सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Sunday, 27 August 2017

दिखावा चालला आहे

सुखादु:खात आनंदी म्हणे जगणे कला आहे
किती जगतो खरे आपण? दिखावा चालला आहे

तुझ्यामाझ्यावरी आहे नजर बारीक सगळ्यांची
जणू त्यांना तुझामाझा सुगावा लागला आहे

उबळ वातावरण पाहून येते माणसाला का?
जुना छातीत दडलेला कितीसा खोकला आहे?

तमा आहे कुठे कोणास कोणाच्या मनाची, पण
तमा हातात कोणाच्या कुणाचा दाखला आहे...

बरा होतो दगड निश्चिंत रस्त्याच्या कडेला मी
कुणी देवा मला शेंदूर नाहक फासला आहे?

~ राजीव मासरूळकर

Saturday, 26 August 2017

काय असे घडते, बाप्पा?

बाप्पा....

केवळ दहा दिवस आल्याने काय असे घडते बाप्पा?
किती जनांची भक्ती माणुसकीवरती जडते बाप्पा?

तुझे भक्त बघ कसे नाचती डीजेवर ढोसुन दारू
दरवर्षी हे बघत राहणे तुज का आवडते बाप्पा?

तुझ्याच नावे जमा वर्गणी खिशात जाते कुण्या कुण्या
जुगार, भ्रष्टाचार, प्रदूषण तुझ्यामुळे नडते, बाप्पा!

तू असल्यावरसुद्धा येथे जातधर्म तरतात कसे?
बलात्कार, हिंसाचाराने काळिज फडफडते, बाप्पा !

येताना पाऊस आणता आला तर बघ दरवेळी
तुझे आगमन शेतक-याच्या पथ्यावर पडते, बाप्पा!

दहा दिवस तू रहा मजेने... शीला, मुन्नी, झिंगाट हो
तू गेल्यावर इथे कुणाचे काही का अडते, बाप्पा?

~राजीव मासरूळकर
   25/08/2017 10:00 pm
   सावंगी, औरंगाबाद

Sunday, 20 August 2017

आयुष्या...


कधी होतोस गहिरा गूढ तू आकाश आयुष्या...
कधी तू चालती फिरती निरर्थक लाश आयुष्या...

तुझी व्यसने, तुझी स्वप्ने, तुझे जगणे फकिरीचे...
जगासाठी किती आहेस तू अय्याश आयुष्या...!

चुकीने मी तुला अन् तू मला भेटायला आलो
तुला भेटायला होती हवी ती... काश ... आयुष्या...

भुकेचे राज्य मिटवाया जिवाची पेरणी करतो
कसा त्याच्या गळ्याला लावशी तू पाश आयुष्या...?

तुला चर्चेत वा वलयात कायम राहणे आहे
तुझ्या हट्टात आहे जाण सत्यानाश... आयुष्या!

तुला वगळून मी नाही, मला वगळून तू नाही
कसा तू लावला हा सापळा... शाबाश आयुष्या!

~ राजीव मासरूळकर
   दि.20/08/2017
   सावंगी, औरंगाबाद

Thursday, 17 August 2017

प्रत्येकाचे नाक शेंबडे

गझल

असो कितीही मोहक रुपडे
प्रत्येकाचे नाक शेंबडे

वस्त्र झाकते शरीर वर वर
मन फिरते आतून नागडे

ढग आहे की आहे गेंडा?
शिव्या घाल वा घाल साकडे...

कपाट भर कपडे शहराला
घरी मायचे विटले लुगडे

किती बांधल्या पक्क्या भिंती
का फुटले घर? कशाचे तडे?

सत्य जमावच रस्त्यावरचा
खोटी शाळा, विसंगत धडे!

~ राजीव मासरूळकर
   16/8/2017
   सोयगाव, औरंगाबाद

Saturday, 5 August 2017

काजळावर का जळावी काजळी?

होत आहे रोज चर्चा वादळी
कोण ही भरणार आता पोकळी

दूरदृष्टी लाभली आहे जरी
माणसाची भूक आहे आंधळी

जाहली रस्त्यावरी  गर्दी किती
चंद्र आला फुलवुनी गाली खळी

शस्त्र बाळगतात काट्यांचे जरी
हळदुल्या नाजूक असती बाभळी

धर्मजातींतील जाळा भांडणे
काजळावर का जळावी काजळी?

~ राजीव मासरूळकर