सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Thursday, 11 May 2017

मेघपापणी

मेघपापणी

गहिवरलेल्या आभाळाने
हळु उचलली मेघपापणी
मुजरे करती झाडे वेली
पशुपक्षीही लक्ष करांनी

दिशा उधळती गुलाल वेड्या
सरणावरती बसल्या जाउन
क्षितिजाचाही कंठ दाटला
पाहत सारे डोंगरावरुन

वारा विझला, काळ गोठला
आभाळाची मिटे पापणी
क्षितिजाच्या अन् ओठी स्फुरली
क्षीण तांबडी विरक्त गाणी

या गाण्यांचा रातकिड्यांनी
अंधारातच उत्सव केला
मिटल्या डोळ्यांतच आभाळी
शुभ्र दाटला चांदणमेळा

असेच गेले हर्षित तन क्षण
नभास पडले स्वप्न विलक्षण
मिटलेल्या त्या पापणींचला
रविराजा हळु गेला चुंबून ...!

गहिवरलेल्या आभाळाने
पुन्हा उचलली चिंब पापणी
अवनीवरती तृणपात्यांवर
चांदणमौक्तिकांची विखुरणी ...!

~ राजीव मासरूळकर
दि. 06/10/2005

कवडसा

"कवडसा"

झुळुक हवीशी
मोहक दरवळ
शुद्ध शांतता
तन मन निर्मळ !

अपुर्व लाली
ढगांत होळी
दूर खगांच्या
सुरेल ओळी !

गवतावरती
विलसे सोने
कणसांमधले
भरती दाणे !

हिरवाईवर
खेळे वारा
नदीत सांडुन
चमके पारा !

रस्त्यावर मी
संमोहितसा
जपत मनातुन
लाल कवडसा !

~ राजीव मासरूळकर
   दि. २२.१०.२०१३

ज्वलंत बांध्याची मशाल दे

ज्वलंत बांध्याची मशाल दे

तुझा डौल दे, तुझा गाल दे
मिठीतला तो पुन्हा काल दे !

रदीफ माझी तुझा काफिया
नजाकतीचा तू खयाल दे !

दो नयनांचे वार रोखण्या
तव ओठांची मधुर ढाल दे !

ताज नको, सरताज नको मज
तुझ्याच प्रीतीचा महाल दे !

उडून जाता रंग जीवनी
तुझे सूर दे तुझा ताल दे !

पुन्हा नवी हो नव्या दमाने
ज्वलंत बांध्याची मशाल दे !

- राजीव मासरूळकर
मासरूळ, जि. बुलडाणा
दि २.२.२०१३
रात्री ९.०० वाजता

जादू

जादू
(बालकविता)

एकदा एक परी
उडत उडत आली
दंवाचे मोती
अलगद प्याली

प्यायल्या दवाने
जिरवले लाड
डोक्यावर उगवले
केसांचे माड

माडांना लगडले
नारळाचे घड
परीच्या पंखांनी
केली फडफड

पंखांच्या टोकातून
सुटले वादळ
माडांचे सगळे
आले खाली नारळ

नारळांचा झाला
मोठ्ठा आवाज
मुलांनी भरून
आले जहाज

जहाजामधून
उतरली मुले
नारळपाणी
पोटात गेले

पोटातल्या पाण्याला
फुटल्या उकळ्या
उमलून आल्या
बागेतल्या कळ्या

बागेतल्या फुलांचा
सुटला वास
माडांच्या मुळांचा
तुटला फास

तुटल्या फासातून
आला फेस
परीला लाभले
कुरळे केस

कुरळ्या केसांनी
केली जादू
परीच्या पुढे एक
अवतरला साधू

साधूने म्हटली
झऱ्‍यांची गाणी
परीला बनवले
पऱ्‍यांची राणी

पऱ्‍यांची राणी
हसली खूप
मिळाले तिला तिचे
सुंदर रूप !

- राजीव मासरूळकर

दूर ढगांना पाहून

@दूर ढगांना पाहून@
किती दिवसांनी आज
ऐकू आला गाजावाजा
दूर ढगांना पाहून
सुखावला बळीराजा
माना टाकलेली पिके ,
मेथी,पालकाची भाजी
दूर ढगांना पाहून
झाडे झाली ताजी ताजी
उल्हासली गुरेढोरे ,
कुरणातली कोकरे
दूर ढगांना पाहून
आली भरात पाखरे
आता वाजविल पावा
वारा होऊनिया कान्हा
सरीँवर सरी येता
नद्या सोडतील पान्हा
सांज मंजुळेल आता
गार होईल दुपार
आणि कष्टाचाच
घाम सुख देईल अपार !
- राजीव मासरूळकर
मासरूळ ,ता जि बुलडाणा

आठवतारा

सायंकाळी आठववारा तव झुळझुळतो आहे
डोळ्यांतिल मेघातुन पाउस रिमझिम गळतो आहे

स्मित तुझे पाहूनी, हृदय हे पहिल्यांदा धडधडले
अजूनही या हृदयाचा दर्या डुचमळतो आहे

कितेक आणाभाका चुटकीसरशी मोडुन झाल्या
नभी तुझ्यास्तव क्षणैक तारा अता निखळतो आहे

~ राजीव मासरूळकर

माझ्या शब्दांनो.... जागे व्हा!

माझ्या शब्दांनो,
जागे व्हा !

असे मेल्यासारखे कितीक दिवस
पडून राहणार आहात तुम्ही ?
मृत्यू हे अंतिम सत्य असेल .....
तुम्हाला ते लागू नाही...!
तुम्ही प्यायला आहात
इथल्या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक मंथनातून अवतरलेलं
महान सत्यामृत !

मी पाहतो आहे प्रखर वास्तव,
साहतो आहे आपल्यातल्यांचाच अत्याचार,
चाहतो आहे स्वार्थी जगात
अधुनमधून भेटणाऱ्‍या माणुसकीला,
राहतो आहे कोट्यावधी किड्यांच्या किरकिरीतही एकेकटा,
वाहतो आहे बेलगाम वाऱ्‍यासारखा निरूद्देश ,
दाहतो आहे स्वतःलाच आत्मपीडेच्या सरणावर
आणि नाहतो आहे निरागसांच्या नाहक सांडल्या गेलेल्या
रक्ताच्या थारोळ्यांत
क्षणोक्षणी . . . . . . .
तरीही तुम्ही गप्पच . . . ?

माझ्या मित्रांनो,
तुम्ही आत्मा आहात माझा
आणि मी तुमचं शरीर .....!
विसरू नका,
अजून मी जिवंत आहे....
तुमच्या विरहाचीच फक्त खंत आहे.
म्हणून म्हणतो , जागे व्हा !
मी पाहतो ते पाहून पेटून उठा !
मी साहतो , ते सहन न करता व्यक्त व्हा !
अन्याय अत्याचार करणाऱ्‍यांवर सक्त व्हा,
उमलणाऱ्‍या कळ्यांसाठी कौतुकभरला प्राजक्त व्हा,
हजारो हृदयातले तख्त व्हा,
मानवतेचे, महानतेचे भक्त व्हा,
व्हायचेच तर खरा माणूसच फक्त व्हा !
शाश्वत सुंदर वक्त व्हा !!

माझ्या आत्मिक शब्दांनो,
जागे व्हा , व्यक्त व्हा !
माणसाच्या हृदयामधून
झुळझुळणारं रक्त व्हा !

-राजीव मासरूळकर
दि.६ऑक्टोबर,२०१३