सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Monday, 8 February 2016

गझल: माणूस

गझल
सांग खरे की निखळ सुखाने कितीक हसतो माणुस
स्वत:स फसवत फसवत हसतो म्हणून फसतो माणुस!

क्षणोक्षणी मरतो पण जगतो पुढचा क्षण जिद्दीने
कोणत्या चिवट सहनशील धातूचा असतो माणुस?

रहावयाला कुणास जागा सुईएवढी नाही
अन् एखादा विश्वभराच्या मनात वसतो माणुस!

निवांत बसणे कुठे कुणाच्या नशिबामध्ये असते
म्हणून मित्रांसोबत सायंकाळी 'बसतो 'माणुस!

पुस्तकात कोंबून ठेवणे शक्य कुणाला आहे
पुस्तकातल्या शब्दांइतका लहान नसतो माणुस!

साप कधी बघतो का पुढचे कोण जनावर आहे?
डूख धरुन पण माणसास ठरवूनच डसतो माणुस!

कधी कधी या माणसास काडीची किंमत नसते
कधी कधी या पृथ्वीच्या मोलाचा असतो माणुस!

~राजीव मासरूळकर
   मासरूळ ते औरंगाबाद प्रवास
   दि.07/02/2016
   19:30 वाजता

No comments:

Post a Comment