सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Monday, 22 May 2017

भाते


घरघर करुनी फिरत राहते घासाशिवाय जाते
जीवन जळते , वणव्यामध्ये जणु गवताचे पाते !

कुठली शिल्लक , ठेव , बचत नी कुठली आणेवारी
डोहामध्ये मीन बुडावा , कर्ज जीवाला खाते !

चेहऱ्‍यावरी चढवुन घेतो नवे मुखोटे खोटे
अंतर्हृदयातून निसटते पण जपलेले नाते !

प्रेम जाळते , छळते , कळते,जडते तरी कुणावर
जातो सोडुुन कृष्ण , राधिका तरी विराणी गाते !

अंध अपंगा , पॉलीशवाल्याला 'ना' म्हणती सगळे
नाव झळकते तिथे ओतती खिसे आजचे दाते !

अहिंसकांना शांतिदुतांना लोकशाहीस ठोकर
बलात्कार देशावर करती भारतभाग्यविधाते !

वाग्बाणांना आवर सावर वापर बुद्धी राजू,
मारतील मन आणि माणसे ठरतिल नुसते भाते !

- राजीव मासरूळकर
मु पो मासरूळ
ता जि बुलडाणा
दि १३.१०.२०१२

शेवट

शेवट

लख्ख प्रकाशाकडे
पाहून पाहून
वैतागतात डोळे
डोकंही जातं पिकून .

घराबाहेर पडून
मिट्ट काळोखाकडे
बघावं एकटक
तेव्हा डोळे होतात शांत
गार वाऱ्‍याच्या स्पर्शानं
डोकंही थंडावतं
थाऱ्‍यावर येतं मन
हृदयाला फुटते नवी पालवी.

कसं हायसं वाटतं अंधारावर नजर फिरवतांना !
आपलासा वाटायला लागतो तो
एका क्षणात . . . .
कवटाळून घ्यावा असा . . . . . . !

प्रकाशानंतर अंधार
दिवसानंतर रात्र
सुरूवातीनंतर शेवट . . . . . .?

प्रकाशाकडून अंधाराकडे
सुरू असतो आपला प्रवास
हे मान्य करायला
जरा अवघडच...
पण
शेवट तर तसाच आहे ना सगळ्यांचा ?

- राजीव मासरूळकर

जगणे अनंत आहे...


झगडून वादळांशी जगणे अनंत आहे
हे गाव वेदनांचे मजला पसंत आहे !

संकल्पना जगाच्या आता किती बदलल्या
सगळे करून बसला , तो पुण्यवंत आहे !

सांगा कुठेय वस्ती त्या मुक्त पाखरांची ?
शोधात मी सुखाच्या फिरतो दिगंत आहे !

दिसतात आज सारे बाबा पिसाटलेले
भांडून सांगती की हो मीच संत आहे !

वाटा जुन्याच मिळती साऱ्‍या नव्या पिढ्यांना
ग्रीष्मासही म्हणवती , सुंदर वसंत आहे !

जिवनाकडून आता उरल्या न फार आशा
ती भेटलीच नाही , इतकीच खंत आहे !

जखमा तनामनाच्या ठसठस करून छळती
तितकेच वाटते मी आहे , जिवंत आहे !

जगतो कसाबसा तु वळवळ करून"राजू"
कसली गझल ? जगाला तू शब्दजंत आहे !

- राजीव मासरूळकर
मु पो मासरूळ
ता जि बुलडाणा

Sunday, 21 May 2017

तू दिसल्यावर मला न सुचते काही... गीत

 तू दिसल्यावर मला न सुचते काही
     तू दिसल्यावर....!
तू दिसल्यावर मलाच भुलते मीही
     तू दिसल्यावर....! ।।धृ।।

फुलास लाजवणारा सुंदर चेहरा हसरा
     पूर्ण गझल तू, मी शेरातील एकच मिसरा
     वाह.. वाह ही दाद निघाली शाही
     तू दिसल्यावर.....!!!1!!

पहिला पाउस भिजवुन जावा तशीच भिजले
   वसंतातला पळस फुलावा तशी बहरले
   तुला टिपुन घेण्याची नयनी घाई... 
   तू दिसल्यावर ...! !!2!!

तुझ्या रेशमी डोळ्यांमध्ये भविष्य दिसले
   अता न वाटे काही कोणी असले नसले
   तुझ्याकडे वळतात दिशाही दाही.... 
   तू दिसल्यावर! !!3!!

सांग कधी तू भेटायाला येतो आहे
    हात कधी तू माझा हाती घेतो आहे
    मनही माझे मला जुमानत नाही... 
    तू दिसल्यावर!!! 4!!

दे चल हाती हात, साथ कायमची
   काळजात प्रज्ज्वलित असो फुलवात सुखाची
   परस्परांना देऊया प्रेमाची ग्वाही... 
   आज खरोखर!!! 5!!


~ राजीव मासरूळकर
   सिल्लोड, जि.औरंगाबाद
   दि.25/4/2015
   रात्री 11:30 वाजता

पावसा रे

बहाणे सोडुनी ये पावसा रे
मनाचे कोरडे झाले किनारे

कसे एकाच वेळी सांग ठेवू....
क्षुधा पोटात अन् ओठात नारे???

तुझ्या वेणीवरी गजरा बहरला
बघुन रस्त्यासही फुटले धुमारे

विनवते संकटांना माय माझी
मुलांचा बाप आल्यावरच या रे

~ राजीव मासरूळकर

मी खुला बाजार झालो...

गझल

उष्ण झालो गार झालो
मी खुला बाजार झालो

तोलले आभाळ सारे
पण भुईला भार झालो

पंख मी फैलावले अन्
माणसांनो , घार झालो

त्या फुलाने स्मित केले
मी उरी गंधार झालो

घेतली माघार थोडी
तोच फुसका बार झालो

मी खऱ्‍याचे ढोंग केले
ईश्वरी अवतार झालो

मी खरे बोलून गेलो
लोकहो , गद्दार झालो

घेतली स्वेच्छानिवृत्ती
मी घरी भंगार झालो

नेमका दुष्काळ पडला
अमृताची धार झालो

चुंबिले तू मज असे की
तत्क्षणी मी ठार झालो !

- राजीव मासरूळकर
दि.२९.६.२०१२
रात्री १०.३० वाजता
पानवडोद,ता सिल्लोड

मंत्रालयाला आग लागते तेव्हाची कविता...


आग आणि खुर्ची

घरात आग
दारात आग
नारीत आणिक
नरात आग
उजेडात आग
अंधारात आग
ज्वानीच्या ऐन
भरात आग
रानात आग
रणात आग
सृष्टीच्या
कणकणात आग
पाण्यात आग
गाण्यात आग
खणखणणाऱ्‍या
नाण्यात आग

आग अशीच पसरत चाललीय
कणापासून
मनामनापर्यंत ..........
साम्राज्यांचं धुपट निघालं,
किल्ले गेले,
वाडे जळाले....
मंत्रालयाचे तिला वावडे नाहीच......
फायली जळतील,
माणसं जळतील .....
पण
खुर्ची कधी जळते काय . . . . . . . . . . . . ?

खुर्ची हा आत्मा आहे
कृष्णाने सांगितलेल्या
भगवद्गीतेतल्यासारखा . . . . . . . .

हे लोकशाहीवाल्यांनो ,
खुर्ची कधी जन्मतही नाही
कधी मरतही नाही
खुर्चीवर बसणारेच मरतात फक्त !

जो खुर्चीला नाशरहित
अजन्म नित्य अव्यय
मानतो
तो इतरांना मारूनही
न मारणाराच !

जशी झाडं पिकलेली पानं त्यागून
नवी पालवी धारण करतात
खूर्चीही अशीच
माणसं बदलत राहते . . . . . . . . . !

खुर्ची शस्त्राने कापल्या जात नाही
आगीत जाळल्या जात नाही
पाण्यात बुडवून नष्ट केल्या जात नाही
सोसाट्याचा वाराही
तिला हलवू शकत नाही !
कारण . . . . . . . .
ती अच्छेद्य आहे
अदाह्य आहे
अक्लेद्य आहे
अशोष्य आहे . . . . . . . !

खूर्ची नित्य
सर्वव्यापी
अचल आणि
सनातन आहे !

म्हणूनच म्हणतो
खुर्चीला सलाम करा
खुर्चीवर बसणाऱ्‍याला सलाम करा . . . . .

कारण
घरात आग
दारात आग
नरनारींच्या
'दप्तरा'त आग . . . . . . . . . . . . . . !

- राजीव मासरूळकर
दि . २१.०६. २०१२
रात्री ९.४५ वाजता
Jun 22, 2012