सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Saturday, 27 February 2021

प्रत्यंतर

 आपल्यामधे कितीक आहे अंतर शोधू

आपल्यातले साम्य हवे तर नंतर शोधू


चमत्कार घडणे तर अत्यावश्यक आहे

पुन्हा नव्याने जुनेच जंतरमंतर शोधू


टोक कोणतेही देहाला रक्त मागते

आपण आता टोकाचे मध्यंतर शोधू


काहीही करण्यावाचुन गत्यंतर नाही

काहीही करण्यावरही गत्यंतर शोधू


जे आहे ते शोधण्यात आयुष्य संपते

युगे युगे जे नाही तेच निरंतर शोधू


जे नाही ते आहे यावर सहमत होऊ

जे आहे ते नसल्याचे प्रत्यंतर शोधू


~ राजीव मासरूळकर


पळस

 पळस

होऊ शकतो

नखशिखांत हिरवाकंच

पुन्हा

झडझडून निष्पर्ण होत

होऊ शकतो

तितकाच भगवाही

हे घडताना

ऋतुगणिक

वाढतच जात असतं 

पळसाचं सौंदर्य...


काही केल्या

होता येत नाही मला पळस

मी फक्त

राहू शकतो त्याच्यासमोर उभा

अपराध्यासारखा...

आत्मचिंतन करत...


- राजीव मासरूळकर

  दि. २६.०२.२०२१


Monday, 14 September 2020

जीव चरकतो आधी, नंतर गोडी येते

 घोकुन घोकुन कुणास अक्कल थोडी येते

जीव चरकतो आधी, नंतर गोडी येते


उसतोडीचे यंत्र बनवता येऊ शकते

त्या हातांच्या भविष्यात उसतोडी येते


ज्यास जगाचे कठोरपण कळलेले आहे

त्यास निरागस कृष्णाइतकी खोडी येते


दोन चोर राहतात सोबत घरात एका

दोघांपैकी एकाला घरफोडी येते


निष्ठावंतांनी केवळ चाकरी करावी

सत्ता त्याची ज्यास इथे कुरघोडी येते


कार्यमग्न तन, शांत मनाचा सागर ठेवा

ऐलतिरावर भव्य यशाची होडी येते


- राजीव मासरूळकर

  दि.१३/०७/२०२०

  

Sunday, 19 July 2020

मी उन्हाचे चित्र कायम सावलीवर काढतो

दाबतो वाईट खाली चांगली वर काढतो
जन्म अख्खा जन्म एखाद्या सलीवर काढतो

शांततेमध्ये असे सौंदर्य विश्वाचे खरे
ज्यास धरणीकंप प्रिय, तो दंगली वर काढतो

सांग विश्वासार्ह मानावे उजेडाला कसे
आतले काळेच जर तो गोखलीवर काढतो

ज्यास कळते या जगाची साळसुद फसवेगिरी
पीक जन्माचे उभ्या तो दलदलीवर काढतो

रोग दुनियेचा मलाही लागला आहे जणू
मी उन्हाचे चित्र कायम सावलीवर काढतो

- राजीव मासरूळकर
  दि.१९ जुलै, २०२०

Sunday, 7 June 2020

आकड्यांचा खेळ


आकड्यांचा खेळ वाईटच...

आकडे सुरूवातीला आश्चर्याचा धक्का तरी देतात
किंवा घाबरवून तरी सोडतात आपल्याला

काही दिवस बेरीज, वजाबाकी सुरू राहते आलटूनपालटून. धाकधुक चालते क्षणाक्षणाला जिकडेतिकडे. 
मग अधूनमधून गुणाकार व्हायला लागतो.
आकडे फुगायला लागतात.
ते फुगायला लागले की
अक्षरश: भंडावून सोडतात आपल्याला काही दिवस
सुचूच देत नाहीत दुसरं काहीही
कधी आनंदही देतात
तर कधी चिडचिड होत राहते सतत

सरावाने होऊ लागते आकड्यांची सवय
मग भागाकारही व्हायला लागतो आकड्यांचा
लपवाछपवी झाली तरी आपल्याला फरक पडेनासा होतो मग
मग आपण चक्क दुर्लक्षही करायला लागतो आकड्यांकडे
आकडा फुगला काय, रोडावला काय
काहीच वाटत नाही आपल्याला

आकड्यांवरून नजर फिरत राहते,
 पण त्यांचा अर्थ मेंदूपर्यंत पोहोचेनासा होतो
निर्विकार होत जातो आपण आकड्यांच्या बाबतीत
कोरडेठक्क होत जातो
कठोर होतो
मग हादरवून सोडू शकत नाहीत आपल्याला आकडे पुर्वीसारखे
आनंदही देऊ शकत नाहीत

मग चक्क आकडे पाहणंच बंद करून टाकतो आपण
अर्थात आकड्यांमुळे डोकेदुखी वाढू नये
याची पुरेपूर दक्षता घेण्यात सराईत झालेलो असतो आपण

आपण स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ काढायला लागतो
जन्ममरण असो, स्थावरजंगम असो,
धंदापाणी असो, भावभावना असो,
पसारा वाढत जातो
आपल्या प्रिय कुटुंबाला
आकड्यांच्या या भीषण खेळापासून
दूर ठेवण्याच्या प्रयत्नातही असतो सतत
तरीही कुठल्यातरी माध्यमातून आलेच आकडे समोर,
तरी ते करू शकत नाहीत आपल्याला विचलित.

आकडे आपली नजर मारून टाकतात
की आपली नजर आकड्यांना मारून टाकते ...
नकळे!

आकड्यांचा खेळ वाईटच!

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि. 5 जून, 2020

Wednesday, 3 June 2020

ङ् , ञ् व त्र

DrVinayak Kapure यांनी त्यांच्या फेसबुक भिंतीवर उपस्थित केलेला प्रश्न असंख्य मराठी अबालवृद्धांच्या मनातला प्रश्न असल्याने तिथे comment म्हणून दिलेलं उत्तर थोडं विस्तृत स्वरूपात सर्वांसाठी इथे देत आहे. (अर्थात मराठीच्या जाणकारांना हे माहित आहेच, तरीही.)

#ङ_ञ_व_त्र

मराठी शिकणा-या, बोलणा-या शालेय वयाच्या बालकापासून पुढच्या कोणत्याही वयोगटातील अनेकजणांना मराठी वर्णमाला पाहिल्यावर एक प्रश्न हमखास पडतो कि हे ङ (वाङ्मय हा अपवाद वगळून) व ञ आपण मराठी लिहिताना कुठेच वापरत नसताना, का बरं वर्ण म्हणून शिकवले जात असावेत? बरं शाळेत यांचं लेखन व वाचनही शिकवणारे शिक्षक विरळाच. कसा उच्चार करायचा यांचा? मग काही जिज्ञासू शिक्षकांचा अपवाद वगळला तर ङ ला ड आणि ञ ला त्र म्हणत शिकवलं जातं. त्या शिक्षकांचासुद्धा तसा दोष नाहीच, कारण त्यांच्या गुरूजींनीही त्यांना असंच शिकवलं असणार. मग काय आहेत ही अक्षरं नक्की?

मराठी वर्णमालेतील व्यंजनांच्या पहिल्या दोन ओळी (वर्ग) अशा आहेत  :
क् ख् ग्  घ् | ङ्    (क वर्ग)
च् छ् ज् झ्  | ञ्    (च वर्ग)

ज्या शब्दात क, ख, ग, घ यापैकी एखादं अक्षर असून त्यांच्याआधी आलेल्या अक्षरावर अनुस्वार असतो, तिथे तो अनुस्वार ङ् असतो. उदा. शंख, अंग, रंग, अंक, अंघोळ, इ. पुर्वी हे शब्द शङ्ख, रङ्ग, अङ्ग, अङ्क, अङ्घोळ असे लिहिले जात. यावरून ङ हा क, ख, ग, घ शी संबंधित अनुनासिक आहे हे यावरून लक्षात येईल व त्याचा नेमका उच्चारही लक्षात आला असेलच.

ज्या शब्दात च, छ, ज, झ यापैकी एखादं अक्षर असून त्यांच्याआधी आलेल्या अक्षरावर अनुस्वार असतो, तिथे तो अनुस्वार ञ असतो. उदा. मंच, अंजीर, मांजा, कंचे, झुंज, , इ.  हे शब्द पूर्वी मञ्च, झुञ्ज, अञ्जीर, माञ्जा, कञ्चे इ. असे लिहिले जात. यावरून ञ हे च, छ, ज, झ शी संबंधित अनुनासिक आहे हे लक्षात येऊन त्याचा नेमका उच्चारही समजला असेलच.

वाङ्मय हा शब्द वाक्+मय (संधी) असा आहे,  त्यात क् चा ङ् झाला  आहे. वाङ्निश्चय सुद्धा तसाच. संधी नसेल, स्वतंत्र वर्ण म्हणून वापर नसेल, केवळ अनुनासिक म्हणून येत असेल अशा ठिकाणी ङ् व ञ् हे टिंब/अनुस्वार म्हणून आधीच्या अक्षरावर येतात.

ञ हा अनुनासिक आहे तर त्र हे त् + र = त्र असं जोडाक्षर आहे. दोन्ही भिन्न अक्षरं आहेत आणि त्यांचा उच्चारही भिन्न आहेत हे आता स्पष्ट झाले असेलच.

मराठीत ङ (क वर्ग), ञ (च वर्ग), ण (ट वर्ग), न (त वर्ग) आणि म (प वर्ग) असे पाच अनुनासिकं आहेत. यातील ण, न व म ही स्वतंत्र अक्षरं म्हणून वापरली जातातच,
पण ङ व ञ प्रमाणेच ते कंठ, कंद, कंप या व अशाच अनेक शब्दांत त्या त्या वर्गातील अक्षरांच्या अगोदरच्या अक्षरांवर अनुस्वाराच्या स्वरूपात विराजमान असतात. क, च, ट, त व प या पाच वर्गांतील अक्षरांआधी येणा-या अनुस्वारांचा उच्चार पाच भिन्न प्रकारे होतो, म्हणून प्रत्येकासाठी भिन्न वर्ण उपयोजिला आहे. भाषेत होणा-या प्रत्येक उच्चारासाठी स्वतंत्र वर्ण असावा असा विचार यामागे आहे. मात्र वरील पाचही वर्गांत नसलेल्या श, स व ह या वर्णांअगोदर आलेल्या अनुस्वाराचा उच्चार  वेगळा आहे हे ही लक्षात घ्यावे. उदा. वंश, कंस, सिंह, इत्यादि.

म्हणूनच, जर मराठी वर्णमालेत ङ व ञ हे वर्ण विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी दिलेले आहेत, तर ते शिक्षकांनी शाळेत वरीलप्रमाणे समजावून सांगायला हवेत. अगदी पहिल्या वर्गातच नको, पण पाचवी किंवा पुढील वर्गातील विद्यार्थ्यांना हे नक्की समजू शकेल. ते समजून सांगायला ग्रंथालयांत उपलब्ध स्वातंत्र्यापूर्वी प्रकाशित किंवा मराठीत अनुस्वाराचे नियम बदलण्यापूर्वी छापलेल्या मराठी पुस्तकांचा वापर करणं शक्य आहे. ते उपलब्ध नसतील तर काही संस्कृत सुभाषितांची मदत नक्कीच घेता येईल.

आता तुम्हाला समजला असेलच, तर शिकवाल ना आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना , आपल्या संपर्कातील सगळ्या मराठी भाषकांना ङ् काय असतो ते?  ञ व त्र मधला फरकही शिकवाल ना?

~ राजीव मासरूळकर
   दि.02 जून, 2020



Monday, 25 May 2020

वारी

दिंडी निघाली आहे पायी
दोनचार कच्च्याबच्च्यांच्या
एकदोन पिकल्या जीवांची पालखी करून
आयुष्याचं वृंदावन डोक्यावर घेत
कोसो दूर...

विटलेल्या लक्तरांच्या असंख्य पताका लोंबकळताहेत क्षीणपणे
स्वत:च्या जात, धर्म, पंथाची ओळख
उघडी पडू नये
याची काळजी घेत

दिंड्या निघाल्याहेत चहुबाजूंनी
अंधाराची, उजेडाची , ऊन, वारा, पावसाची
भुकेचीही तमा न बाळगता
सरकताहेत पुढे पुढे पुढेच
अबीर... गुलाल उधळण्याइतकी शक्ती उरलेली नाहीय
कुठल्याच हातात
मात्र थकल्याभागल्या अवस्थेतही
स्वाभिमानी जिद्दी पाय
तप्त रस्त्यांवर उमटवत आहेत
आत्मनिर्भर रक्ताचे लालबुंद ठसे
काळमार्गावरील मैलाचे दगड ठरत...

दरवर्षी असायचेच हमखास
इथेतिथे खुणावणारे हवेहवेसे मुक्काम
पण यावेळी मात्र रद्द झाले आहेत मधले सगळे मुक्काम
ठरलेल्या एकमेव मुक्कामाकडे
वारी करीत आहे  बेधडक मार्गक्रमण
अधुनमधुन रंगत आहे
श्वासांच्या उभ्या आणि गोल रिंगणांचा अनुपम्य सोहळा
प्राणांचे प्रकाशवेडे अश्व
सजूनधजून उधळत आहेत चौखूर
हे असं रिंगणात उधळणं
म्हणजेच रिंगणातून खरी सुटका...
हे कळून चुकलंय
सगळ्याच अश्राप वारक-यांना

वारीचं हे आगळंवेगळं रूप अनुभवताहेत
वारीचा जिवंत अनुभव नसलेले असंख्य बिचारे लोक
घरबसल्या लोळत आळसावत साग्रसंगीत

ही वारी जातेय एखाद्या गडगंज किर्तीवंत तिर्थक्षेत्राकडे
असं म्हणावं
तर त्यांचे सर्व दरवाजे झालेयत कधीचेच कडेकोट कुलुपबंद...
ही वारी निघालीय
गाव नावाच्या तिर्थक्षेत्रातल्या
घर नावाच्या मंदिराकडे...

वारकरी करताहेत प्रचंड घाई
त्यांना पोहोचवायची आहे आपापली दिंडी
गंतव्यस्थळी वेळेत
गाभा-यातली महापूजा अनुभवण्यासाठी!

मात्र
महापूजा होणार की नाही
झालीच तर करणार कोण
हे काही ठरता ठरत नाहीये....!

~ राजीव मासरूळकर
   दि.25 मे, 2020
   औरंगाबाद