सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Monday, 22 May 2017

अभिव्यक्त व्हायचे आहे

मज सागरात जगण्याच्या वाहून जायचे आहे
अन् पाण्याहुन नीतळसे अभिव्यक्त व्हायचे आहे

मी कुठे कवी साहित्यिक, मी साधासूधा माणुस
मज रक्ताला रक्ताशी जोडून घ्यायचे आहे

मी पंख छाटले माझे दृष्टीच्या दिव्य करांनी
मज मातीवर मातीचे गुणगान गायचे आहे

तू निर्दय पाउस होउन जातोस वेळ का चुकवुन
तुज हृदयातिल थरथरते आभाळ द्यायचे आहे

तू डोळ्यातिल मेघांना आवरून धर थोडेसे
मज विरहग्रीष्मात आधी, न्हाऊन घ्यायचे आहे !

- राजीव मासरूळकर
दि १.८.२०१३
दुपारी. १.०० वाजता

भेटण्यास ये तू


सखे आग आहे
तुझी देहबोली
गुलाबाची लाली
ओठांवर ।।

नाकावर राग
देह जसा नाग
अत्तराची बाग
सदाफुली ।।

तुझे शब्द येती
जणू सूर येती
मला दूर नेती
स्वप्नदेशी ।।

तुझ्या वागण्याला
रेखीवता अशी
पडतसे फशी
पाहणारा ।।

तुझे गुण गाणे
नव्हे माझा हेतू
भेटण्यास ये तू
सांजवेळी ।।

- राजीव मासरूळकर
  दि.18.10.2011

शब्दयज्ञ


वास्तवाच्या रानाचं भान
शब्दाशब्दातून व्यक्त करणारे
आपण . . . . .

सत्य असत्य ,
चांगलं वाईट ,
ओंगळ भोंगळ ,
दिव्य, लांछन
सगळं सगळं मांडण्याचा
ठरवून पण . . . . . .

धरित्रीला गांजणारं ,
बियाण्यांची अडवणूक करणारं
ढेकूळ न् ढेकूळ
चुरा करणारी
हाती घेतलेली
सच्चेपणाची तिफण . . . . . . .

अवतीभवती माजलेलं तण . . . .
पेटलेलं रण . . . . . .
काळाची
मेंदूत चाललेली घणघण . . . . . .
कधी ताजमहल
कधी दलदल
कधी उदय . . .
कधी प्रलय . . .
करताहोत
पाऱ्‍यासारख्या चंचल
अन् ज्वालामुखीसारख्या अस्वस्थ
शब्दांत गुंफण . . . . !

भविष्याच्या लाखो पिढ्यांसाठी
स्थितप्रज्ञ होऊन
चालवलाय आपण
हा ज्वलंत शब्दयज्ञ . . . . .

हे सकलजनकल्याणकर्त्या
अजरामर शब्दांनो,
उजळून टाका यातून
मानवाचा क्षण अन् क्षण . . . . . . . . !

- राजीव मासरूळकर

चिरंतन


काय माझे नाव आणिक कोणता हा गाव आहे ?
कोठल्या रे स्थानकाते ही अनामिक धाव आहे ?

कोणता अमरत्वदायी मंत्र माझे श्वास जपती ?
सागराच्या मध्यभागी की उलटली नाव आहे ?

रोज माझे भिष्मशब्दच उर्मटांचे भक्ष्य होती
षंढ शीखंडीच येथे जिंकतो का डाव आहे?

चंद्रकोरीची प्रभाही का बळी जाते तमाला
चोर येथे जो खरोखर, तोच इथला राव आहे !

कापडांना, कागदांना बेहिशेबी भाव येथे
माणसाची भावना अन् वेदना बेभाव आहे !

नंददीपाच्या जिभेला सुक्ष्म काळी चीर गेली
तीच माझ्या मर्मस्थानीचा चिरंतन घाव आहे !

- राजीव मासरूळकर

कळी

गुलाबकळीसम
तुझे ओठ ते
तव ओठांवर
नजर गोठते

डोळ्यांमधल्या
पाण्यामधुनी
अनुरागाची
घुमती गाणी

गालावरच्या
खळीत वाटे
विश्वभरातील
सौख्यच दाटे

कच(सं)भारातून
बट सुटलेली
भासे मज जणु
अमृतवेली

तुझा देह हा
विजेसारखा
पावसासवे
जाहला सखा

तुझ्या मिठीची
ऊब आगळी
मम मौनाची
फुलुन ये कळी !

- राजीव मासरूळकर
दि १४.१.२०१३
रात्री ९.४० वाजता

जगून घे जरा


खळाळतो उफाळतो थरारतो जसा झरा
असेेच तू प्रसन्नसे नरा, जगून घे जरा !

रडूनही हसायचे, फसूनही हसायचे
हरायचे मरायचे नि दुःख पांघरायचे
क्षणोक्षणी तरी सुखात ठेव बांधवा, उरा
असेेच तू प्रसन्नसे नरा, जगून घे जरा

मुठीत काळ घ्यावया तुझ्यात आत्मशक्ति रे
न देव दानवात सत्य, मानवा तुझे खरे
भिती कशास फोल ती ? स्वभाव टाक लाजरा !
असेेच तू प्रसन्नसे नरा जगून घे जरा !

कशास राग लोभ मोह मत्सरास पोसशी ?
प्रकाशमान हो जसा कि शुक्ल पक्ष नी शशी !
भयान रात्र संपते नि सूर्य येतसे घरा !
असेेच तू प्रसन्नसे नरा, जगून घे जरा !

निराश पाश तोडुनी जगायचे जगायचे
पहाड लंघुनी कटू, पुढे पुढेच जायचे
नकोच आत्मघात! कर्म नेतसे दिगंतरा !
असेेच तू प्रसन्नसे नरा , जगून घे जरा ! ! !

- राजीव मासरूळकर
दि १०.१.२०१३
रात्री ११ वाजता

काटा


मना रक्ताळुनी गेला तुझ्या शब्दांतला काटा
तरी झाला तुझा माझा गणागोतात बोभाटा
कशाला भेटुनी तू पैनगंगेच्या तिरावरती
सरळ रस्त्यास माझ्या फोडला व्याकूळसा फाटा ?

जरी वाहून जल गेले तुझ्या प्रीतीनदीमधले
समुद्रासारख्या माझ्या मनी उसळे खुळ्या लाटा !
सुखाचे चार क्षण जडवून ठेवूया सखे हृदयी
खुले आभाळ भिरभिरण्या, खुल्या साऱ्‍या तुला वाटा !

राजीव मासरूळकर
सायं ७ वाजता
दि ३०.१०.१२