सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Monday, 27 April 2020

सत्य



मी शोध घेत राहिलो
वारंवार शोध घेत राहिलो

अन् सापडल्या फक्त दोनच गोष्टी...

एक  :
देव नाही
म्हणून हे जग इतकं क्रूर आहे.

दोन  :
देव आहे
आणि तो खूप क्रूर आहे...!

~ राजीव मासरूळकर
    औरंगाबाद

Tuesday, 21 April 2020

चेहरा माझा खरा नाही दिसत ना?

गझल

पाहिजे आहे तसे नाही मिळत ना
जग तुम्ही आहे तसे आहे विकत ना?

फक्त दिसतो मीच सोशल मीडियावर
चेहरा माझा खरा नाही दिसत ना?

जायचे आहे घराबाहेर थोडे
पाय तुमचाही तरी नाही निघत ना?

मी कशी ही भूक मिटवावी स्वत:ची
आग आहे आग ही नाही विझत ना

हात कोणाच्या कसा हातात देऊ
व्हायरस देहातला नाही दिसत ना

श्वापदांना झोप सध्या येत नाही
माणसांचा प्लॅन तर नाही शिजत ना?

एक येते साथ आणिक जग बदलते
जग तसे स्वत: कधी नाही शिकत ना

काळजी घेतील रस्ते यापुढे ही
माणसे रस्त्यावरी नाही फिरत ना?

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि.21/04/2020

तो म्हणाला

तो म्हणाला,
जगावरचं हे संकट टळलं की
सगळं काही ठीक होईल.
मी म्हणालो, काय ठीक होईल?
तो म्हणाला, हे जे गरीब आहेत ना,
ते गरीब राहतील अन् हे श्रीमंत श्रीमंतच.

★  ★  ★

मी म्हणालो, पण हा सगळा खटाटोप कशासाठी?
तो म्हणाला, गरीबांना जगवण्यासाठी.
मी पुन्हा म्हणालो, पण गरीबांना का जगवायचं?
तर तो गंभीर होत म्हणाला, मग हे श्रीमंत कसे जगू शकतील?

★  ★  ★

तो म्हणाला, गरिबांचा विकास झाला पाहिजे.
मी म्हणालो, त्याने काय होईल?
तो म्हणाला, बाजार वाढेल.
मी पुन्हा म्हणालो, त्याने काय होईल?
तो छाती फुगवत म्हणाला, श्रीमंत आणखी श्रीमंत होतील.

★  ★  ★

मी म्हणालो, हे बिचारे गरीब
पिढ्यान् पिढ्या गरीबच का आहेत?
तो म्हणाला, त्यांना श्रीमंत होता येत नाही म्हणून.
मी कळवळून म्हणालो, त्यांना श्रीमंत कसं होता येईल?
तर तो हसत हसत म्हणाला,
ते गरीबांनाच श्रीमंत करू लागतील, तेव्हाच.

★  ★  ★

~ राजीव मासरूळकर

Saturday, 18 April 2020

क(रो)णा : विडंबन

(कुसुमाग्रजांची क्षमा मागून) विडंबन

क(रो)णा

'ओळखलंत का सर मला', दारात आला कोणी
कपडे नव्हते अंगावरती, होते डोळ्यांत पाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
'रस्त्यांवरती कुणीच नाही, सगळेच घरात काहून;
घरजावयासारखा भारतात आलो, मनासारखा नाचलो
मोदीजींनी लॉकडाउन केलं- एकटाच रस्त्यावर वाचलो
मंदिर गेले, मस्जिद गेले, बियर बार बंद झाले
प्रसाद म्हणून पोलिसांहाती दंडे तेवढे ठेवले
धर्म, राजकारण घेऊन संगे सर, आता लढतो आहे
भाजीबाजार हिंडतो आहे, बागेत प्रेमी शोधतो आहे.'

डेटॉलकडे हात जाताच हसत हसत उठला
'औषध नको सर, जरा एकटेपणा वाटला-
मोडला तुमचा संसार तरी मोडला नाही कणा
हृदयावरती कोरुन ठेवा फक्त न् फक्त करोणा.'

~ राजीव मासरूळकर
    दि.18/04/2020

किती तरी दिवसांत : विडंबन


(कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांची माफी मागून)

किती तरी दिवसांत
नाही रस्त्यावर गेलो
किती तरी दिवसांत
नाही उन्हात नहालो

खुल्या रस्त्यांची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि कोवळ्या उन्हाची
ऊब ओळखीची तीच

केव्हा तरी रस्त्यावर
पुन्हा जाईन निर्भय
शहरातल्या गर्दीत
होईन मी गर्दीमय

आज अंतरात भीती
खुळ्या कोरोनाची थोडी
आणि बाहेर पोलिस
अंगावर काठी तोडी

बरा म्हणून हा इथे
टुबीएचकेचा फ्लॅट
बरी न्यूजचॅनलची
जीवघेणी वटवट!

~ राजीव मासरूळकर

Friday, 17 April 2020

वैफल्यग्रस्त वर्तमानाचं मौन


डोक्यावर अळ्या पडलेली किळसवाणी जखम घेऊन
पिसाळल्या कुत्र्यागत किंचाळत
दिशाहिन फिरत असलेलं हे अतिरेकी वर्तमान
पकडता येत नाहीये मला शब्दात

मला अर्थ लावता येत नाहीये
एकाच वेळी
आपल्या लाडक्या मनुष्यप्राण्यासह
सगळं अस्तित्वच गिळंकृत करण्यासाठी
सतत आ वासून सज्ज असलेल्या
या अथांग भयावह विश्वाला
लिलया जन्माला घालणारे तथाकथित असंबद्ध ईश्वर
आणि
अवघं विश्वच एका क्षणात पायदळी तुडवण्यासही मागेपुढे न पाहणारी
स्वयंघोषित सर्वश्रेष्ठ बुद्धिमान उन्मादी मानवजात
का झाले आहेत आपापल्या
अत्यंत असुरक्षित तकलादू मातीमय बिळांत कुलूपबंद?

मी थकून गेलोय
समाज व सामाजिक या ऐतिहासिक युद्धखोर शब्दांचं
शवविच्छेदन करून करून
पण सापडू शकलेला नाहीय मला
त्याचा कालनियोजित आदीमोत्तर भविष्यवाही डीएनए

घराविषयीच्या काहुरभरल्या भयगंड भावनांचं
मनात उधानलेलं एकाकी हळवं वादळ
पोटातल्या जालिम जीवघेण्या आगडोंबावर मात करत
का निघालं असावं अनवाणी पायांनी
हजारो मैलांचं सामाजिक अंतर कापत...?
कुणी का कापले असतील इतक्या क्रुरपणे
हे सुंदर कुशल निर्मितीक्षम हात
एकाच अघोरी घावात....?
असे प्रश्न सध्या माझ्या मुर्दाड मनाला
आपलेपणानं स्पर्शही करू शकत नाहीयेत

हे  मास्क, सॅनिटायझर, लॉकडाऊन, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग, वगैरे वगैरे...
ही शाब्दिक दहशत का लादू पाहतेय
ऐतिहासिक गुलामगिरीतून नुकत्याच सावरलेल्या
माझ्या वैचारिक पंखफुटल्या समाजमनावर
एक अत्याधुनिक अस्पृश्यता....

माझ्या डोळ्यांसमोर पसरलाय इतका भयग्रस्त लख्ख प्रकाश
की मला दिसू शकत नाहीये
शेतावरून अमानुष यंत्र फिरलेल्या
लसलसत्या भाजीपाल्याचं हिरवं रक्त
आणि रस्त्यावर बेमौत चिरडल्या गेलेल्या
टंच टरबुजांचे लालभडक आगतिक अश्रू...

या निरस होत चाललेल्या बेचव जगण्याच्या
अळणी कविता लिहून
कुठली क्रांती घडवून आणणार आहे
माझ्यातला समाजवेडा कवी...?

एका अदृष्य विषाणूच्या दहशतीखाली
आपल्या प्रिय व्यक्तीला स्पर्श करून
प्रेम व्यक्त करायलाही घाबरणारा,
शहराच्या गल्लीबोळांतून गुरं  कोंबावीत तशी लेकरं कोंबून
अनेक पिवळ्याधम्मक स्कुलबसेसमधून गोळा करून
एकेका बेंचवर तीन तीन लेकरं बसवत
इंटरनॅशनल ज्ञान देणा-या महागड्या शहरी शाळेत
आपल्या लेकराला कसं पाठवावं
या विवंचनेत असलेला माझ्यातला भेदरलेला कवी
कसं लिहू शकणार आहे
नव्या युगाच्या स्वागताचं जाज्वल्य क्रांतिगीत....?

पण
क्रांतीबीज तर कधीचंच रूजत घातलं गेलंय मनामनात
आता कोणत्याही क्षणी फुटू शकतील त्याला
मानवतामुलक नवतेचे लुसलुशीत कोंब
हे अगम्य कालजेय ऋतुचक्रा, माझा हा भाबडा आशावाद खरा ठरव....!
या वैफल्यग्रस्त वर्तमानाचं मौनव्रत सोडवून
नव्या ऐक्यमय भविष्याची तुतारी फुंकण्याची
हीच तर योग्य वेळ आहे....!

~ राजीव मासरूळकर
    दि.17/04/2020
    औरंगाबाद

Wednesday, 15 April 2020

वेढा

आम्ही गडावर आहोत
एवढे दिवस गडावरच काढावे लागतील असं वाटलं नव्हतं
गनिम मोठ्या फौजेसह आमच्याकडे चालून येत आहे
ही बातमी लागताच
आम्ही आमच्या अभेद्य गडावर सुरक्षित पोहोचलोत
आमच्या हेरांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच
पण फितुरी काही कमी नाहीय आमच्या राज्यात
आम्हाला गडावरून सोडवण्यासाठी
असंख्य मावळे लावताहेत प्राणाची बाजी
कित्येक पडताहेत धारातिर्थी
पण काळाचं भान अन् परिस्थितीची जाण नसलेले
हे अज्ञानी फितूर उठले आहेत आमच्या मुळावर
आणि आता गनिम हजाराचे पाच लाख होऊन
घालत आहे गडाला वेढा
मावळे देतायत कडवी झुंज
करताहेत जखमींवर उपचार
घालताहेत बेघरांच्या तोंडी दोन घास
शोधताहेत गनिमी काव्याचे नवे मार्ग
फंदफितुरीच्या नादात रस्त्यावर उतरलेल्यांना
लावताहेत परतवून
पण
जीवनावश्यक चिरीमिरीच्या मोहात पडून
रयत अडकतच चाललीय गनिमाच्या जाळ्यात
धारातिर्थी पडलेल्यांच्या प्रेतांचा खच पडायला सुरूवात होतेय
गनिमाच्या धाकाने देता येत नाहीय
आपल्यांनाच मूठमाती
गडावरील जनता हवालदिल होत चाललीय दिवसेंदिवस
पण आम्ही हरलेलो नाहीयोत अजून
आम्ही स्वत: दक्ष आहोत
रयतेला सांगताहोत दक्षता घ्यायला
गडावर राहून का होईना पुरवतो आहोत आवश्यक ती रसद
गरजू युद्धग्रस्तांपर्यंत
आणि मुख्य म्हणजे वाढवतो आहोत त्यांचं मनोबल
जमेल त्या पद्धतीनं...

तरीही
धर्म, राजकारण आणि विनाकारण फिरणारे फितुर
यांच्यापुढे आम्ही होत आहोत हतबल
या हतबलतेनं आमच्या अभेद्य गडाचाही
उडतोय थरकाप
पण आम्ही घाबरणारे नाहीयोत...

लढाई सुरूच आहे
आम्ही जिंकून दाखवूच.....!

~ राजीव मासरूळकर
    औरंगाबाद
    दि.15/04/2020