सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Wednesday, 19 February 2020

पुरुषा तुझी


एवढी झाली नजर का वाकडी पुरुषा तुझी
वाटते सोलून घ्यावी कातडी पुरुषा तुझी

तू तुझा इतिहास घे समजून जन्मापासुनी
घेतली गिरवून मी बाराखडी पुरुषा तुझी

जीभ छाटावी तुझी सीतेस वाटे कैकदा
लांघते भाषाच रेषा रांगडी पुरुषा तुझी

तूच तर केलीस खिचडी जात धर्माची तुझ्या
रीत पाळावी कशी घाणेरडी पुरुषा तुझी

सिद्ध कर श्रेष्ठत्व सत्कार्यातुनी प्रत्येकदा
सोड वर करणे कुठेही तंगडी पुरुषा तुझी

आजवर तू पेटवत आलास नारीला म्हणे
पेटवत होतास तू तर झोपडी पुरुषा तुझी

राऊळी करतोस पूजा, घालशी लाथा घरी
केवढी भक्ती निखालस बेगडी पुरुषा तुझी

हक्क देहाचा अबाधित ठेवते आहे स्वत:
प्रेयसी असले जरी मी भाबडी पुरुषा तुझी

भिडवुनी डोळा, तुझ्या खांद्यास खांदा लावुनी
सज्ज आहे मी वळवण्या बोबडी पुरुषा तुझी

(कोणत्या शाळेमधे पुरुषार्थ शिकवावा तुला
दाखवी पुरुषत्व केवळ काकडी पुरुषा तुझी)

कृष्ण शिवबा बुद्ध गांधी ज्योतिबा भिमराव तू
सद्गुणांनी भर पुन्हा तू पोतडी पुरुषा तुझी

~ राजीव मासरूळकर
   शिवजयंती
   दि. 19/02/2020, 02:30 AM

Thursday, 13 February 2020

जागा

रान केल्यावर जिवाचे भेटली जागा
आपली वाटे कशी ना आपली जागा

फारसा अंदाज घेता येत नसतो पण
सारखी डोळ्यास दिसते आतली जागा

आपल्या विश्वापलिकडेही किती विश्वे...
कोणत्या विश्वात आपण राखली जागा

जन्मत: आजन्म भटके जीव ना आपण
शोधतो आहोत का मग चांगली जागा

ठेवली काबूत त्रिज्या वर्तुळाची मी
मोकळी कोणाकरीता सोडली जागा

भेट ठरलेल्या स्थळी पाऊस भुरभुरला
केवढी तितक्यात ती मग तापली जागा

पावले वळतात आपोआप का तिकडे
विसरता येते जिथे आपापली जागा

~ राजीव मासरूळकर