सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Wednesday, 10 May 2017

काय साली जिंदगी झाली


कोरडी अन् कोडगी झाली
काय साली जिंदगी झाली

एक डोळा लागला लाजत
च्यायला, ही वानगी झाली

फेसबुक,व्हाट्सॅपवर सोशल
वेळ बाकी खाजगी झाली

मी मनाला मारले कायम
केवढी मोठी ठगी झाली!

का? , म्हणालो, एवढी दु:खी?
ती म्हणाली, पोरगी झाली!

तो तिला साली म्हणाला हो
कोणती ही दिल्लगी झाली?

~ राजीव मासरूळकर
    18/02/2016
    सकाळी 9:00

ये रविवारा...

ये रविवारा 😂

सप्ताहातील
कष्टाचा शिण
घालव सारा
ये रविवारा !

लवकर उठुनी तयार व्हावे
धावपळत ऑफिस गाठावे
दिनभर काबाडकष्ट करावे
माथ्यापासून वाहत जाती
घामाच्या धारा
ये रविवारा !

ऑफिसमधली खोटी कटकट
मुर्ख बॉसची तर्कट वटवट
टंकक की बोर्डाची खटखट
श्वास मोकळा देण्यासाठी
फोडून ही कारा
ये रविवारा !

पाच दिसांच्या कष्टांखातर
शनिवारच्या हाफ डे नंतर
तणाव चिंता हो छुमंतर
जरा फिरू दे अनुभवू दे
उनाड वारा
ये रविवारा !

हट्ट मुलांचा सहलीकरीता
सौ. कंटाळे टी व्ही बघता
मीही बोर ते तेची खाता
शिळे जाहले जीवन देवा
फुंकर तरी मारा!
ये रविवारा !

बसेन म्हणतो फेसबुकावर
कमेंट लाईक करेन वर वर
मैत्रिणींशी च्याटेन भरभर
स्वप्न पूर्ण होऊ दे, संपव
कामाचा भारा
ये रविवारा ! 😂

- राजीव मासरूळकर
दि १४ . १०. २०१२

गर्भाशय

गर्भाशय

पाहतो कोठे कुण्या धर्मात गर्भाशय
घेतले जाते विकत पैशात गर्भाशय

बोललो "बेटी बचाओ" पोटतिडकीने
जाणला नाही कुणी जन्मात गर्भाशय

काच देहाचा, वयाचा सोसते बाई
ठेवते आयुष्यभर धाकात गर्भाशय

वंश वाढवण्यास मी जन्मास आलेलो
पण कुठे आहे मला पोटात गर्भाशय?

वेल वंशाची तुझी वाढेल का आई ...
मारले जर तू तुझ्या गर्भात गर्भाशय.....??

~ राजीव मासरूळकर
    गटशिक्षणाधिकारी
    पं.स.सोयगाव जि.औरंगाबाद
🌷🌼🌹🌷🌼🌹🌷🌼🌹🌷

छोटंसं घर माझं



घर

छोटंसं घर माझं छोटंस घर
डोंगरावर बाई डोंगरावर
झाडांच्या पानांत, पानांच्या द्रोणांत
पावसाची सर बाई पावसाची सर !

छोटंसं घर माझं छोटंसं घर
धरणावर बाई धरणावर
पाखरू गाण्यात, मासोळी पाण्यात
जाळेच नर बाई जाळेच नर !

छोटंसं घर माझं छोटंसं घर
सरणावर बाई सरणावर
चंदनी वासात, चैत्राच्या मासात
आग भरभर बाई आग भरभर ! ! !

~ राजीव मासरूळकर
   9423862938
🌹🌼🌷🌹🌼🌷🌹🌼🌷🌹


तू........

तू...... . . . . !

तू असतेस अशी
की कुणी नसावंच जणु घरात
मात्र तू असतेस नक्कीच . . . . .!
सकाळी सकाळी
मी हाती घेतलेल्या
वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर
असतो तुझा न्हालेला
कोरा टवटवीत चेहरा . . . . ,
तुझ्या रात्रभोर केसांचा मुग्ध गंध !
प्रत्येक पानावर असतात रेखलेल्या
तुझ्या विविधांगी अदा
कुठे यशाच्या कथा . . . .
कुठे अपयशाच्या गाथा . . . . .
कुठे अपहरण तर कुठे वस्त्रहरण . . . . . . . . !

तशी तर तू बोलत नाहीस कधीच
मात्र तू बोलतेस नक्कीच . . . . . .
बोलतात नादमय
तुझे प्रेमळ कंगण
बोलतात तुझ्या हातातल्या
शिणलेल्या कपबश्या
बोलतात तुझी कंटाळलेली भांडीकुंडी
बोलतं तुझं धुणं-सारवणं
बोलतो तुझा अबोल अलवार गहिवर
बोलतो तुझा सरावलेला स्वेदचिंब पदर . . . . . !
तुझं अस्तित्व जाणवतं
तुझ्या पायांतल्या पैंजणांमधल्या
घुंगरांच्या छमछमाटातून . . . . . . .
त्यांचाही गळा जणु तूच दाबलेला . . . . . . . !

आणि
जेव्हा मी ठोठावतो
तुझ्या बंद घराचं भक्कम दार
तेव्हा तू म्हणतेस ,
"कोण पाहिजे तुम्हाला . . .?
घरात कुणीच नाही . . . . . . ."
घरात स्वतः तू असतानासुद्धा. . . . . . . !

- राजीव मासरूळकर
rajivmasrulkar@gmail.com
🌷🌼🌹🌷🌼🌹🌷🌼🌹🌷


गाव

गाव

पाच पंचवीस घरं
थकलेली कलेवरं

चार घासांचीच भूक
होताही न ये भिक्षूक

घामट कुजकट कपडे
निसर्ग शासनाचेच मापडे

आयुष्य खड्ड्याखड्ड्यांचा रस्ता
हाडं पिचेपर्यंत खायच्या खस्ता

सरड्याची कुपाटीपर्यंंतच धाव
कारण खेडुतांचं माझं गाव !

राजीव मासरूळकर
दि२५.३.१२

फुटकळ शेर

फुटकळ

फार थोडी मी पुन्हा ठरवून घेतो
मी मला माझ्यापुढे बसवून घेतो

तुला नेमका रंग लावू कुठे
तुझ्या देहभर पेटलासे पळस

ईश्वराहातून थोडी चूक झाली
पोट छोटे, फार मोठी भूक झाली

भविष्याकडे गहान ठेवा वर्तमान पण
भूत उद्याचे बसू न द्यावे मानगुटीवर

ज्या स्थानाची व्हावी पूजा
शिवीत त्याला गोवून गेलो

दु:ख आयुष्यातला अमृतझरा
बा सुखा, तू चार हातांवर बरा

आदीम भावनांचे भरघोस पीक आले
ही एक अंधश्रद्धा: येथे विकास झाला

गर्दी माझी कोणी नसते
मी गर्दीचा होउन जातो

ही निसर्गाचीच किमया .... मान्य नाही
जो बघावा तो इथे आसक्त आहे

एवढी वाकून तू चालू नको
की तुला तारूण्य ओझे वाटते ?

नवीन काही शिकलो आम्ही, जो तो खोटे सांगत आहे
जे आहे ते समजुन घेण्यातच तर जीवन संपत आहे... !

तू जरा स्वत:त डोकावून बघ ना
सर्व हे सामावले आहे तुझ्यातच

चेहरा शब्दांस नाही, छान झाले
माणसाचे त्यामुळे सन्मान झाले

मनाला वाटले की या जिवाचे जाहले सोने
सकाळी ऊन थोडे चेह-यावर सांडले होते

स्वत:ला मिरवता हवे यायला
तसे कोण कोणास ओवाळतो?

तुझ्या गुलाबी ओठांचा ठसा कुणाला दिसू नये
म्हणून माझ्या शब्दांना रंग गुलाबी दिलाय मी

सुंदर असलेल्यांचे जगणे सोपे नाही
कुरूप असलेल्यांचे जगणे अवघड आहे

दिव्याखाली खरीखोटी दिव्याची सावली असते
जिथे अंधार असतो ना, तिथे दीपावली असते

खूप दिवसांनी घरी आल्याबरोबर
का तिची जाते नजर त्याच्या घरावर?

सुंदर नसते कोणी, नसते सुंदर काही
आयुष्याचा तो तितका क्षण सुंदर असतो

ठेंगणे ठरवू नका कोणासही
आपली उंची जराशी वाढवा

 लाख वर्षे होत आली, यत्न अन् अवतार झाले
माणसाला माणसाळवणे तरीही शक्य नाही

सोसले होते दहा दुष्काळ वस्तीने
एकदाची मग तिथेही ढगफुटी झाली

निळे आकाश होते पण उडाया पंख लाभेना
भिमाचे बोट पकडुन भिरभिराया लागले सारे

नरकामधल्या सुखसोयी वाढल्यात नक्की
त्यामुळेच तर दिसते आहे इतकी वर्दळ!

उगवुनी येते नवे येथे शहर
विकृतीचे पेरल्यावरती जहर

डोळ्यांत आसवांचा दुष्काळ दाटल्याने
दररोज येत आहे हंगाम कापणीचा

शांत मी अन् बोलका एकांत माझा
बोलणे त्याचा, कृती हा प्रांत माझा

गुलाब, झेंडू, असो मोगरा बागेमध्ये
शेतामधली कोथिंबिर मज वेड लावते

लाख बीयांना सुरू होतात वेणा
झाकते सृष्टी धुक्याने तुर्त डोंगर

माणसाची दूरदृष्टी सांगते
माणसाची भूक आहे आंधळी

फार तो होता सुखी त्या झोपडीमध्ये
मग तिथे आले नवे वादळ रहायाला

तू जवळ असलीस की सारे विसरतो
तू जवळ नसल्यास काही सूचत नाही

मी तुला दिसतो तसा नाही
मी जसा आहे तसा आहे

~ राजीव मासरूळकर