सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Monday, 11 May 2020

सामना


अखेर
रंगला आहे
पोट आणि मृत्यू यांच्यात
एक अटीतटीचा अंतिम सामना

सामना...
घास मिळवण्याचा!

सामन्याने गाठले आहे
इतके रोमांचक शिखर की
पंचही विसरून गेले आहेत स्पर्धेचे कडेकोट नियम
आणि बघत बसले आहेत बेभान होऊन
कोण कुणाचा घास घेतो ते...

गोंधळभरल्या कोलाहलाच्या चित्कारांत
विरून गेले आहेत निस्तेज आवाज
फाऊल.. हाऊज दॅट आणि निषेधांचेही

मनात असीम उत्कंठा ठेवून
प्रचंड अस्थिरतेचा प्रेक्षक होत
मी ही बसलेलोच आहे
सामन्याच्या अंतिम क्षणाचा आस्वाद घेण्यासाठी
अधाशासारखाच...!

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि.11 मे, 2020

Wednesday, 6 May 2020

कवी


कवी कसा दिसतो हे कुणालाच माहित नाही
कवी शोधूनही अगदी कुठेच सापडत नाही
त्याच्या पत्त्यावरही सापडत नाही त्याचं घर
तिथे सापडतात फक्त
त्याच्या चुकल्याहुकल्या फेकून दिलेल्या काही निष्पाप ओळी
सापडतो एखादा पाळीव प्राणी
त्याने आधीच त्यागलेल्या पाळीव इच्छांचं पालन करणारा
एखादवेळी सापडू शकते
कविता लिहिण्यात मग्न कवीकडे
तासन् तास मुग्धपणे पाहत बसणारी
त्याची लुब्ध प्रेयसी
खरं सांगायचं तर तिलाही कवी कधीच सापडलेला नसतो
कवी कसा दिसतो हे तिलाही माहित नाहीच
कवीच्या घरात
कवी राहत असल्याच्या इतर कुठल्याच खाणाखुणा नाहीत
दारावर एखादी चमकदार पाटीही डकवलेली नाहीय
त्याच्या रुबाबदार वगैरे नावाची

कुठल्याच कार्यालयात उपलब्ध नाही
कवीच्या जन्माचा दाखला

ही कविता त्यानेच लिहिली आहे
कि कुणी खपवली आहे त्याच्या नावावर
स्वत:चे विचार घराघरात पोहोचवण्याच्या उदात्त हेतूने
नकळे

की
हा कवी
आणि त्याची ही कविता
निव्वळ एक थापच आहे?

~ राजीव मासरूळकर
   दि.06/05/2020
   औरंगाबाद

Saturday, 2 May 2020

घोषणा


त्यांनी सांगितलं
भूकंपाचे झटके जाणवले की लगेच घराबाहेर पडा
मी घराबाहेर पडून मोकळ्या जागी आलो

त्यांनी सांगितलं
समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळणार आहेत
मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये
मी टाकला माझ्या बोटीचा नांगर
अन् सुरक्षित पोहोचलो किना-यावर

त्यांनी सांगितलं
त्सुनामी येणार आहे
समुद्रकिना-यावरची सगळी गावं रिकामी करा
मी समुद्रकिना-यापासून कोसो दूर असलेल्या
माझ्या मूळ गावी जाऊन
सुरक्षित जगू लागलो

त्यांनी सांगितलं
तुमच्या शहरात शिरला आहे भयावह कोरोनाव्हायरस
शहराच्या सर्व सीमा बंद करून
घोषीत केली गेलीय कडकडीत टाळेबंदी
मुळीच घराबाहेर पडू नका
मी माझा इवलासा पापभिरू जीव मुठीत धरून
शहरातल्या घरातच
दबा धरून बसलो आहे....

आता
मला राहून राहून आठवण येतेय
भूकंप, वादळ, त्सुनामीवेळच्या
कल्याणकारी करूणामय घोषणांची !

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि.02/05/2020

Friday, 1 May 2020

पैलू

खोदू लेण्या मंदिर बांधू
ताजमहल अन् स्तूप उभारू
पिरॅमीड ते बुर्ज खलिफा
चढवू मजले, पुट्टी मारू

उचलू ओझे मारू रंधा
लावूनिया खांद्याला खांदा
जगास अवघ्या पैलू पाडू
खात भाकरी चटणी कांदा

डोंगर फोडू काढू रस्ता
वेचू कापुस, बनवू गाठी
यंत्र चालवू, नाल्या काढू
होत मायबाबाची काठी

करू इमानेइतबारे जे
मालक सांगे दमदाटीने
हलगर्जी वा चूक एकही
रस्ता घरचा मत्त सहीने

हातावरचे पोट आपले
डोक्यावर संसारगठोडे
जमेल तितके सहन करू पण
अति झाले तर लावू घोडे

काळ परीक्षा घेत राहतो
बनू संयमी हिंमत दावू
येणारे युग अपुले आहे
मन, मेंदू परजूया बाहू

~ राजीव मासरूळकर
   दि.01/05/2020
  

Thursday, 30 April 2020

खिडकी

खिडकी

विरंगुळा जगण्याचा आहे झाली खिडकी
विश्व नव्या इच्छांचे  साजुक व्याली खिडकी

देहाचे डोळे करतो अन् पाहत बसतो
चेटुक ओठांवरची दाहक लाली खिडकी

थेट नभाच्या घरातही डोकवता येते
खिडकीमध्ये खिडक्या घेउन आली खिडकी

रस्त्यावरचा मधाळ वारा खुणावतो, मग
लाजत लाजत हसू फुलवते गाली खिडकी

सूर गोडवा गंध गारवा सळसळ कातर
देत कवडसा सुखात एकट न्हाली खिडकी

क्षण दु:खाचे किती पचवले एकांती अन्
दबली आनंदाच्या ओझ्याखाली खिडकी

लग्न प्रेयसीसोबत झाले त्या घरट्याचे
म्हणून दिसते प्रसन्न त्याची साली खिडकी

झाली तर होऊ दे सगळी बंद कवाडे
एक असावी उघडी पण भवताली खिडकी

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि.30/04/2020

Wednesday, 29 April 2020

चंगळ

चंगळ

सुरूवातीचे काही दिवस
सहस्त्राक्ष अन् लक्षकर्ण होत
आम्ही चिकटून बसलो टीव्हीला
ब्रेकिंग न्युज झाल्यासारखेेच
मग व्हाट्सॅप, फेसबुक, युट्युब, टिकटॉक, इंस्टाग्रामवर
आळीपाळीने उड्या मारत
टाईमपास केला यथेच्छ
टाळ्या वाजवल्या, दिवे लावले, प्रार्थना केल्या
पुन्हापुन्हा किराणा भरला
पुन्हापुन्हा भाजीपाला आणला
व्यायामही केला जमेल तसा
साऊथ, बॉलीवूड, हॉलीवूडचे
अंगांगांगांगावर चालून येणारे
रग्गड सिनेमे बघितले
नेटफ्लिक्सवरच्या वेबसिरीज बघत
रियाज केला स्वत:तल्या क्रौर्याचा
रात्रंदिवस जमेल तशी
संधी साधत
कधी कंटाळलेल्या जीवनसाथीसोबत
तर ब-याचदा पोर्नस्वर्गसाईट्सवर
मिळवला हवाहवासा अघोरी ऑरगॅझम
गच्चीवर जाऊन न्याहाळल्या
इतरांच्या गच्चीवरल्या चुकचुकत्या चांदण्या
घरात मुद्दाम साठवून ठेवलेला
ईश्वरीय अमृतकुंभ संपवत
झिंगत राहिलोत काही दिवस
रात्रीबेरात्री गुपचूप घराबाहेर पडत
अधाशासारख्या फुंकल्या फकाफक सिगरेटी
एकदोनदा पार्श्वभागावर बसली जादूची कांडी
डोळ्यांसमोर प्रकटले
लक्षावधी लखलखते विषाणू
मग घरात असल्यानसल्या पुस्तकांत डोकं खुपसून बसलो
पोरांसोबत खेळत बसलो
चेस, कॅरम, चंफूल, पत्ते, अंताक्षरीसारखे पोरखेळ
आखाजीदिवाळीला करतात तशी
लखलखीत साफसफाई केली घराची
स्वत:च स्वत:च्या बटा (आय मीन जटा) सावरत
घोटून घोटून केला चकचकीत गोटा
गुळमुळीत कविता लिहिल्या,
आंबटचिंबट व्हिडीओज केले
चटकमटक पदार्थ बनवून खाल्ले
काही नव्याने शिकून घेतले
आदळआपट करत भांडी घासली
मरणयातना सोसत पायपीट करणा-या
बेघर मजुरांसाठी कळवळलो
ऋतूंचा द्रोह सोसणा-या
हतबल शेतक-यांसाठी अश्रू ढाळले
एका आदिम टोळीचेे आजीव सदस्य होऊन
दुस-या आदिम टोळीला शिव्या हासडल्या
सगळंसगळं केलं
अगदी भक्तीभावानं
आलटूनपालटून
उततमातत

तरीसुद्धा
मनमेंदूच्या सर्वशक्तिमान गारूडावर
फिरूनफिरून घिरट्या घालतच आहेत
भीती, नैराश्य, कंटाळा, वैफल्य, वैराग्याचे
थवेच्या थवे...

काम नाकारलेल्यांच्या
बेघरांच्या रांगेत
रहावं लागलं असतं आपल्यालाही उभं
तर.....?

किती दिवस करता येईल
अशी खाण्यापिण्याजगण्याभोगण्याची
परावलंबी चंगळ ...?

म्हणून
सतत जीवघेण्या संकटांच्या युद्धजन्य जबड्यात
अडकत चाललेल्या
वर्तमानांकित भविष्यात
हे बिचारं वैफल्यविषाणुग्रस्त हळवं मन
रमवावं तरी कसं
हा एकच प्रश्न
मला भंडावून सोडतोय.

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि.29/04/2020

Monday, 27 April 2020

सत्य



मी शोध घेत राहिलो
वारंवार शोध घेत राहिलो

अन् सापडल्या फक्त दोनच गोष्टी...

एक  :
देव नाही
म्हणून हे जग इतकं क्रूर आहे.

दोन  :
देव आहे
आणि तो खूप क्रूर आहे...!

~ राजीव मासरूळकर
    औरंगाबाद