सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Wednesday, 10 May 2017

तुझ्या हृदयात माझे घर कुठे आहे?

तुझ्या हृदयात माझे घर कुठे आहे?
तुझ्याबाबत मला आदर कुठे आहे?

घसरतो संस्कृतीचा पाय केंव्हाही
जिण्याला ती जुनी पाचर कुठे आहे?

दिसे स्वप्नात हिरवे पीक बापाला
खरे त्याला इथे वावर कुठे आहे?

कशाला आजवर तू लाज जपलेली?
तुझ्याइतकीच ती सुंदर कुठे आहे?

उगा दमछाक झाली वाजवुन पुंगी
गळाली लाळ पण गाजर कुठे आहे?

~ राजीव मासरूळकर
    दि.14/01/17

दिल में सुंदर ख्वाब रख्खा है

दिल में सुंदर ख्वाब रख्खा है
नाम उस का गुलाब रख्खा है

छलक सके ना प्यार आखों से
चेहरे पर नकाब रख्खा है

रात की सरकार न काली हो
चाँद जैसा नवाब रख्खा है

सीख़ मैं ना सका जमाबाकी
पर खुशी का हिसाब रख्खा है

जिंदगी की रेस जीतो तुम
एक आंसू खिताब रख्खा है

~ राजीव मासरूळकर
    दि.7/2/2017 22:30

वादळे

'वादळे'

चंद्र चांदणीस रोज भेटतो नवा नवा
भेट तू तशीच, आत पेटवून गारवा !

मोरपीस, बासरी, सवंगडी नि राधिका
जीव गुंततो तुझ्या कथेत यार माधवा!

सूर्य पाठ दाखवी असूनही अमावस्या
मित्रहो, करू उजेड , या, बनून काजवा !

नेस तू महागडे नवीन वस्त्र भरजरी
मी उभा तुझ्या समोर नागवाच नागवा !

चूल पेटते , चुलीस काम फक्त पेटणे
घास दे कुणा, कुणास दाह देतसे तवा !

मेघ दाटता नभात वादळे मनी उभी
झोपडी , पिके , मुले ; नको नको, हवा हवा !

- राजीव मासरूळकर
मासरूळ , जि. बुलडाणा
दि ३.११.१२

तुला कळू दे

तुला कळू दे

कुणी कुणाचे नाही इतके तुला कळू दे
तरी फुलाचे फळ होण्या पाकळी गळू दे !

केवळ नाते बघून का गलबलून यावे?
मुक्या तरूपर्णासाठी आसवे ढळू दे !

शहाणपण येऊ दे इतिहासाला जोखुन
व्यथा जगाची समकालाची तुला छळू दे !

किती दिवस कापूस मनाचा करपू द्यावा?
प्रकाशीत जग होण्यासाठी वात जळू दे !

इथे हजारो वळणे, वाटा क्षणाक्षणाला
तुझे नव्या वाटेने पद 'राजीव'  वळू दे !

- राजीव मासरूळकर

मायबाप


===मायबाप===

संसारसर्पाच्या विळख्यात
दारिद्र्याचं गरळ गिळून
प्रत्येक दिवशी स्वतःला
मजुरीच्या मोलात विकून
थकून भागून
माझे मायबाप
सांजावतांना
कवेत घेऊन येतात
एक अंधारसत्य . . . . . . . . . . . . !
त्यांच्या पिचलेल्या हाडांतून
उसळते आग
तिलाही देतात ते
रक्ताचे डाग . . . .
मी मात्र बसलेलो
थंडचा थंड
शिक्षणातल्या शौर्याने
बनलेलो षंढ . . . . . . !

- राजीव मासरूळकर
"मनातल्या पाखरांनो" मधून

काय साली जिंदगी झाली


कोरडी अन् कोडगी झाली
काय साली जिंदगी झाली

एक डोळा लागला लाजत
च्यायला, ही वानगी झाली

फेसबुक,व्हाट्सॅपवर सोशल
वेळ बाकी खाजगी झाली

मी मनाला मारले कायम
केवढी मोठी ठगी झाली!

का? , म्हणालो, एवढी दु:खी?
ती म्हणाली, पोरगी झाली!

तो तिला साली म्हणाला हो
कोणती ही दिल्लगी झाली?

~ राजीव मासरूळकर
    18/02/2016
    सकाळी 9:00

ये रविवारा...

ये रविवारा 😂

सप्ताहातील
कष्टाचा शिण
घालव सारा
ये रविवारा !

लवकर उठुनी तयार व्हावे
धावपळत ऑफिस गाठावे
दिनभर काबाडकष्ट करावे
माथ्यापासून वाहत जाती
घामाच्या धारा
ये रविवारा !

ऑफिसमधली खोटी कटकट
मुर्ख बॉसची तर्कट वटवट
टंकक की बोर्डाची खटखट
श्वास मोकळा देण्यासाठी
फोडून ही कारा
ये रविवारा !

पाच दिसांच्या कष्टांखातर
शनिवारच्या हाफ डे नंतर
तणाव चिंता हो छुमंतर
जरा फिरू दे अनुभवू दे
उनाड वारा
ये रविवारा !

हट्ट मुलांचा सहलीकरीता
सौ. कंटाळे टी व्ही बघता
मीही बोर ते तेची खाता
शिळे जाहले जीवन देवा
फुंकर तरी मारा!
ये रविवारा !

बसेन म्हणतो फेसबुकावर
कमेंट लाईक करेन वर वर
मैत्रिणींशी च्याटेन भरभर
स्वप्न पूर्ण होऊ दे, संपव
कामाचा भारा
ये रविवारा ! 😂

- राजीव मासरूळकर
दि १४ . १०. २०१२