पीक
कोरडवाहू शेतीमधल्या
करपून गेल्या पिकासारखा
तुझा चेहरा सुरकटलेला...
पिकवूनही घासास पारखा...
अंगावरल्या बंडीमधला
विटून गेला धागा धागा
पायांवर गोंदवून नक्षी
नशीब झाल्या स्थावर भेगा....
पाऊस केवळ डोळ्यांमध्ये
येतो वांझपणाचा रिमझिम
नंतर दुष्काळाचा हृदयी
मुक्कामच ठरलेला कायम...!
बैलमनाला अन्यायाच्या
वखराला जुंपुन ठेवावे
कर्जबियाणे व्याजसरीतुन
उधळत झाकत पेरत जावे
दगड भिरकवावा मोठासा
स्वप्नकल्पनापक्ष्यांवरती
पोटाला लावावे गोटे
भरुन बिडीने घ्यावी छाती...........
असा तुझा दुर्मुखला दिनक्रम
सहज सुखेश्वर दुर्लक्षिततो
अश्रुंविण ये दु:खाचे पिक.....
काळाविण वेळेची टिकटिक.........!
~राजीव मासरूळकर
No comments:
Post a Comment