सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Thursday, 11 May 2017

घालमेल

घालमेल

अवेळी येणारा पाऊस
ठरवून
अवेळी येणा-या प्रणयधुंद प्रियकरासारखा
बेभान होऊन येतो
अन्
कित्येक दिवसांपासून
मोठ्या परिश्रमानं
संयमानं कमावलेलं
राखलेलं
सगळं काही
क्षणात उध्वस्त करून जातो........

बिच्चारी असहाय धरित्री
याच घालमेलीत चरफडत राहते
कित्येक दिवस
कि
ज्याची लालसा नेहमीच होती मनात दडून,
त्याने माजवलेला हाहाकार
अधिक क्लेषदायक आहे
की
दिवसेंदिवस वाढतच चाललेला
त्याने शमवलेला दाह
अधिक सुखद........???? ......!!!!!

~ राजीव मासरूळकर
दि. 27/02/2014
सायं.5:30 वा.

तुझी सर तुझ्या अंतरातून येते

निळ्यासावळ्याशा नभातून येते
तुझी सर तुझ्या अंतरातून येते

इथे ना जुमाने कुणी मत कुणाचे
तरी लोकशाही मतातून येते

खरे दु:ख झरते नितळ भावनेने
सिसारी विकारी सुखातून येते

जगायास प्रेरक असे जग इथे पण
निराशा, विरक्ती घरातून येते

- राजीव मासरूळकर

दु:ख घे उशास जीवनातले

घर तुझ्यात पाहिले मनातले
फूल मी तुझ्याच अंगणातले

कंठ दाटला सुखात याच की
सूर छेडलेस यौवनातले

आरपार घाल स्नान, पावसा
वाहु दे विकार या तनातले

शांतता जिथे, तिथे सुवासही
गुण दिसे तुझ्यात चंदनातले

सुख खुशाल भोग तू मिळेल ते
दु:ख घे उशास जीवनातले

~ राजीव मासरूळकर

'मी' दु:खाचे कारण होतो

रामाचाही रावण होतो
'मी' दु:खाचे कारण होतो

कोसळते ती अशी अचानक
ग्रीष्माचाही श्रावण होतो

घर छोटेसे होते तेंव्हा
मी आनंदी अंगण होतो

बरे जाहले जळून गेलो
कशाकशाचे वेष्टण होतो

~ राजीव मासरूळकर

पहारा

पहारा

हे निसर्गा , का दिला तू लोचनी पाऊस खारा ?
प्राशतो कोणी मुक्याने , मांडतो कोणी पसारा !

चंद्र तारे सूर्य वारे राहु दे स्वप्ने गुलाबी
द्यायचा तर दे मला तू , फक्त आता ध्रुवतारा !

ओरबाडूनी हजारो वादळे गेली तनाला
कोणताही स्पर्श देऊ ना शके आता शहारा !

दार घे लावून अलगद दीप मालव, ये जवळ अन्
घे मिठीमध्ये मला, कर बंद विरही कोंडमारा

वाटते मज घाव माझे नेहमी राहोत ताजे
ठेवला मी वेदनेचा सक्त जखमेवर पहारा !

- राजीव मासरूळकर
मासरूळ , बुलडाणा
दि १०.११.१२

पाऊस हा

**पाऊस हा**

आभाळ दाटून
येतसे मनात
ओथंबे तनात
पाऊस हा

मनाच्या कुशीत
दाटे हिरवळ
गुढ दरवळ
पाऊस हा

ओलावून जाते
आठवबियाणे
आर्त प्रेमगाणे
पाऊस हा

वाऱ्‍याच्या मिठीत
शिरतो सारखा
वेडा वीजसखा
पाऊस हा

ओल्या मातीवर
पावलाचा ठसा
भावी भरवसा
पाऊस हा

- राजीव मासरूळकर
पानवडोद,ता.सिल्लोड
जि.औरंगाबाद
दि १६.०६.१२
१७.२५ वाजता

आशा (1)

एकाएकीच
ही फुले
कशी झालीत निर्गंध???
मी आलो म्हणून
की तू.....???
आणि ही वा-याची धुंद सतार......
.... जी करायची गुंजारव
तुझ्या मधाळ केसांतून.......
कशी झालीय जेरबंद???
तो बघ,
अपरंपार मृगजळामागे धावतोय
एक परंपरावादी कस्तुरीमृग...
डोळ्यांच्या खाचा झालेला...
पुढचे दोन्ही पाय रक्ताळलेला...
फुले सुगंधीत कधी होतील.... कशी होतील??
वा-याची सतार कधी होईल बंधमुक्त....??
मृगजळी लाटा
रक्ताळलेले पाय
कधी धुतील.....???
या रक्ताच्या थारोळ्यात
तू यायलाच नको होतंस...
गुलाबपाणी समजून
भाबडेपणानं त्यात
न्हायलाच नको होतंस.....
आणि आता तर झालाय
सगळीकडे चिखलच चिखल...
कशी धुणार तू
तुझी ही डागाळलेली लक्तरं.....?
कशी जाणार घरी....??

आता क्षितीजही टाकून देईल
त्याची अपूर्व लाली
आणि लपवेल तोंड
अंधारमाखल्या पांघरूणाआड......
करशील हे क्षितीज पार....???

दूर
क्षितीजापार
उभा
तो यार
करी तलवार
लखलखे न्यारी
हेक्यात
ठोकी ललकार
जिव्हारी वार
हृदयी अंगार
भळभळे प्यारी.......!

ही कुठली वेल
येतेय सरसरत माझ्याकडे
चवताळलेल्या नागिणीसारखी...
लपेटतेय माझे अंग-लिंग
वलयाकार.....?
आशा,
जा तू इथून
थांबू नकोस जराही....
झाडाला भोवळ यावी तसं होतंय मला....
आणि हे काय....
अजस्र डायनोसोरसारखा
तो पिरेमिड का येतोय
धावत माझ्याकडेच....
नि सडत चाललंय माझं सबंध शरीर
या वेलीच्या वलयाकार वेढ्यांत.... ???
मी ममी तर नाही ना...??
नाही ssss...
मी आहे पोतराज!!
दूर हो तू,
आशा,
दूर हो...
अन्यथा
बसेल तुझ्या गुलाबी देहावर
एखादा अस्वस्थ आसूड
माझ्या सडत्या पाठीऐवजी......
पण
तू आहेस तरी कुठे... आशा???
की
ही सळसळती वेल होऊन
तूच तर नाही ना आलीस.........?
मला घेरायला...
मला मारायला........?????

~ राजीव मासरूळकर