गझल हा जगभर प्रसिद्ध असलेला अत्यंत प्रभावी, सुंदर, चित्ताकर्षक व गेय असा काव्यप्रकार आहे. गझल हा शब्द ऐकल्याबरोबर रसिकांचे कान टवकारले जातात. एक भावपूर्ण अवस्था मनात निर्माण होते. आता आपल्या मनाला स्पर्शून जाणारे, हृदयाला हात घालणारे विलक्षण काव्य आपल्याला ऐकायला मिळणार या उत्सुकतेतून आतुरता वाढते. गझलेच्या शेरांनी मनावर गारूड केलं की आपसुकच "वाह ! क्या बात है! " अशी दाद उमटू लागते. अगदी किशोरांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडणारा व भिडणारा काव्यप्रकार म्हणजे गझल.
मराठी साहित्यात गझलेचे बिजारोपण होऊन शंभर वर्षे पूर्ण होत असली तरी मुलत: गझल या काव्यप्रकारला सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास आहे.
गझल ही अरबी भाषेकडून जगाला मिळालेली एक सुंदर देणगी आहे. अरबी भाषेतील 'कसीदा' या काव्यप्रकारातून गझलेची निर्मिती झाल्याचे मत काही गझलअभ्यासक मांडतात. अरबी भाषेतून गझल फारसी भाषेमध्ये आली. फारसी कवींनी गझलेला स्थिरयमकाची (रदीफ) जोड देऊन सौंदर्य व गेयता प्रदान केली. पुढे ती फारसीतून उर्दूमध्ये व त्यानंतर भारतातील हिंदीसह मराठी व इतर भाषांमध्ये रुजली, रुळली व भारतीय साहित्याचे एक अभिन्न अंग बनून गेली.
मराठी गझलेचा प्रवास :
गझलेचा आकृतीबंध व अंगभूत वैशिष्ट्ये विचारात घेऊन मराठीचे काही गझलअभ्यासक हे कवी अमृतराय यांनी लिहिलेल्या 'जगव्यापका हरिला नाही कसे म्हणावे' या इ.स. १७२९ च्या सुमारास लिहिलेल्या रचनेला मराठीतील पहिली गझल संबोधतात. काही अभ्यासक कवी मोरोपंत यांच्या 'रसने न राघवाच्या थोडी यशात गोडी' या रचनेला पहिल्या मराठी गझलेचा मान देतात, परंतु वरील रचना या गझल नसून गझलसादृश्य कविता आहेत असे मत डॉ. राम पंडित यांनी 'मराठी गजल : अर्धशतकाचा प्रवास' या संपादित ग्रंथाच्या प्रस्तावनेत मांडले आहे.
मराठी भाषेत सुमारे १९१९ ते १९३३ या काळात लिहिलेल्या 'छंदोरचना' व 'गज्जलांजली'तून गझललेखनास अनुकूल वृत्तांचा परिचय करून देऊन व अभ्यासपूर्वक गझल लिहून ख-या अर्थाने मराठी गझलेची पायाभरणी करण्याचे काम पहिल्यांदा कविवर्य माधव ज्युलियन उर्फ माधवराव पटवर्धन यांनी केले. त्यांनी अनेक गझला लिहिल्या, परंतु त्यातील मोजक्याच रचना गझलविधेच्या जवळ पोहोचू शकल्या. मराठी गझलेचे खरे सामर्थ्य पहिल्यांदा प्रकट झाले ते कविवर्य सुरेश भट यांच्या गझललेखनातूनच ! त्यांनी इ.स.१९६३च्या सुमारास गझललेखनास सुरूवात केली. रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात, सप्तरंग या संग्रहातून त्यांनी अनेक उत्तमोत्तम गझला रसिकांच्या हाती दिल्या व मराठी गझलेला रसिकमान्यता मिळवून दिली. मराठी गझलेचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर गझल मुशाय-यांचे आयोजन केले. 'गझलेची बाराखडी' ही मराठी गझलेच्या तंत्र व मंत्राचा प्राथमिक परिचय करून देणारी छोटीशी पुस्तिका प्रकाशित करून ती सर्वत्र पोहोचवली. अनेक समकालीन कवींना गझललेखनाबाबत मार्गदर्शन (इस्लाह) करून गझलकारांच्या पिढ्या घडवल्या. मराठी गझललेखनात केलेल्या या अद्वितीय कामगिरीमुळेच कविवर्य सुरेश भट यांना आदराने 'आद्य मराठी गझलकार' व 'गझलसम्राट' संबोधले जाते.
सुप्रसिद्ध गझलकार श्रीकृष्ण राऊत यांनी मराठी गझलेची ३ वळणे सांगितली आहेत. १)इ.स.१९१९ च्या सुमारास माधवराव पटवर्धन यांनी मराठीला उर्दूतील गझलांच्या वृत्तांचा परिचय करून दिला व गझललेखन सुरू केले. २) इ.स.१९६३-६४ पासून कविवर्य सुरेश भट यांचे थेट संवादी शैली, जनसामान्यांची भाषा व मराठमोळ्या प्रतिमाप्रतिकांची अंगभूत वैशिष्ट्ये असलेले गझललेखन सुरू झाले व त्यांनी मराठी गझलेसाठी चळवळ उभारली. ३) सन २००३ मध्ये गझलसम्राट सुरेश भट यांचे देहावसान झाल्यानंतर संगणक, मोबाईल व इंटरनेटच्या सहाय्याने विभिन्न समाजमाध्यमांचा वापर करत अनेक जुनेनवे कवी गझलेचा अभ्यास व जाणकारांशी सल्लामसलत करत गझललेखन करू लागले. सुरेश भटांनी घालून दिलेली मराठी गझलेच्या आकृतीबंधाची बंधने सैलसर करण्याकडे कल वाढला. अक्षरगणवृत्तांसोबतच मात्रावृत्तांतही गझल लिहिली जाऊ लागली. मराठी गझलेत प्रचंड प्रमाणात संख्यात्मक वाढ झाली व व्यस्त प्रमाणात गुणात्मक वाढ दिसून येत आहे.
गझलेची व्याख्या :
गझल या शब्दाचा मूळ अर्थ स्त्रियांसोबत बोलणे किंवा स्त्रियांविषयी बोलणे असा सांगितला जात असला तरी गझल हा काव्यप्रकार आता केवळ प्रियकर-प्रेयसी मधील संवाद एवढाच उरला नसून जीवनाच्या प्रत्येक अंगाला, समस्येला, विषयाला, विचारप्रवाहाला, संस्कृतीला स्पर्श करत व समाजातील प्रत्येक प्रकारच्या विकृतीवर नेमकेपणे बोट ठेवत सूत्रबद्ध पद्धतीने भाष्य करणारा लोकप्रिय काव्यप्रकार ठरत आहे.
गझल हा कवितेचाच एक प्रकार असल्याने तो तो कवितेपेक्षा वेगळा नाही हे स्पष्ट आहे. उत्कृष्ट कवितेची जी गुणवैशिष्ट्ये आहेत, तीच गझलेचीही लक्षणे व वैशिष्ट्ये आहेत. परंतु अभंग, ओवी, अष्टाक्षरी, फटका, लावणी, पोवाडा, सुनित, हायकू, चारोळी, वृत्तबद्ध कविता, मुक्तछंद, इत्यादी काव्यप्रकारांपेक्षा गझलेत आढळणारी काही तांत्रिक वैशिष्ट्ये गझलेला विलग करत अधिक सुंदर व उठावदार बनवतात. कवितेची व्याख्या करणे हे जसे कठीण काम आहे, गझलेच्या व्याख्येबाबतही अभ्यासकांची तशीच अवस्था झालेली आहे. गजलेची एकच एक व्याख्या करणे अशक्य असले तरी तिच्या काही गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश टाकणाऱ्या व्याख्या अभ्यासकांनी मांडल्या आहेत. कविवर्य सुरेश भट यांनी आपल्या 'गझलेची बाराखडी' या पुस्तिकेत गझलेची तांत्रिक बाजू स्पष्ट करणारी एक व्याख्या पुढीलप्रमाणे नमूद केलेली आहे - 'एकाच वृत्तातील एकच यमक (काफिया) व अन्त्ययमक (रदीफ) असलेल्या प्रत्येकी दोन दोन ओळींच्या किमान पाच किंवा पाचपेक्षा अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल.' सुप्रसिद्ध उर्दू कवी रघुपती सहाय उर्फ 'फिराक' गोरखपुरी यांनी गझलेच्या केलेल्या व्याख्येचा आशय पुढीलप्रमाणे आहे - 'जेव्हा एखादा शिकारी आपल्या सोबत खास शिकारी कुत्रे घेऊन जंगलात एखाद्या हरणीचा पाठलाग करत असतो व ती हरीण जीव मुठीत घेऊन धावता धावता अशा एखाद्या गर्द झाडीत अडकते की तिला प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यातून स्वतःला सोडवता येत नाही, अशावेळी तिच्या कंठातून जे हतबलतेचे करूण स्वर उमटतात, तीच खरी गझल होय.' त्यांच्या मते मानवाची हतबलता जेव्हा दिव्य रूप घेऊन गझलेत करूण शब्दांत अवतरते, तेच गझलेचे आदर्श रूप असते. 'औरतो से या औरतो के बारे में बाते करना' असा गझल शब्दाचा मूळ अर्थ सांगितला जात असला तरी मराठीतील सुप्रसिद्ध गझलकार व गझल अभ्यासक श्री अरुणोदय भाटकर हे गझलकार चंद्रशेखर सानेकर यांच्या गझलेबाबत लिहितांना असे म्हणतात की 'जिथे कुठेही कोणताही विषय निघो, त्याला स्त्री समजणे म्हणजे गझल.' गझलकार श्री चंद्रशेखर सानेकर म्हणतात की 'गझल म्हणजे मर्माचे कोरीव शिल्प.' गझलकार व गझलअभ्यासक श्री अनंत ढवळे गझलेची व्याख्या पुढीलप्रमाणे करतात : 'तगज्जुल (भाषिक साधने) व तखैय्युल (प्रातिभीक साधने) या दोन प्रमुख घटकांचा परिपाक असलेली वृत्तकाफीयांचे निकष पाळून लिहिलेली घाटनिष्ठ व संवादी कविता म्हणजे गझल होय.'
या व्याख्यांचा अभ्यास केल्यावर गझलेची खालील वैशिष्ट्ये आपल्याला आढळून येतात :
१) गझल हा एक वृत्तबद्ध काव्यप्रकार आहे.
२) गझल ही एकाच वृत्तातील दोन-दोन ओळींच्या कवितांची बांधणी असते.
३) यातील प्रत्येक दोन ओळींना शेर असे म्हणतात. प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते.
४) गझलेत वृत्तबद्धतेसोबतच आशयालाही तितकेच महत्व असते.
५) एका गझलेचे सर्व शेर एकाच वृत्तात असतात. प्रत्येक शेरात समान स्वरचिन्ह असलेले यमक (काफिया) पाळलेले असते. अन्त्ययमक किंवा स्थिरयमक किंवा समांतिका (रदीफ) जर वापरले असेल तर ते सर्व शेरांत समान असते.
६) मुळात प्रेम हा गझलेचा विषय असला तरी आजची गझल जीवनाच्या सर्व अंगोपांगांवर भाष्य करते. सुरूवातीला प्रेयसीची प्रशंसा करण्यात मग्न असलेली गझल कालांतराने काही काळ राज्यकर्त्यांच्या प्रशंसेतही रमली. सुफी संतांनी गझलेत चिंतन, अध्यात्म व तत्वज्ञानासारखे विषय आणून मोलाचे योगदान दिले. आज गझलेला कुठलाही विषय वर्ज्य नसल्याचे दिसून येते.
हिंदी कवी अदम गोंडवी म्हणतात,
'जो गज़ल माशुक के जलवो से वाकिफ हो चुकी,
अब उसे बेवा के माथे की शिकन तक ले चलो'
तसेच मराठी गझलेतही घडलेले आहे.
७) गझल घाटनिष्ठ व संवादी असते. कविवर्य सुरेश भट म्हणतात की गझलेचे शेर हे अगदी दररोजच्या बोलण्यासारखे आले पाहिजेत. सुप्रसिद्ध गझलकार व गझल अभ्यासक श्री श्रीकृष्ण राऊत म्हणतात की उर्दूमध्ये 'शेर लिखना' असे न म्हणता 'शेर कहना' असे संबोधले जाते. गझलेसाठी कवीकडे अभिव्यक्तीची उत्कटता, वृत्तांवर विलक्षण प्रभुत्व व भाषेचे सजग भान असावे लागते.
गझलेची तांत्रिक बाजू :
गझल हा वृत्तबद्ध काव्यप्रकार असल्याने ती अक्षरगणवृत्तात किंवा मात्रावृत्तात लिहिली जाते. ओवी, अभंग, अष्टाक्षरी किंवा षडाक्षरीसारख्या अक्षरछंदांत तसेच मुक्तछंदात गझल लिहिली जात नाही. सुरेश भटांच्या मते एकाच वृत्तातील ५ किंवा पाचपेक्षा अधिक शेरांची गझल होते. काही अभ्यासक मात्र किमान तीन शेरांची गझल मान्य व्हावी असे मत मांडतात. शेर दोन ओळींचा (मिसर्यांचा) असतो. शेराच्या पहिल्या ओळीला उला मिसरा व दुसर्या ओळीला सानी मिसरा म्हणतात. गझलेच्या पहिल्या शेराला मतला किंवा मथळा असे म्हणतात. मतल्याच्या दोन्ही ओळींत समान स्वरचिन्ह असलेल्या शब्दांनी युक्त असे यमक पाळलेले असते व पुढच्या प्रत्येक शेराच्या फक्त सानी (दुस-या) मिस-यात असे यमक पाळले जाते. या यमक जुळणार्या शब्दांना काफिया (अनेकवचन - कवाफी) असे संबोधतात व कवाफींमधल्या समान स्वरचिन्हाला अलामत असे म्हटले जाते. काही गझलांच्या मतल्यात दोन्ही मिस-यांत काफियानंतर पुनरावृत्त होत असलेले समान शब्द आढळतात व त्यापुढील प्रत्येक शेरातही ते काफियानंतर तसेच पुनरावृत्त झालेले दिसतात. काफियानंतर पुनरावृत्त होणार्या या समान शब्दांना रदीफ (मराठीत अन्त्ययमक/ समांतिका किंवा स्थिरयमक) म्हणतात. रदीफ असलेल्या गझलेस मुरद्दफ गझल म्हणतात तर ज्या गझलांच्या मिसर्यांचा शेवट काफियानेच होतो, अशा गझलेस गैरमुरद्दफ (रदीफ नसलेली) गझल म्हणतात. गझलेच्या शेवटच्या शेरात काही गझलकार आपल्या नावाचा किंवा धारण केलेल्या टोपणनावाचा उल्लेख करतात, अशा नावास तखल्लुस व तखल्लुस वापरून लिहिलेल्या शेवटच्या शेरास मक्ता असे म्हटले जाते. मराठी गझलेत बोटांवर मोजता येतील इतक्याच गझलकारांनी तखल्लुसचा वापर केल्याचे दिसते. स्वत: सुरेश भटांनीही तखल्लुसचा वापर टाळला आहे.
कविवर्य सुरेश भट यांच्या एका गझलेच्या उदाहरणातून आपण वरील बाबी समजून घेऊया.
जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही
स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही
फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही
कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही
दिले प्रत्येक वस्तीला अम्ही आकाश सोनेरी
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही
जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही
- सुरेश भट
वरील गझल ही वियदगंगा या अक्षरगणवृत्तात लिहिली गेली आहे. या गझलेचा प्रत्येक शेर व प्रत्येक शेराचा प्रत्येक मिसरा वियदगंगा याच वृत्तात लिहिलेला आहे. पहिल्या शेराच्या दोन्ही मिसर्यांत 'भांडतो' व 'सांधतो' हे यमक जुळणारे शब्द आलेले आहेत. हे काफिये (कवाफी) आहेत. शेराच्या दोन्ही ओळींत यमक साधले आहे, म्हणजेच हा शेर 'मतला' आहे. पुढच्या शेरांच्या सानी (दुसर्या) मिसर्यांत 'लावतो', 'वाटतो', 'रोवतो', 'बोलतो' हे कवाफी आलेले आहेत. या कवाफींमध्ये समान असलेल्या 'तो'च्या आधी आलेल्या ड, ध, व, ट , ल या बदलणार्या अक्षरांत 'अ' हे स्वरचिन्ह समान आहे, या समान स्वरचिन्हाला 'अलामत' म्हणतात. एखाद्या गझलेत कोळी, मोळी, टोळी, होळी, झोळी, गोळी, आरोळी, चारोळी असे कवाफी आलेले असतील तर त्यात सारख्या 'ळी'आधी आलेल्या को, मो, टो, हो, झो... मधील 'ओ' हा स्वर म्हणजेच अलामत होय. आता वरील गझलेत मतल्याच्या दोन्ही व पुढील प्रत्येक शेराच्या सानी मिसर्यात काफियानंतर 'आम्ही' हा शब्द पुन्हा पुन्हा आला आहे. म्हणजे या गझलेत 'आम्ही' हा रदीफ आहे व ही मुरद्दफ गझल आहे. शेवटच्या शेरात कवीच्या नावाचा उल्लेख (तखल्लुस) नाही, म्हणजे या गझलेस 'मक्ता' नाही.
प्रत्येक गझलेचा शब्दांत उतरण्याचा प्रवास हा मतल्याकडून मक्त्यापर्यंत/ शेवटच्या शेरापर्यंत या क्रमानेच होईल असे नाही. वृत्तांवर प्रभुत्व असलेल्या कवीचे अभिव्यक्तीच्या उत्कटतेने ओथंबलेले शब्द थेट विशिष्ट आकृतीबंध घेऊनच ओठांवरून कागदावर (आता मोबाईल स्क्रिनवर) अवतरतात. आधी एखादा सुटा शेरही सुचू शकतो, त्यानंतरही काही शेर लिहून होतात आणि मध्येच किंवा शेवटी गझलेस साजेसा मतला सुचतो. प्रत्येक गझल लिहून पूर्ण होण्याचा कालावधीही वेगवेगळा असू शकतो.एखादी गझल ४-५ तासांत पूर्ण होईल, तर दुसरीला पूर्ण व्हायला १-२ आठवडे लागतील, तिसरी एखादी गझल १-२ महिन्यांत मनासारखी लिहून होईल तर एखाद्या गझलेला पूर्ण व्हायला वर्षदोनवर्षेही लागू शकतील. गझल लिहिल्याबरोबर प्रकाशित करण्याऐवजी आपल्या गझलेकडे आपल्यालाच तटस्थपणे बघता यायला हवे. गझलेतील दोष शोधून त्यांचे निवारण करता आले पाहिजे, परिष्करण व वारंवार स्वसंपादन करत राहिले पाहिजे.
विख्यात गझलकार बशीर बद्र जी म्हणतात की,
'चमकती है कई सदियों में आसुंओ से जमीं
ग़ज़ल के शेर कहा रोज़ रोज़ होते है ?'
याप्रमाणे आशय ओथंबून आल्यावरच, मोजकेच पण प्रभावी लिहिण्यावर भर दिला गेला पाहिजे. घेतले सात आठ काफिये व पाडली गझल असे घडता कामा नये.
गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या मते काफियाचे शब्द हे गझलेचे key words असतात. शेरात येणार्या कल्पनावैविध्याची किल्ली काफियाकडे असते. ही किल्ली विविध आयामांत फिरवण्याची कवीच्या प्रातिभीक क्षमतेवर शेराचा दर्जा अवलंबून असतो. याच्या अगदी उलट मत व्यक्त करताना गझलकार चंद्रशेखर सानेकर यांनी नालेसाठी घोडा की घोड्यासाठी नाल असा प्रश्न उपस्थित करत गझलेसाठी काफिया निवडावा, पण काफियासाठी गझल लिहू नये असे सूचवले आहे. परंतु कसे लिहिले यापेक्षा काय लिहिले याला म्हणजे 'अंदाजे बयाॅं'ऐवजी आशयघनतेला महत्त्व दिले जावे याबाबत या दोघांच्याही विचारांत साम्य आढळते. त्यांच्यासोबत डॉ राम पंडित, सदानंद डबीर, स्व. अरुणोदय भाटकर आदि सर्वजण काफिया अलामतीच्या बाबतीत उर्दू गझलेप्रमाणे स्वरकाफियाचा वापर 'सौती हमआहंगी म्हणजेच स्वरसाम्यता, ध्वनीतील एकरूपता (व्यंजनांतील समानता नव्हे)' या स्वरूपात करण्याबाबत आग्रही असल्याचे दिसते. त्यानुसार स्वरकाफिया वापरून काही (चंद्रशेखर सानेकर, गणेश नागवडे, इ.) गझलकार मराठी गझल लिहित आहेत व ती लोकप्रियही होत आहे. अकारान्त स्वरकाफिया वापरण्याचे प्रयोगही (सदानंद बेंद्रे 'मुसाफिर', वैवकु, इ.) सुरू आहेत, तथापि गैरमुरद्दफ गझलेत स्वरकाफिया वापरला जाऊ नये असे मत हेमंत पुणेकर यांनी मांडले आहे. मराठी गझलेत होत असलेल्या नवनव्या प्रयोगांमुळे मराठी गझलेचे क्षेत्र विस्तारत असून ती युवावस्थेकडून प्रौढावस्थेकडे प्रस्थान करीत आहे असे म्हणावेसे वाटते.
वृत्तबद्धता :
वृत्त हे कवितारचनेचे एक प्रमाण असते. शब्द हा कवितेचा सर्वात लहान अर्थपूर्ण घटक असतो. शब्दांतील काही अक्षरे र्हस्व तर काही दीर्घ असतात. र्हस्व अक्षरांना लघू (U) तर दीर्घ अक्षरांना गुरू (-) संबोधले जाते. वृत्तांचे दोन प्रमुख प्रकार आहेत : अक्षरगणवृत्ते व मात्रावृत्ते.
क) अक्षरगणवृत्त :
कवितेच्या प्रत्येक ओळीत अक्षरांची संख्या आणि त्यांचा लघु गुरू क्रम निश्चित असतो असे वृत्त हे अक्षरगणवृत्त असते. ओळीमधील अक्षरांचे तीन तीन अक्षरांचा एक असे गट पाडले जातात. लघुगुरू अक्षरांचा विशिष्ट क्रम असलेल्या तीन अक्षरी गटांना गण म्हणतात. मराठीत ८ गण आहेत. (फारसी-उर्दूतही ८ अरकान आहेत.) शेवटी एक किंवा दोन २ अक्षरे शिल्लक उरू शकतात. एका गटातल्या तीन अक्षरांपैकी प्रत्येक अक्षर हे लघु किंवा गुरू असू शकते. लघु अक्षराच्या उच्चाराला गुरू अक्षराच्या उच्चारापेक्षा निम्मा वेळ लागतो. अक्षरांतले अकार, इकार, उकार, ऋकार हे लघु; आणि आ-कार, ईकार, ऊकार, ए-ऐ-ओ-औ-कार हे गुरू समजले जातात. अनुस्वारयुक्त अक्षर आणि विसर्गयुक्त अक्षर गुरू समजले जाते. जोडाक्षराच्या आधीच्या अक्षरावर जोडाक्षराचा उच्चार करताना आघात येत असेल तर आधीचे अक्षर गुरू समजले जाते. क्ष, ज्ञ ही जोडाक्षरे असल्याने त्यांच्या आधी आलेले लघु अक्षरही गुरू मानले जातात. उदा. शिस्त या शब्दात 'शि' र्हस्व दिसत असले तरी त्यापुढील 'स्त' या जोडाक्षराचा आघात पडल्याने त्याचा उच्चार लांबतो, दीर्घ होतो म्हणून ते गुरू समजले जाते. मराठी गझलेच्या बाबतीत लघु अक्षरासाठी 'ल' व गुरू अक्षरासाठी 'गा' ही अक्षरे वापरतात. अक्षरांच्या लघुगुरू क्रमाला 'लगावली' म्हटले जाते.
कवितेच्या संदर्भात गणांची ओळख करताना तीन अक्षरी शब्दातील फक्त पहिले लघु( यमाचा), फक्त दुसरे लघु( राधिका), फक्त तिसरे लघु( ताराप) किंवा तीनही लघु( नमन) असे चार प्रकार संभवतात. त्यानुसार त्या तीन अक्षरी शब्दाचा य, र, त, न यांपैकी एक गण ठरतो. किंवा या तीन अक्षरांमधले फक्त पहिले गुरू(भास्कर), फक्त दुसरे गुरू(जनास), फक्त तिसरे गुरू( समरा) किंवा तीनही गुरू( मानावा) असे चार प्रकार संभवतात. त्याअनुसार त्या शब्दाचा भ, ज, स, म यांपैकी एक गण ठरतो.
हे सर्व लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी पद्धत म्हणून यमाता, मातारा, ताराज, राजभा, जभान, भानस, नसल, सलगा या क्रमाने यमाताराजभानसलगा हा अक्षरसंच लक्षात ठेवता येईल व गणांची ओळख करता येईल. आता आपण वर अभ्यासलेल्या 'वियदगंगा' वृत्तातील गझलेच्या एका शेराचे गण पाडून बघू.
जगाची/ झोकुनी/ दुःखे सु/खाशी भां/ डतो आ/म्ही
स्वतःच्या/ झाकुनी/ भेगा म/नुष्ये सां/ धतो आ/म्ही
१६-१६ अक्षरे असलेल्या या दोन्ही ओळींतील अक्षरांचा लघुगुरू क्रम U-- -U - --U --- U-- - असा म्हणजेच यमाता राजभा ताराज मातारा यमाता गा
असा आहे. म्हणजेच 'वियदगंगा' वृत्ताचे य र त म य ग हे गण पडतात. हे लक्षात ठेवणे थोडे कठिण असून वारंवार पाठांतर केल्याशिवाय दीर्घकाळ लक्षात राहणे अशक्य आहे. गझलेच्या बाबतीत मात्र ही बाब लगावलीच्या स्वरूपात अत्यंत सोपी करून सांगता येते व कवितेच्या व्याकरणातही ती वापरली जावी अशी शिफारस करण्याचा मोह होतो. कसे ते बघुया-
वरील वृत्ताचा लघुगुरू क्रम आहे : U-- -U - --U --- U-- - लघुसाठी ल व गुरूसाठी गा योजून लिहिल्यास या वृत्ताची लगावली पुढीलप्रमाणे होते :
लगागागा लगागागा लगागागा लगागागा . आहे की नाही सोपे ? लयबद्ध व गेय लगावलीमुळे क्लिष्ट लगक्रम सोपा होऊन कविता व गझललेखनातील तांत्रिक बाजू सहजसाध्य होते आणि काही वृत्तांच्या लगावलींचा थोडाफार सराव केल्यावर कवीच्या जिव्हेवर कवितेचा आशय वृत्तबद्ध शब्दांतच अवतरू लागतो.
आणखी काही अक्षरगणवृत्तांच्या लगावली पाहू :
वृत्त १ : आनंदकंद
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा
वृत्त २ : चामर
लगावली : गालगाल गालगाल गालगाल गालगा
वृत्त ३ : हिरण्यकेशी
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा
वृत्त ४ : मनोरमा
लगावली : गालगागा गालगागा
वृत्त ५ : विद्युल्लता
लगावली - गागाल गालगागा गागाल गालगा
वृत्त ६: कलिंदनंदिनी
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा
वृत्त ७ : मंजुघोषा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा
वृत्त ८: राधा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गा
वृत्त ९ : मंदाकिनी
गागालगा गागालगा गागालगा गागालगा
वृत्त १० : कालगंगा
लगावली - गालगागा गालगागा गालगागा गालगा
वृत्त ११: लज्जिता
लगावली - गालगा गालगा लगागागा
वृत्त १२: मृगाक्षी
लगावली - लगागागा लगागागा लगागा
वृत्त १३: सती जलौघवेगा
लगावली - लगालगागा लगालगागा लगालगागा
वृत्त १४= श्येनिका
लगावली =गालगाल गालगाल गालगा
वृत्त १५: मेनका
लगावली : गालगागा गालगागा गालगा
वृत्त १६: भुजंगप्रयात
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा
वृत्त १७: मंदारमाला
लगावली : गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागालगा
वृत्त १८: सुमंदारमाला
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा
वृत्त१९ :तोटक
लगावली :ललगा ललगा ललगा ललगा
वृत्त २०: रंगराग
लगावली : गालगाल गागागा गालगाल गागागा
वृत्त २१: व्योमगंगा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा (संदर्भ : गुगल)
अक्षरगणवृत्तात गझल लिहिताना लगावलीत बसणारे शब्द शोधण्यात व आशयसौंदर्य अधिक तरल होण्यासाठी शब्दांचा यथायोग्य क्रम लावण्यात कवीच्या कलेचा व प्रतिभेचा कस लागत असतो. एखाद्या ठिकाणी योग्य अर्थाचा शब्द न मिळाल्यास गणपूर्ती करणारा त्याच अर्थछटेचा पर्यायी शब्द वापरावा लागतो. वृत्तात सूट घ्यावी लागते. त्यात एका गुरूऐवजी दोन लघु घेणे, अर्थ बदलत नसल्यास र्हस्व उकार/वेलांटी दीर्घ करणे किंवा दीर्घचे र्हस्व करणे, उर्दू गझलेप्रमाणे 'मात्रा गिराना' म्हणजे लिहिताना दीर्घ लिहिलेल्या अक्षरांचा उच्चार जाणीवपूर्वक लघु करणे. मराठी गझलेत मात्रा गिराना ही सुट घेण्याची पद्धत अद्याप रुजलेली नाही.
ख) मात्रावृत्त :
कवितेच्या ओळींतील अक्षरांची संख्या समान नसते परंतु मात्रा समान असतात, अशावेळी ती कविता मात्रावृत्तात असते. र्हस्व अक्षरासाठी १ व दीर्घ अक्षरासाठी २ मात्रा मोजल्या जातात.
अनलज्वाला (२४ मात्रा) या मात्रावृत्तातील माझ्या एका मुसलसल गझलेचे उदाहरण घेऊ :
विश्व नव्या इच्छांचे साजुक व्याली खिडकी
विरंगुळा जगण्याचा आहे झाली खिडकी
देहाचे डोळे करतो अन् पाहत बसतो
चेटुक ओठांवरची दाहक लाली खिडकी
थेट नभाच्या घरातही डोकवता येते
खिडकीमध्ये खिडक्या घेउन आली खिडकी
रस्त्यावरचा मधाळ वारा खुणावतो, मग
लाजत लाजत हसू फुलवते गाली खिडकी
सूर गोडवा गंध गारवा सळसळ कातर
देत कवडसा सुखात एकट न्हाली खिडकी
क्षण दु:खाचे किती पचवले एकांती अन्
दबली आनंदाच्या ओझ्याखाली खिडकी
लग्न प्रेयसीसोबत झाले त्या घरट्याचे
म्हणून दिसते प्रसन्न त्याची साली खिडकी
झाली तर होऊ दे सगळी बंद कवाडे
एक असावी उघडी पण भवताली खिडकी
~ राजीव मासरूळकर
या गझलेतील एका शेराच्या मात्रा मोजून बघू.
लग्न प्रेयसी/सोबत झाले/त्या घरट्याचे
२१ २१२ /२११ २२ /२ ११२२
=८+८+८
म्हणून दिसते/ प्रसन्न त्याची/ साली खिडकी
१२१ ११२ / १२१ २२ /२२ ११२
=८+८+८
काही मात्रावृत्ते व त्यांच्या मात्रा खालीलप्रमाणे आहेत :
१] वररमणी : ४२ मात्रा [८+८+८+८+८+२]
२] तुंदिल : ३८ मात्रा [८+८+८+८+६]
३] कपिवीर : ३६ मात्रा [८+८+८+८+४]
४] वनहरिणी : ३२ मात्रा [८+८+८+८]
५] हरिभगिनी / स्वरगंगा : ३० मात्रा [८+८+८+६]
६] प्रियलोचना : २९ मात्रा [८+८+८+५]
७] लवंगलता : २८ मात्रा [८+८+८+४]
८] सूर्यकांत / समुदितमदना : २७ मात्रा [८+८+८+३]
९] चंद्रकांत / पतितपावन : २६ मात्रा [८+८+८+२]
१०] अनलज्वाला : २४ मात्रा [८+८+८]
११] शुभगंगा : २२ मात्रा [८+८+६]
१२] वर्षा : २१ मात्रा [८+८+५]
१३] वंशमणि : २० मात्रा [८+८+४]
१४] पादाकुलक : १६ मात्रा [८+८]
१५] मुरजयी : १५ मात्रा [८+७]
१६] बालानंद : १४ मात्रा [८+६]
१७]शुद्धसती : १२ मात्रा [८+४]
१८] पिशंग : १० मात्रा [८+२] (संदर्भ : गुगल)
गझलेचा आशय :
गझलेला आता कुठलाही विषय वर्ज्य राहिलेला नाही हे आपण याआधी पाहिले आहेच.
गझलेच्या मतल्याचे वृत्त (बहर), त्यातील काफिया, अलामत व असल्यास रदीफ हे घटक मिळून गझलेची 'ज़मीन' तयार होते. या कसलेल्या 'जमीनी'तच कवीला त्यापुढील शेरांत आशयाची पेरणी करावी लागते. तरच गझलेचे जोमदार पीक काढता येते. धातूची मुर्ती बनवताना उकळता द्रव साच्यात ओतणे हे काम यंत्राद्वारे केले तर कमी वेळात व हुबेहूब होईलही, पण कवी काही यंत्र नसतो. तो भावभावना असलेला, जिज्ञासू व तर्कशुद्ध विचार करू शकणारा मेंदू असलेला, ज्ञानेंद्रिये व दूरदृष्टी असलेला हाडामांसाचा माणूस असतो. तो स्वत:च्या हाताने त्याच साच्याच्या मदतीने एकाच धातूच्या अनेक मुर्त्या बनवताना वेगवेगळा अनुभव घेऊ व देऊ शकतो. एकाच साच्याचा वापर करून वेगवेगळ्या धातूंच्या मूर्ती बनवू शकतो, साध्या मातीच्या, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या बनवू शकतो. प्रत्येक मुर्तीला विभिन्न रंगसंगतीचा वापर करून सौंदर्य प्रदान करू शकतो. गझलेचे तसेच आहे. एका गझलेचे सगळे शेर एकाच वृत्तात (साच्यात) असले तरी प्रत्येक शेर आशयाच्या दृष्टीने एक स्वयंपूर्ण कविता असतो. अर्थ उमगण्यासाठी त्याला मागच्या किंवा पुढच्या शेराची मदत घ्यावी लागत नाही. एकाच वृत्तात असलेल्या दोन ओळींत एक जीवनानुभव उत्कटपणे मांडणारी लघुत्तम कविता म्हणजे शेर अशी व्याख्या श्रीकृष्ण राऊत यांनी केली आहे. गझलेतून एखादा शेर वेगळा काढून वाचला किंवा कुणालाही वाचायला दिला तरी त्याचा अर्थ कुठल्याही संदर्भाशिवाय वाचक रसिकाला कळाला पाहिजे. एवढेच नाही तर त्यातून एक स्वयंपूर्ण कविता वाचल्याचा सौंदर्यानुभव व आनंदही मिळाला पाहिजे. आणि अशाच विभिन्न आशयाच्या अनेक परिपूर्ण कवितांची बांधणी कवीला एकेका गझलेत करता आली पाहिजे. हेच इतर काव्यप्रकारांत नसलेले गझलेचे वेगळेपण व सामर्थ्य होय. केवळ दोन ओळींच्या साच्यात एका संपूर्ण कवितेचा आशय लय बिघडू न देता, आशयसौंदर्य किंचितही कमी न होऊ देता, तोच तोचपणा न येऊ देता, कुशलतेने अलगद बसवता येणे हे येर्यागबाळ्याचे काम नव्हेच. एक अस्सल कवीच दर्जेदार शेर लिहू शकतो. म्हणूनच गझल लिहू इच्छिणारी व्यक्ती आधी उत्तम कवी/कवयित्री असली पाहिजे ही गझलेची पूर्वअटच असल्याचे विधान सुरेश भट यांनी केले आहे. कविता क्रमाक्रमाने ओळीओळींतून उलगडत जाते व कवितेच्या शेवटी तिचा पूर्ण अर्थ वाचकाला उलगडतो किंवा अर्थाची दिशा कळते. गझल अशी उलगडत नसते. गझलेचा प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता असते. शेराच्या उला मिसर्यात आशयाची जिज्ञासा वाढवणारी प्रस्तावना असते, तर सानी मिसर्यात त्याचा उत्कट उत्कर्षबिंदू असतो किंवा प्रभावी समारोप असतो. एखाद्या गझलेत सर्वच शेरांतून एकच भाव (विषयवस्तू) मांडलेला असू शकतो, अशा गझलेस मुसलसल गझल म्हणतात. पण अशा गझलेतही प्रत्येक शेर हा सार्वभौम अर्थपूर्ण कविता असावा लागतो. अन्यथा त्यात काव्य असले तरी ती गझल नव्हे तर गझलेच्या साच्यात कोंबलेली एक वृत्तबद्ध कविताच ठरते. तिला चुकूनही गझल न म्हणता आदरपूर्वक वृत्तबद्ध कविता संबोधले जावे. प्रत्येक शेरात वेगवेगळे विषय, भाव अभिव्यक्त करणार्या गझलेस गैरमुसलसल गझल म्हणतात. गझलविधेचे वेगळेपण व सामर्थ्य सिद्ध करणारी गैरमुसलसल गझल सर्वत्र मोठ्या प्रमाणात लिहिली जाते.
दिक्षित दनकौरी जी लिहितात,
शेर अच्छा बूरा नही होता
या तो होता है या नही होता !
शेर चांगला किंवा वाईट नसतोच. शेर एकतर असतो किंवा नसतो.
गझलेच्या शेरात कवीचे वक्तव्य, त्याच्या अनुभवाची तिव्रता, उत्कटता, आवाहकत्व, भाषासौष्ठव व सहज शब्दकळा, मूर्त अमूर्त प्रतिमांचे संघटन यांची अंतर्बाह्य एकजीव बांधणी हवी. विरोधाभास, धक्कातंत्र, कलाटणी, चमत्कृती यांसोबतच प्रतिमासौष्ठव, शब्दौचित्य, सेंद्रियता, व्यामिश्रता, अनेकार्थसूचनक्षमता, वैश्विकता व भाषेची सहजता यांतील अधिकाधिक गुण शेरात व एकूणच गझलेत दिसायला हवेत. यालाच गझलियत किंवा शेरियत संबोधता येईल. डॉ. राम पंडित यांच्या मते 'गजलियत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून गजलेत अपेक्षित असलेले काव्यगुण होय. गजलेतील शेर भावणं म्हणजे त्यातील काव्यगुणांनी वाचकांच्या, श्रोत्याच्या मन व बुद्धीचा ठाव घेणं होय. या त्वरीत संप्रेषित होण्यास कारणीभूत अदृश्य क्रियेला गजलीयत म्हणतात. मन, आत्मा, ईच्छा, ईश्वर या गोष्टी जशा दाखवता येत नाहीत, तसेच गजलीयतबाबत म्हणता येईल'.
मराठी गझलेवर घेतले जात असलेले आक्षेप :
१)शेरांतील विषयवैविध्यामुळे गझलेच्या सलग रसास्वादात अडसर निर्माण होतो.
२) आकृतीबंधाचे स्तोम माजल्यामुळे गझलेत कलेऐवजी कारागिरीचा बोलबाला आहे.
३) गझल कार्यशाळा नावाच्या कोचिंग क्लासेस मधून झटपट गझलकार घडवण्याचे व्यवसाय सुरू झाले आहेत. ४)मुशायर्यांची रेलचेल असल्याने टाळ्याखाऊ, सादरीकरणप्रधान गझलांचे अमाप पीक येत आहे.
५)मराठी गझल सुरेश भट यांच्या गझलेपुढे जाऊ शकली नाही.
६) मराठी गझलेत केवळ संख्यात्मक वाढ झाली, गुणात्मक नाही.
७)काफियावरील बंधनांमुळे तेच तेच काफिये वापरले जाण्याने गझल एकसुरी व कृत्रिम होत गेली.
८)गझल वर्णनपर मांडणीत अडकत चालली आहे.
९) मराठी गझल धार्मिक व प्रादेशिक गटातटांमध्ये विभागली जात आहे, इत्यादी.
अर्थात आक्षेप फक्त मराठी गझलेवरच घेतले जात आहेत असे नाही. उर्दू कवी कलीमुद्दीन अहमद यांनी गझलेला नंगे-शायरी (बेहुदी शायरी) म्हटले आहे. कवी शमीम अहमद शमीम यांनी गझलेस मनहुस शैली की शायरी म्हटल्याचे आढळते. अज्मतुल्ला खान यांनी तर 'ग़ज़ल काबिले गर्दन जदनी है' म्हटले आहे. काफिया-पैमाईच्या (केवळ यमक जुळवण्याच्या) विरोधात असलेले व गझलेला 'मानी आफरिनी' म्हणजे विलक्षण अर्थवत्ता मानणारे गालिबही एका ठिकाणी म्हणतात की,
बद्रके शौक नहीं जर्फे तंग ना ए ग़ज़ल
कुछ और चाहिए वसुअत मेरे बयाॅं के लिए
(आशय - गझलेचा आकृतीबंध माझ्या अभिव्यक्तीसाठी पुरेसा नाही. त्यासाठी मला वेगळ्या पर्यायांची गरज आहे.)
त्यामुळेच गझलेवर घेतले जाणारे आक्षेप माझ्या गझलेला तर लागू पडत नाही ना हे माझ्यासह अनेकांनी वारंवार तपासून पाहत राहणे, दुरुस्ती करत राहणे, मराठीसह हिंदी उर्दूतील छंदशास्त्र- गझलअभ्यासकांचे, समीक्षकांचे लेखन अभ्यासत राहणे व नव्याने गझल लिहू इच्छिणाऱ्या कवींपर्यंत ते पोहोचवण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक ठरते. तसेच प्रत्येकवेळी आपला अनुभव गझलेच्या आकृतीबंधातच अभिव्यक्त करण्याचा हट्ट धरून न बसता गालिब म्हणतो तसे वेगवेगळे काव्यप्रकारही हाताळत राहिले पाहिजे . असो.
चार-पाच पृष्ठांच्या मर्यादित लेखात गझलविधेचा परिपूर्ण परिचय करून देता येणं अशक्य आहे. त्यामुळे गझलेच्या ठळक पैलूंचाच उहापोह या लेखात केला आहे. अनेक बारकावे सुटले आहेत. मी उर्दूचा जाणकार नाही तसेच लेखातील काही संदर्भ मुक्तस्रोतांतून घेतलेले आहेत. त्यामुळे लेखात काही त्रुटी राहिल्या असण्याची शक्यता आहे. जाणकारांनी आपले अभिप्राय अवश्य कळवावेत.
- राजीव मासरूळकर
rajivmasrulkar@gmail.com