सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Thursday, 11 May 2017

तुझी आठवण

तुझी आठवण

तुझी आठवण
झाडाझाडांच्या
पानापानांना
गुदगुल्या करणा-या
पहाटवा-यासारखी....

तुझी आठवण
काटे पांघरून
वेडेवाकडे हात पसरणा-या
निष्पर्ण बाभळीसारखी...

तुझी आठवण
एकट वाट
तुझी आठवण
निर्जन घाट
तुझी आठवण
सागरलाट
तुझी आठवण
ओला काठ...

तुझी आठवण
गवतावरल्या
लोभस लोभस
दंवासारखी....
हवीहवीशी!

तुझी आठवण
नालीमध्ये
बटबटणा-या
जीवांसारखी.....
नकोनकोशी!!!

~ राजीव मासरूळकर

प्रेम कोणीही कुणावर करत नाही

स्वार्थ, इच्छा, धर्म, वय जर झुकत नाही
प्रेम कोणीही कुणावर करत नाही

तू जवळ असलीस की सारे विसरतो
तू जवळ नसल्यास काही सुचत नाही

ऐनवेळी ही धरा भेगाळते अन्
पावसाला कान डोळा असत नाही

श्वास घेतो, सोडतो, उधळीत जातो
मेळ श्वासांचा अखेरी जुळत नाही

•••• राजीव मासरूळकर

चूल

चूूल

पोटात भडकलेली आग शमवायला
हवी असते
तिच्यासारखीच धग असलेली
एक ढणढणती चूूल

प्रदेशागणिक
परिसरागणिक प्रकार बदलतो चुलीचा
पण
तिला नसतो धर्म, नसतो पंथ, नसते जात
तिला नसतो कुठला झेंडा,
नसते ती कुठलातरी रंग मानणा-यांच्या व्यवच्छेदक रंगाची....

ती नसते शुद्ध शाकाहारी किंवा मांसाहारीही...

गरीबीसोबत तिचं भांडण नसतं अन्
नसतं तिला
श्रीमंतीचं सोयरसुतकही...

ती फक्त असते
भुकेल्या पोटांची
पेटवणा-या हातांची
शिजवलेल्या घासांची.......!!!

~ राजीव मासरूळकर

एक शेर....

चूल पेटते, चुलीस काम फक्त पेटणे
घास देतसे कुणास दाह देतसे तवा

~ राजीव मासरूळकर

एक कविता अशी लिहावी

एक कविता अशी लिहावी

रक्ताच्या पेशीपेशींची
अक्षयवेली सतेज व्हावी
हृदयाच्या अंतरात सच्ची
एक कविता अशी लिहावी !

एक कविता अशी लिहावी
रोम रोम पेटून उठावा
श्वासांश्वासांतून हवासा
कान्हाचा उमटावा पावा !

शब्द ओघळावे अवचितसे
मेघांच्या डोळ्यांत दाटता
सैल न व्हावी मिठी जराही
अशी लिहावी एक कविता !

पंचमहाभूतांना व्यापुन
अव्यक्तासम अथांग व्हावी
भविष्यासही आशादायी
एक कविता अशी लिहावी !

एक कविता अशी लिहावी
तुझ्याच आतुन आतुन आतुन
सत्य नागडे , विरूप , वेडे
प्रतिबिंबावे तव शब्दांतुन !

अंधाराला कवेत घेऊन
सूर्यप्रेयसी प्रकाशवेडी
एक कविता अशी लिहावी
प्रज्ज्वल , शीतल , हळवी थोडी !

नवीनवीशी हवीहवीशी
तुझी न् माझी अन् सगळ्यांची
एक कविता अशी लिहावी
अक्षर अक्षर सव्यासाची !

- राजीव मासरूळकर
दि २२.१०.१२
सायं ६.४५

मी जगण्याचे नाटक करतो

दिसणे थोडे मादक करतो
मी जगण्याचे नाटक करतो

मन मोठ्याने म्हणते हो हो
तोंडाने तो चक् चक् करतो

ती दरवाजा उघडत नाही
बाहेरुन मी टकटक करतो

गहू जगू द्या, हे मुषकांनो
तुमच्यासाठी मोदक करतो

जगणे महाग झाल्यावर मी
हसणे थोडे माफक करतो

जे दिसल्याने इज्जत जाते
जो तो ते आकर्षक करतो

~ राजीव मासरूळकर

जागर मराठीचा

जागर मराठीचा

थेंब मी आहे इथे सागर मराठीचा
तनमनामध्ये दिसे वावर मराठीचा

बघ अजिंठा, वेरुळाला अन् विठोबाला
फुटतसे सह्याद्रिला पाझर मराठीचा

मागणे आहे तुझ्यापाशी  जिव्हाळ्याचे
हे मना, तू कर सदा जागर मराठीचा

मायभू, आई, परस्त्री वंद्य आम्हाला
अन् शिवाजीएवढा आदर मराठीचा

इंग्रजीवर स्थापण्या सत्ता मराठीची
कर मराठी माणसा वापर मराठीचा

~ राजीव मासरूळकर
   मराठी राजभाषा दिन
   दि.27/2/15 19:00

शेतक-याच्या ओठावरही फुलावी पावसाची आल्हाददायक कविता

आभाळ भरून आलं आहे....भुरभुरायलाही सुरुवात झालीय काही ठिकाणी.....झाडं तरारलीयेत
पाखरं भरारलीयेत...हृदयाच्या कुपीत मृद्गंध भरू पाहणा-या तरूणाईला, कवीमनांना किती प्रसन्न... आल्हाददायक वाटतंय म्हणून सांगू...! आसुसलेत सगळे थेंबांचे मोती झेलायला....पण जिकडे तिकडे डोक्याला हात लावून बसलाय आमचा शेतकरी राजा...सोन्यासारखा पिवळा झालेला गहू सोंगायचा बाकी आहे अजून शेतात...हरभरा सोंगून पडलाय
पण थप्पी घालायचीय त्याची अजून...सूर्यफुलाचा ढिग करून ठेवलाय हसत हसत, पण थ्रेशरवाला आज आज उद्या उद्या करतोय मळणी करायला...पाखरं हाकलून हाकलून राखलेली शाळू थरारतेय ढगांचा गडगडाट ऐकून...भाव कमी असला तरी फरदडीतून किमान घरखर्च तरी भागेल या आशेनं उभी ठेवलेली कपाशी वाचव वाचव म्हणत झुकली आहे धरणीमातेच्या पायांशी जोरदार वादळाच्या चाहुलीनं... ऐन हुरड्यात असलेल्या हिरव्यागार मक्याची गाळण उडालीय भुईसपाट करणा-या गारपिटीच्या भितीनं.... कधी नव्हे तो फांदोफांदी मोहरलाय शेतातला आंबा..... विहिरीत मेहबानी करून झिरपणा-या पाण्यावर वीजमंडळाच्या विश्वासघातकी भारनियमनाच्या वेळापत्रकासोबत लपंडाव खेळत तळहातावरच्या फोडासारखी जपलेली पिकं एका क्षणात नष्ट झालीत तर करायचं???  कर्जाचा डोंगर कसा पार करायचा???  मुलाचं शिक्षण.. मुलीचं लग्न कसं करायचं???  बायको कशी  काळीठिक्कर झालीय वठलेल्या झाडासारखी शेतात राबून राबून.....

पावसा, तुला थोपवणं तर शक्य नाहीच; पण येणारच असशील तर हळुवार ये रे बाप्पा, वावधन घेऊन येऊ नकोस सोबत... शेतातलं पीक पाहून बळीराजाच्या मनात बहरलेल्या स्वप्नाची वाताहत करू नकोस राजा... त्याच्याही ओठांवर फुलू दे तुझ्या आगमनाची एखादी आल्हाददायक कविता!!!

~ राजीव मासरूळकर