सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Thursday, 11 May 2017

जागर मराठीचा

जागर मराठीचा

थेंब मी आहे इथे सागर मराठीचा
तनमनामध्ये दिसे वावर मराठीचा

बघ अजिंठा, वेरुळाला अन् विठोबाला
फुटतसे सह्याद्रिला पाझर मराठीचा

मागणे आहे तुझ्यापाशी  जिव्हाळ्याचे
हे मना, तू कर सदा जागर मराठीचा

मायभू, आई, परस्त्री वंद्य आम्हाला
अन् शिवाजीएवढा आदर मराठीचा

इंग्रजीवर स्थापण्या सत्ता मराठीची
कर मराठी माणसा वापर मराठीचा

~ राजीव मासरूळकर
   मराठी राजभाषा दिन
   दि.27/2/15 19:00

शेतक-याच्या ओठावरही फुलावी पावसाची आल्हाददायक कविता

आभाळ भरून आलं आहे....भुरभुरायलाही सुरुवात झालीय काही ठिकाणी.....झाडं तरारलीयेत
पाखरं भरारलीयेत...हृदयाच्या कुपीत मृद्गंध भरू पाहणा-या तरूणाईला, कवीमनांना किती प्रसन्न... आल्हाददायक वाटतंय म्हणून सांगू...! आसुसलेत सगळे थेंबांचे मोती झेलायला....पण जिकडे तिकडे डोक्याला हात लावून बसलाय आमचा शेतकरी राजा...सोन्यासारखा पिवळा झालेला गहू सोंगायचा बाकी आहे अजून शेतात...हरभरा सोंगून पडलाय
पण थप्पी घालायचीय त्याची अजून...सूर्यफुलाचा ढिग करून ठेवलाय हसत हसत, पण थ्रेशरवाला आज आज उद्या उद्या करतोय मळणी करायला...पाखरं हाकलून हाकलून राखलेली शाळू थरारतेय ढगांचा गडगडाट ऐकून...भाव कमी असला तरी फरदडीतून किमान घरखर्च तरी भागेल या आशेनं उभी ठेवलेली कपाशी वाचव वाचव म्हणत झुकली आहे धरणीमातेच्या पायांशी जोरदार वादळाच्या चाहुलीनं... ऐन हुरड्यात असलेल्या हिरव्यागार मक्याची गाळण उडालीय भुईसपाट करणा-या गारपिटीच्या भितीनं.... कधी नव्हे तो फांदोफांदी मोहरलाय शेतातला आंबा..... विहिरीत मेहबानी करून झिरपणा-या पाण्यावर वीजमंडळाच्या विश्वासघातकी भारनियमनाच्या वेळापत्रकासोबत लपंडाव खेळत तळहातावरच्या फोडासारखी जपलेली पिकं एका क्षणात नष्ट झालीत तर करायचं???  कर्जाचा डोंगर कसा पार करायचा???  मुलाचं शिक्षण.. मुलीचं लग्न कसं करायचं???  बायको कशी  काळीठिक्कर झालीय वठलेल्या झाडासारखी शेतात राबून राबून.....

पावसा, तुला थोपवणं तर शक्य नाहीच; पण येणारच असशील तर हळुवार ये रे बाप्पा, वावधन घेऊन येऊ नकोस सोबत... शेतातलं पीक पाहून बळीराजाच्या मनात बहरलेल्या स्वप्नाची वाताहत करू नकोस राजा... त्याच्याही ओठांवर फुलू दे तुझ्या आगमनाची एखादी आल्हाददायक कविता!!!

~ राजीव मासरूळकर

रंगी लावून गेलं आभाळ

रंग लेवून आलं आभाळ
रंगी लावून गेलं आभाळ !

लाली आली अशी
की पलाश फुले
शुक्रतारा हसे
आसमंती निळे
सोनं पिऊन आलं आभाळ !

झालं पाणी निळं
हिरवी हिरवी शेतं
रंग चराचरी
भिनले ओतप्रोत
चांदी चढवून आलं आभाळ !

शुभ्र काळे ढगं
वारा आणी वरी
हात फिरवी थोर
ढगांचा रंगारी
फाग खेळून आलं आभाळ !

पक्षी परतले
गायी झाल्या पिशा
गोड पावा घुमे
झाल्या राधा दिशा
कृष्ण होऊन गेलं आभाळ !

चकाके चांदण्या
रास खेळे दुधी
श्वेत बाहुंत घेई
चंद्र विश्वनदी
प्रेमरंगात न्हालं आभाळ !

- राजीव मासरूळकर

मी नाही विकृत

मनातली प्रत्येक भावना करून उद्धृत
स्वत: स्वत:ला सांगावे, मी नाही विकृत

शेतकऱ्याच्या रक्ताचे झाल्यावर पाणी
शेतामध्ये अवतरते घामाचे अमृत

मरणाची मी कधी भिती ना बाळगलेली
भिती वाटते, त्यानंतर जर झालो विस्मृत

परिपुर्णत: माणुस असते हरेक नारी
नसते केवळ योनी किंवा देह अलंकृत

~ राजीव मासरूळकर
   दि.6/11/14

ऊन सकाळी पडावे असे चोरून चोरून

**ऊन सकाळी पडावे**

ऊन सकाळी पडावे असे चोरून चोरून ।
जसा चंद्र चांदणीला पाही ढगापल्याडून ।।

दवबिंदू मिसळावे क्षणी पानांच्या मनात ।
जावा भिजूनिया वारा त्याच्या तनात तनात ।
यावा अंधार अंधार जणु सोन्याने मढून ।।

रानामधून घुमावी शीळ कोकीळ मैनेची ।
गालागालात हसावी खुळी कळी सृजनाची ।
यावा सुगंधही जसा उन्हामध्ये वितळून ।।

ऊन दुपारचे मग जावे ढगांत विरून ।
थेंब पावसाचे यावे माझ्या डोळ्यांत भरून ।
घरट्यात पाखरांच्या जावे माऊली होऊन ।।

सूर्य क्षितिजाच्या आड जरा उशिरा बुडावा ।
उन्हातून पसरावा लाल पिवळा गोडवा ।
सांज उन्हात ही अशी जावी पुरती भुलून ।।
जसा चंद्र चांदणीला पाही ढगापल्याडून ।।

ऊन सकाळी पडावे . . . . . . . . .
उन सकाळी पडावे . . . . . . . . . . . . . . . . !

- राजीव मासरूळकर
मु . पो . मासरूळ
ता . जि . बुलडाणा

तुला एक प्याला, मला एक प्याला

असा स्पर्श व्हावा फुलाचा फुलाला
शहारुन भुई गंध यावा नभाला

जरा दु:ख रिचवून घेऊ जगाचे
तुला एक प्याला, मला एक प्याला

जिथे सावली वाढ होऊ न देई
तिथे बोल लावू कसा मी उन्हाला

तुझा बाप शेतात  मेला  नसावा
म्हणुन पावसा तुज असा माज आला

~ राजीव मासरूळकर

माजमहिना

माजमहिना

सज्जनांनो,
हा कुत्र्यांचा माजमहिना आहे !
तेव्हा दिसलंच काही
असलं तसलं नजरचुकीनं
तर डोळे घ्या मिटून
आणि आणू नका चुकूनही
मनात काही हिडीस फिडीस
नाहीच जमलं हे तर
जपमाळ घ्या हातात
आणि जाऊन बसा माजघरात
म्हणाल तर हा रिवाज
तसा फार जुना आहे
पण लक्षात ठेवा
हा कुत्र्यांचा माजमहिना आहे !

ते आता येतील
झुंडीझुंडीने
वेशीवर एक तंगडी वर करून
ती धावेल
शेपूट खाली घालून
जीवाचा आकांत करून
सैरभैर . . .
पण धावण्यात तेही तेवढेच तरबेज !
भरचौकात
चहुबाजूंनी घेरून फिरतील तिच्या भोवती गोल
आणि आळीपाळीने घेतील
तीचा यथेच्छ उपभोग !
घराच्या उघड्या खिडक्या करा बंद
काचा असतील तर पडदे घ्या ओढून
रस्त्यावर असाल तर पावलं घ्या वळवून
आपल्यासारख्या पुण्यवानांना
तिकडे जाणं मना आहे,
कारण हा कुत्र्यांचा माजमहिना आहे !

यदा यदा हि जीवनस्य
ग्लानिर्भवती भारत ।
अभ्युत्थानंमर्मस्य
तदात्श्वानम् सृजाम्यहम् ।।

ही कुत्री कुठं राहतात ?
तळ्यात मळ्यात उमलत्या कळ्यांत
गुराढोरांत नवट्या पोरांत
देवळात घरात ज्ञानमंदिरात
इथं तिथं चराचरात !

सौंदर्यावर तंगडी वर
फुलं चुरगाळून करती मलूल
हाडं मुरगाळून पाडती मढे !

डोळे कान तोंड बंद
गांधीजी के बंदर बन
हात थोटे पंगू पाय
श्वास चालू मरो माय !

सुविचार सोडून शिष्टाचार मोडून
नखरेल नट्यांचा नवखा नंगानाच
बघणारांचाच हा जमाना आहे !
सज्जनांनो
हा कुत्र्यांचा माजमहिना आहे !

कुत्र्यौर्ब्रम्हा कुत्र्यौर्विष्णूः
कुत्र्यौर्देवो श्वानेश्वरः
श्वानः साक्षात परब्रम्ह
तस्मै श्री श्वानै नमः

कुत्री खातात भाकरी
कुत्री करतात चाकरी
कुत्री चरतात उकीरड्यावर
कुत्री तरतात उष्टावळीँवर!
कुत्री बसतात नेहमी टपून
आंबटशौकीन कातडी जपून !
प्रत्येकाच्याच मनात एक
कुत्रा असतो खोल खोल
लाळ गाळत वासनेचा
पिटत असतो ढोल ढोल
राजा असो रंक असो
पापोजीचा पितर असो
शिक्षकसुद्धा रक्षकसुद्धा
कान वर , शेपूट गोल !
दुधाळ मधाळ ओठांमध्ये
पिकलेल्या देठांमध्ये
भुंकणाऱ्‍या विव्हळणाऱ्‍या
केकाटणाऱ्‍या चेकाळणाऱ्‍या
पिसाळलेल्या कुत्र्यांचाच
खचाखच खजिना आहे ,
कारण सज्जनांनो ,
हा कुत्र्यांचा माजमहिना आहे !

मुकं करोति वाचालम् ।
पंगु लंघयते गिरिम् ।
यत्कृपा त्वमहम् वंदे ।
परमानंदम् श्वानेश्वरम् ।।

- राजीव मासरूळकर
मासरूळ , ता जि बुलडाणा