटाळून घेताहेस तू
ढगांचा चिंब चिंब थेंबसंभार.....
अधाशासारखी.... !
एवढं प्रेम करतेस तू ढगांवर...
पावसावर....?
आण माझं काय....?

वाटलं होतं तू येशील,
आवेगानं माझ्यात विलीन होशील...
पण तू झालीस
प्रेमाचा पुर्वापार वर्षाव करणा-या
गर्भश्रीमंत पावसाची....!
माझं दारिद्र्य
मी लपवूही शकलो नाही
माझ्या डोळ्यांतला खजिना
तुला दाखवूही शकलो नाही......!

आणि हे काय....?
जिथे जिथे पेरल्या होत्या म
आठवामृताच्या निष्पाप बिया
तिथे तिथे उगवतेय
गुप्तधनावर बसलेल्या भुजंगासारखी
हिरवीकंच काटाळ
जाड हिरव्या पानांत
विष साठवलेली
पोपटी काटे पांघरलेली
मण्यासारखी पिवळी फुलं डोईवर घेऊन डोलणारी
स्पर्श करू पाहणा-याला
विखारी दंश देणारी.....

ती अमृताचं रक्षण करतेय
कि विषाचं.........?
कि
तुझ्या मनातल्या किल्मिषांचं........?

वाटलं होतं
माझ्या छातीभर शेतीवर
आक्रमण करणारी ही काटाळ
तू कवटाळशील
तर तिची बनेल एक अमृतवेल...
तुला नि मला सांधणारी
तुझ्यामाझ्या अव्यक्तातले
अमृतत्व शोधणारी
आणि गुंफेल ती
आपल्या अबोल आभाळभावनांना
तिच्या सुगंधी पानाफुलांत
कायमचेच.........!

पण नाहीच,
तसंही झालं नाहीच.....

दु:ख आहे, पण जरा आधार आहे
प्रेम तू केलेस तोही यार आहे

सावलीसम तू मला बिलगू नको ना
की तुझा हा ही दुधारी वार आहे....?

प्रेम मी केले जगावर अन् कळाले
दु:ख प्रेमाच्या कथेचे सार आहे......

दु:ख प्रेमाच्याा कथेचे सार आहे ....!!!

~ राजीव मासरूळकर

तुझी आठवण

तुझी आठवण

तुझी आठवण
झाडाझाडांच्या
पानापानांना
गुदगुल्या करणा-या
पहाटवा-यासारखी....

तुझी आठवण
काटे पांघरून
वेडेवाकडे हात पसरणा-या
निष्पर्ण बाभळीसारखी...

तुझी आठवण
एकट वाट
तुझी आठवण
निर्जन घाट
तुझी आठवण
सागरलाट
तुझी आठवण
ओला काठ...

तुझी आठवण
गवतावरल्या
लोभस लोभस
दंवासारखी....
हवीहवीशी!

तुझी आठवण
नालीमध्ये
बटबटणा-या
जीवांसारखी.....
नकोनकोशी!!!

~ राजीव मासरूळकर

प्रेम कोणीही कुणावर करत नाही

स्वार्थ, इच्छा, धर्म, वय जर झुकत नाही
प्रेम कोणीही कुणावर करत नाही

तू जवळ असलीस की सारे विसरतो
तू जवळ नसल्यास काही सुचत नाही

ऐनवेळी ही धरा भेगाळते अन्
पावसाला कान डोळा असत नाही

श्वास घेतो, सोडतो, उधळीत जातो
मेळ श्वासांचा अखेरी जुळत नाही

•••• राजीव मासरूळकर

चूल

चूूल

पोटात भडकलेली आग शमवायला
हवी असते
तिच्यासारखीच धग असलेली
एक ढणढणती चूूल

प्रदेशागणिक
परिसरागणिक प्रकार बदलतो चुलीचा
पण
तिला नसतो धर्म, नसतो पंथ, नसते जात
तिला नसतो कुठला झेंडा,
नसते ती कुठलातरी रंग मानणा-यांच्या व्यवच्छेदक रंगाची....

ती नसते शुद्ध शाकाहारी किंवा मांसाहारीही...

गरीबीसोबत तिचं भांडण नसतं अन्
नसतं तिला
श्रीमंतीचं सोयरसुतकही...

ती फक्त असते
भुकेल्या पोटांची
पेटवणा-या हातांची
शिजवलेल्या घासांची.......!!!

~ राजीव मासरूळकर

एक शेर....

चूल पेटते, चुलीस काम फक्त पेटणे
घास देतसे कुणास दाह देतसे तवा

~ राजीव मासरूळकर

एक कविता अशी लिहावी

एक कविता अशी लिहावी

रक्ताच्या पेशीपेशींची
अक्षयवेली सतेज व्हावी
हृदयाच्या अंतरात सच्ची
एक कविता अशी लिहावी !

एक कविता अशी लिहावी
रोम रोम पेटून उठावा
श्वासांश्वासांतून हवासा
कान्हाचा उमटावा पावा !

शब्द ओघळावे अवचितसे
मेघांच्या डोळ्यांत दाटता
सैल न व्हावी मिठी जराही
अशी लिहावी एक कविता !

पंचमहाभूतांना व्यापुन
अव्यक्तासम अथांग व्हावी
भविष्यासही आशादायी
एक कविता अशी लिहावी !

एक कविता अशी लिहावी
तुझ्याच आतुन आतुन आतुन
सत्य नागडे , विरूप , वेडे
प्रतिबिंबावे तव शब्दांतुन !

अंधाराला कवेत घेऊन
सूर्यप्रेयसी प्रकाशवेडी
एक कविता अशी लिहावी
प्रज्ज्वल , शीतल , हळवी थोडी !

नवीनवीशी हवीहवीशी
तुझी न् माझी अन् सगळ्यांची
एक कविता अशी लिहावी
अक्षर अक्षर सव्यासाची !

- राजीव मासरूळकर
दि २२.१०.१२
सायं ६.४५

मी जगण्याचे नाटक करतो

दिसणे थोडे मादक करतो
मी जगण्याचे नाटक करतो

मन मोठ्याने म्हणते हो हो
तोंडाने तो चक् चक् करतो

ती दरवाजा उघडत नाही
बाहेरुन मी टकटक करतो

गहू जगू द्या, हे मुषकांनो
तुमच्यासाठी मोदक करतो

जगणे महाग झाल्यावर मी
हसणे थोडे माफक करतो

जे दिसल्याने इज्जत जाते
जो तो ते आकर्षक करतो

~ राजीव मासरूळकर

जागर मराठीचा

जागर मराठीचा

थेंब मी आहे इथे सागर मराठीचा
तनमनामध्ये दिसे वावर मराठीचा

बघ अजिंठा, वेरुळाला अन् विठोबाला
फुटतसे सह्याद्रिला पाझर मराठीचा

मागणे आहे तुझ्यापाशी  जिव्हाळ्याचे
हे मना, तू कर सदा जागर मराठीचा

मायभू, आई, परस्त्री वंद्य आम्हाला
अन् शिवाजीएवढा आदर मराठीचा

इंग्रजीवर स्थापण्या सत्ता मराठीची
कर मराठी माणसा वापर मराठीचा

~ राजीव मासरूळकर
   मराठी राजभाषा दिन
   दि.27/2/15 19:00