सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Wednesday, 22 August 2018

कला

लाख वर्षांपासुनी माणसा, सांगू तुला
साधली एकच कला वापरुन फेकू चला

आपला जो वाटतो आपला असतो कुठे
काम काढाया तया खाज प्रेमाची सुटे
ओळखू येतो कुठे कोण आहे चांगला

काम साधायास जर भेटला नाही कुणी
घोर शत्रूला बघा मानले जाते गुणी
बेत समजे ना कुणी काय आहे आखला

भूक वैश्येची तिला शील द्याया लावते
भोगतो परस्त्रीस नर मर्द तो ठरतो इथे
सोसते तोवर भली, वाटते नंतर बला

स्वार्थ जातो साधला साथ असते तेवढी
कोण वरचढ वाटतो खेच त्याची तंगडी
फक्त प्रामाणिक गळा जात असतो कापला

~ राजीव मासरूळकर
    दि.22/08/2018 12:40 am
    सावंगी, औरंगाबाद

Wednesday, 15 August 2018

स्वातंत्र्या...


मिळे स्वच्छंद जगण्याला तुझा आधार स्वातंत्र्या
तुझे मानू किती आणिक कसे आभार, स्वातंत्र्या!

मुके, बंदिस्त होते, दीन अन् लाचारही होते
तुझ्यायोगे मिळाली जीवनाला धार स्वातंत्र्या!

तुला उपभोगण्याची लत जगाला लागली आहे
कुणीही घेत नाही त्यातुनी माघार, स्वातंत्र्या!

तुझी शक्ती, वजन आम्ही इथे दररोज अनुभवतो
झुकत असते तुझ्यापुढती उभे सरकार, स्वातंत्र्या!

गळा दाबून भरदिवसा तुला लुटतातही काही
तुझे अस्तित्व हे कायम तुला छळणार, स्वातंत्र्या?

तुझ्या जन्मास आहे लाभला इतिहास रक्ताचा
तुझे भवितव्य आम्हाला कुठे नेणार, स्वातंत्र्या?

~ ©राजीव मासरूळकर
     पानवडोद 04:30 am
     15 ऑगस्ट, 2018

हे काही माझे मत नाही

मी कोणाचे ऐकत नाही
बहुधा माझी ऐपत नाही

देश उभा रांगेत सारखा
देणा-याची दानत नाही

विश्व जरी अंधारकोठडी
ती कोणाला झाकत नाही

ऐक मना तू नवा फोन घे
कॉल तुला बघ लागत नाही

शोधूया झाडांचा मेंदू
माणसास तो उमजत नाही

किती फळे विश्वास लगडली
गोड नव्हे, मी पाडत नाही

मी कोणाशी भांडत आहे
मी चे तर हे चिलखत नाही?

सुखात नाही कोणी येथे
या स्वर्गाला किंमत नाही

किती बोलके डोळे आहे
म्हणून कोणी वाचत नाही

वेगाने वाढत जाते ते
नाते अंतर कापत नाही

विवस्त्र इच्छा घेउन फिरती
लाज कुणाला वाटत नाही

राजनिती ढग शिकून आले
माया त्यांना लागत नाही

(देशाचा चेहरा बदलला
हा माझा प्रिय भारत नाही)

जे लिहिले ते तुमचे आहे
हे काही माझे मत नाही

~© राजीव मासरूळकर
     पानवडोद 02:00 am
     15 ऑगस्ट 2018