सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Tuesday, 4 September 2018

एक परिपूर्ण बाग आहे तो....

तो माळी नाहीच
एक परिपूर्ण बाग आहे तो...

तो कळ्यांसोबत डुलतो आहे
फुलांसारखा फुलतो आहे
वा-यासारखा सुगंध घेऊन फिरतो आहे
कोकिळ होऊन गातो आहे
मोर होऊन नाचतो आहे

तो आलाय आणि आलीय प्रसन्नता
कळ्या, फुलं, पाखरं भराभर झालीयत गोळा
कुठलाही भेदाभेद न बाळगता
त्याच्याभोवती
सुरू झालाय एक सुगंधी किलबिलाट
त्यांच्या चेह-यावर फुलंत जातायत अनंत चांदणफुलं
तो आल्यावरच बाग, खरी बाग वाटू लागलीय...

तो सांगतोय फुलापाखरांना त्यांचा इतिहास
दाखवतोय मातीत मिसळलेलं समूळ मूळ
ही बाग उभी राहण्यामागचा संघर्ष
आपल्या पारदर्शक दृष्टीतून
निर्विकारपणे
तो दाखवतोय त्यांना वर्तमान सत्य
देहाच्या पाकळ्या पाकळ्या होतील
इतका जीव तोडून
देतोय फुलण्याच्या विभिन्न कलांचे
प्रत्यक्ष अनुभव
आणि पाहतोय त्या निरागस डोळ्यांत एक विलोभनीय स्वप्न
ही बाग
स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय जपत
उत्तरोत्तर निसर्गसौंदर्याने नटत
कोट्यवधी वर्षांपर्यंत
गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे...
झटत राहतोय त्यासाठी
स्वत:च बीज, ऊन, वारा, पाऊस, खतही होऊन

तो माळी नाहीयेच मुळी
एक परिपूर्ण बाग आहे तो!

~ ©राजीव मासरूळकर
    दि.04/09/2018
    10:30 pm

#शिक्षकदिन_पुर्वसंध्या

Sunday, 2 September 2018

गझल : वाच जरा


जगायचे जर असेल सुखकर, वाच जरा
होशिलही मग तू ज्ञानेश्वर, वाच जरा

हसणा-या डोळ्यांचे कौतुक खुशाल कर
रडणारे डोळेही सुंदर वाच जरा

अफवा... जाळा, पकडा, मारा... रोज सुरू
वाचवायचे असेल जर घर ... वाच जरा

आनंदी मन, कुशाग्र बुद्धी, सुआचरण
देतो बघ शब्दांचा सागर.... वाच जरा

तुझ्या सभोती जिवंत पुस्तक वावरते
जगणे त्याचे किती भयंकर.. वाच जरा

एक शब्द जन्माचे सार्थक करेलही
एक शब्द करतो का वापर... वाच जरा

~ ©राजीव मासरूळकर
    सावंगी, औरंगाबाद
    दि.02/09/2018
    00:20 AM