सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Thursday, 11 May 2017

दहन

दहन

दिवसभर नभी लाव्हा उन्हाचा उधाने
जळजळजळ जाळे जीवना जीवघेणे
थबथब निथळोनी देह घामात न्हातो
गवत जळत जाते, वात वातास येतो !

मृगजळ भवती धादांत आव्हान देते
पळत थकत पाणी प्राण डोळ्यांत नेते
मरगळ मरणाची झाडवेलींस येते
भ्रमण खग न करती, सावली शोधती ते !

सदन गरम ज्वाला ओकते भर दुपारी
दहन सहत झाडे, सावल्या दीन दारी
पळ पळ तर भासे एक एका युगाचा
मरण सहज वाटे घास घेते जगाचा !

अवचित मग येतो जोरजोरात वारा
झुकत मुडत झाडे साहती क्रुद्ध मारा
जलद जलद येती घेरती ते नभाला
कडकड चपलांची साद देते जगाला

सर सर सर धारा पावसाच्या बरसती
फिरुन फुलुन येती श्वास, मातीत न्हाती !

हसत सजल वारा स्पर्शतो गार काया
उधळुन धरतीही देत मृद्गंध फाया
मुखकमल मनूजाचे तरारून येते
गगन खग भराऱ्‍यांनी शहारून जाते !

(मरणकळ जगी जे सोसती पेलताती
सृजन सत् शिवाचे सुंदरे त्याच हाती !)

- राजीव मासरूळकर
दि. २८ जुलै २०१३
रात्री ९.०० वाजता

ढग आलंय भरून

मन शिराळ करून
ढग आलंय भरून

हवा घुमली घुमली
धूळ नभास भिडली
त्यात वीज कडाडली
कळ पोटात उठली
कुस मायची होऊन
ढग आलंय भरून

काळवंडलं आभाळ
जणु राखंखाली जाळ
पिलं घरात घायाळ
बाप शोधतो कपाळ
डोळ्यापुढं अंधारून
ढग आलंय भरून

येई कुडातून वारं
भरे घराले कापरं
मनी हंबर हंबर
धाव धाव मुरलीधर
मन कोरडं करून
ढग आलंय भरून

थेंब आले बोरावानी
गंध भरारला रानी
वारं मोहरलं मनी
झाडं झाली पानी पानी
गेली तहान हरून
ढग आलंय भरून

गार झालं तन मन
पोरं नाचली हासून
कोंब आले टरारून
माती गेली शहारून
नाळ जन्माची धरून
ढग आलंय भरून...

ढग आलंय भरून...
ढग आलंय भरून.....!

~ राजीव मासरूळकर
मासरूळ, दि.9/5/15
सायं.7:30 वाजता

एक आठवण

एक आठवण

सांज जाहली
अजून आई
घरी परतुनी
कशी न आली ?

हृदयी माझ्या
व्याकुळ हुरहुर
काहुर वादळ
लाटा गहिवर
क्षितिज आंधळे
वाटा विव्हल
पक्षी चिंतित
वारा जर्जर !

हजार चकरा
घरी अंगणी
अबोल झाडे
कातर गाणी !

चूल पेटवुन
वरण घालता
भरले डोळे
भय अश्रुंनी
मनास समजुत
गेलो घालून
धुपटामध्ये
असेच होते

वैरी मन हे
स्वतःस सोलत
लाखो शंका
बसले काढत -
शेतामध्ये
साप चावला
नसेल ना तिज ?
वाघ लांडगे
की वैऱ्‍याने
घात न केला
कुणास ठावे ?
की वाटेच्या
काठावरच्या
विहिरीमध्ये
असेल पडली. . . . . . ?
अधीरतेने
सुटलो धावत
शेताकडच्या
वाटेवरुनी
विहिरीमधल्या
अंधाराला
डोकावुन मी
बघू लागलो
चार चांदण्या
डोळ्यांमधल्या
उदासवाण्या
गळून पडल्या
त्या अंधारी . . . . .

तेवढ्यात वळ
पायावरती
उठला मोठा
"मेल्या मुडद्या
मरायचय का ?
पुस्तक सोडुन
कशास आला
विहिरीकाठी
तडफडायला ?",
पाठीवरती
दोनचार वळ
अजून उठले
तसाच वळुनी
गळ्यात पडलो
बराच रडलो
ओक्साबोक्सी
गहीवरुन ती
मला म्हणाली,
"चुकलं माझं
बघु दे, बघु दे
कुठं लागलं ?"
पायांवरचे
पाठीवरचे
काठीचे वळ
बघून आई
देत राहिली
स्वतःस दूषण !

मी का रडलो
तिला न कळले
तिला पाहता
काहुर शमले
हृदयी बहरुन
गेली जाई
जिवंत होती
साधी भोळी
प्रेमळ सोज्वळ
माझी आई !

- राजीव मासरूळकर

भिजणा-याच्या उरात कायम उरतो पाउस

**पाऊस**

थेंब थेंब प्रेमाचे घेउन येतो पाउस
स्पर्श सुखाचे हळवे देउन जातो पाउस !

विरहचांदणेे ठिबकत येता गालावरती
मिठीत घेउन अलगद चुंबुन घेतो पाउस !

शेतपिकांच्या पानोपानी दंवासारखे
सहवासाचे गीत दिवाने गातो पाउस !

स्वार्थामध्ये गढूळ होता नातीगोती
एकांतातच दुरात जाउन झुरतो पाउस !

अंगावरुनी ओघळून जाते ते पाणी
भिजणाऱ्‍याच्या उरात कायम उरतो पाउस !

- राजीव मासरूळकर
मासरूळ , ता जि बुलडाणा

तुझी आठवण दाट झाली

तुझी आठवण दाट झाली

सावल्या लांबल्या अन् झुळूकसुद्धा  लाट झाली
संध्याकाळ होताच तुझी आठवण दाट झाली

कित्ती सुखद होती ती ऊब तुझ्या गर्भामधली
वात्सल्याची नाळ तुटली ....... जिंदगी हाट झाली

कितीक रस्ते चालत.... टाळत, वळणांवरुन वळलो
अन् आता.... उभ्याउभ्या जळणे माझी वाट झाली

आत्ता तर आला होता चंद्र, माझ्यासमोर वर
अन् बघता बघता कशी काय खुळी पहाट झाली ?

फार ठरवुन एकदा बसलोच स्वत:स रेखाटत
हजारदा आवडलं, लाखदा काटछाट झाली

आयुष्याची वाकळ शब्दन्  शब्द उसवत गेलो
लोक फक्त हेच म्हणाले, कविता भन्नाट झाली !

~ राजीव मासरूळकर
17/01/2014
18:30

तुला भेटून जावे तू मला भेटून जाताना

मला भेटून जाताना

दिसावी तू मला माझ्यात डोकावून जाताना
तुला भेटून जावे तू मला भेटून जाताना

कसे शब्दात एका मी मनीचे गूज सांगावे
तुला वाटू नये खोटे, खरे सांगून जाताना

सहन केलाय ग्रीष्माचा प्रखरसा दाह झाडांनी
जरा कर पावसा वर्षाव मृग संपून जाताना

किती केलेस तू माझ्या मनाचे  प्रीतरस शोषण
नको ना दूर जाऊ हा झरा आटून जाताना

भरू दे रात्रभर चंद्रासवे आकाशसंमेलन
सकाळी दव बनू तृणपान ओथंबून जाताना

किती तू हुंदके देउन रडायाचीस विरहाने
उसासा फक्त एकच का मला सोडून जाताना??

~ राजीव मासरूळकर
   दि.23/05/2015
   सायं7:30 वाजता
   सिल्लोड जि.औरंगाबाद

अटळ

अटळ

घाव होऊ नये वा उठावा न वळ
फक्त यावी उरी एक साधीच कळ

बोललो मी मला काय बोलायचे
बोल तूही मनातील थोडे सरळ

राग मानू नको, दूर जाऊ नको
फार असते कठिण परत येणे जवळ

फूल चुरगाळणे सोड वेड्या अता
गंध आहे तुझ्यातच खरा, तो उधळ

नाव यादीत माझे तुझ्या घेच पण
ती असेतो यमा नाव माझे वगळ

रंग काळा म्हणे पांढ-याला, बघू
कोण आहे उजळ, कोण आहे उथळ

अंत आहे सुखाला कुठे या जगी
दु:ख आहे तरी माणसाचे अटळ!!!

~राजीव मासरूळकर
   दि.24/05/2015
   रात्री11:55 वाजता
    सिल्लोड, औरंगाबाद