सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Friday, 17 April 2020

वैफल्यग्रस्त वर्तमानाचं मौन


डोक्यावर अळ्या पडलेली किळसवाणी जखम घेऊन
पिसाळल्या कुत्र्यागत किंचाळत
दिशाहिन फिरत असलेलं हे अतिरेकी वर्तमान
पकडता येत नाहीये मला शब्दात

मला अर्थ लावता येत नाहीये
एकाच वेळी
आपल्या लाडक्या मनुष्यप्राण्यासह
सगळं अस्तित्वच गिळंकृत करण्यासाठी
सतत आ वासून सज्ज असलेल्या
या अथांग भयावह विश्वाला
लिलया जन्माला घालणारे तथाकथित असंबद्ध ईश्वर
आणि
अवघं विश्वच एका क्षणात पायदळी तुडवण्यासही मागेपुढे न पाहणारी
स्वयंघोषित सर्वश्रेष्ठ बुद्धिमान उन्मादी मानवजात
का झाले आहेत आपापल्या
अत्यंत असुरक्षित तकलादू मातीमय बिळांत कुलूपबंद?

मी थकून गेलोय
समाज व सामाजिक या ऐतिहासिक युद्धखोर शब्दांचं
शवविच्छेदन करून करून
पण सापडू शकलेला नाहीय मला
त्याचा कालनियोजित आदीमोत्तर भविष्यवाही डीएनए

घराविषयीच्या काहुरभरल्या भयगंड भावनांचं
मनात उधानलेलं एकाकी हळवं वादळ
पोटातल्या जालिम जीवघेण्या आगडोंबावर मात करत
का निघालं असावं अनवाणी पायांनी
हजारो मैलांचं सामाजिक अंतर कापत...?
कुणी का कापले असतील इतक्या क्रुरपणे
हे सुंदर कुशल निर्मितीक्षम हात
एकाच अघोरी घावात....?
असे प्रश्न सध्या माझ्या मुर्दाड मनाला
आपलेपणानं स्पर्शही करू शकत नाहीयेत

हे  मास्क, सॅनिटायझर, लॉकडाऊन, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग, वगैरे वगैरे...
ही शाब्दिक दहशत का लादू पाहतेय
ऐतिहासिक गुलामगिरीतून नुकत्याच सावरलेल्या
माझ्या वैचारिक पंखफुटल्या समाजमनावर
एक अत्याधुनिक अस्पृश्यता....

माझ्या डोळ्यांसमोर पसरलाय इतका भयग्रस्त लख्ख प्रकाश
की मला दिसू शकत नाहीये
शेतावरून अमानुष यंत्र फिरलेल्या
लसलसत्या भाजीपाल्याचं हिरवं रक्त
आणि रस्त्यावर बेमौत चिरडल्या गेलेल्या
टंच टरबुजांचे लालभडक आगतिक अश्रू...

या निरस होत चाललेल्या बेचव जगण्याच्या
अळणी कविता लिहून
कुठली क्रांती घडवून आणणार आहे
माझ्यातला समाजवेडा कवी...?

एका अदृष्य विषाणूच्या दहशतीखाली
आपल्या प्रिय व्यक्तीला स्पर्श करून
प्रेम व्यक्त करायलाही घाबरणारा,
शहराच्या गल्लीबोळांतून गुरं  कोंबावीत तशी लेकरं कोंबून
अनेक पिवळ्याधम्मक स्कुलबसेसमधून गोळा करून
एकेका बेंचवर तीन तीन लेकरं बसवत
इंटरनॅशनल ज्ञान देणा-या महागड्या शहरी शाळेत
आपल्या लेकराला कसं पाठवावं
या विवंचनेत असलेला माझ्यातला भेदरलेला कवी
कसं लिहू शकणार आहे
नव्या युगाच्या स्वागताचं जाज्वल्य क्रांतिगीत....?

पण
क्रांतीबीज तर कधीचंच रूजत घातलं गेलंय मनामनात
आता कोणत्याही क्षणी फुटू शकतील त्याला
मानवतामुलक नवतेचे लुसलुशीत कोंब
हे अगम्य कालजेय ऋतुचक्रा, माझा हा भाबडा आशावाद खरा ठरव....!
या वैफल्यग्रस्त वर्तमानाचं मौनव्रत सोडवून
नव्या ऐक्यमय भविष्याची तुतारी फुंकण्याची
हीच तर योग्य वेळ आहे....!

~ राजीव मासरूळकर
    दि.17/04/2020
    औरंगाबाद

3 comments: