सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Tuesday, 9 October 2018

सक्तीचं शिक्षण


शहरं पेटलीयेत...
जातीयतेचा संसर्ग
हिंसेचा विषाणू पचवून
उतरलाय रस्त्यावर
द्वेषाग्नी भडकावत...
(गावंही धुमसताहेत आतल्या आत
पण ओळखीचे चेहरे घेऊन
गर्दीत होता येत नाही सामील
ही हतबलता गप्प बसवतेय त्यांना)
माणूस नावाचं औषध
केवळ कवितेच्या दुर्लक्षित पुस्तकातच
पडलंय गपगार होऊन
माणसाची नस सापडलेले वैद्यही
आश्वासनांची गोळी गिळून
झाले आहेत फितूर...

बंद दरवाज्याच्या फ्लॅटमध्ये टीव्हीसमोर बसून
10 वर्षाचं निरागस मूल
विचारतंय भयग्रस्त बापाला,
"पप्पा, जमावबंदी म्हणजे काय?
जात काय असते?
धर्म म्हणजे काय?
हे लोक गाड्या का पेटवताहेत?
दगडांमध्ये का भरली जातेय हिंसा?
आपण फिरायला का नाही जाऊ शकत?"
उत्तर देताना माझ्या पोटात उठतोय गोळा
भिडवता येत नाही पोराच्या डोळ्याला डोळा
कसा काढावा पळ?
आज दिली गेलीय शाळेला सुट्टी
सक्तीचं शिक्षण
भयभारीत आदेशात गुंडाळून

अन् दुनावली आहे
हे पुन:पुन्हा घडण्याची शक्यता.....!

~ राजीव मासरूळकर