मायबोली
काय सांगू काय आहे मायबोली
नेक दुसरी माय आहे मायबोली !
बंड किँवा चंड दोन्ही वासरांना
चाटणारी गाय आहे मायबोली!
मानवाच्या चिंतनाच्या पृष्ठभागी
राहणारी साय आहे मायबोली !
आतला आवाज सर्वांना कळावा
हा निरोगी न्याय आहे मायबोली !
ज्ञानियाचा, नामदेवाचा तुक्याचा
वैभवी अध्याय आहे मायबोली !
- राजीव मासरूळकर
२६ऑगस्ट २०१२
सकाळी ६.४५ वाजता