गीत
सात जन्मांतली दिव्य ही साठवण
सांज होताच येते तुझी आठवण
भेट होते तुझी सांजवा-यातुनी
लाभते मन्मना प्रीतसंजीवनी
नाचती छनछनन सांजवेडे चरण
तो तुझा स्पर्श अन् ती तुझी चुंबने
ती मिठी त्यातली धुंदशी स्पंदने
तो विरह ती मजा स्वप्नवत ते वचन
कोण गातोय क्षितिजावरी गीत हे
मी तुझा शोध शब्दांतुनी घेतसे
प्रीत ओसांडुनी लाल होती किरण
मी कपाळावरी कोरला तव ठसा
मोडला डाव अर्ध्यावरी तू कसा
ही जखम अंतरी भळभळे आमरण
~ राजीव मासरूळकर
सिल्लोड दि.25/4/15
सायं7:30 वा'
No comments:
Post a Comment