कुणा कळला न कळला पण तुला कळणार आहे मी
तुला जाणीव आहे ना, पुुन्हा छळणार आहे मी
तुझे स्वागत कराया घर सजवले प्राणपुष्पांनी
फुलांचे कोडकौतुक सोड दरवळणार आहे मी
जुना तिस-या दिशी होतो नवा घेताच मोबाइल
अशा बेभान वेगानेच वळवळणार आहे मी
सुखाची हौस पुरवाया धरा कंगाल केली अन्
भुकेखातर उद्या बघ चांदणे दळणार आहे मी
तुझ्या डोळ्यांत हतबलता, पराजय पाहता आला
अता डोळ्यांतुनी माझ्याच ओघळणार आहे मी
इथे आहे, तिथे आहे, चराचर व्यापुनी उरतो
जळे हा देह केवळ पण कुठे जळणार आहे मी
~ राजीव मासरूळकर
दि.13/11/2018
10:50 pm