सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Wednesday, 10 May 2017

इथे कुणाला परी पाहिजे.... हजल


💖हझल💞

इथे कुणाला परी पाहिजे..? 👰
दिसायला बस बरी पाहिजे😜

स्वप्नामध्ये हजार येती👸👧👩
पण एखादी खरी पाहिजे💑💏

हापिसातली जीव लावते😋😋😍
तिच्यासारखी घरी पाहिजे....🏠😁😁

पिस नसले तर नसु दे,  बाकी🍗🍖🍴
रस्स्यावरती 'तरी' पाहिजे😭😭😭

'बसल्या'वर कळते की कुठली🍺🍻
चव या ओठांवरी पाहिजे💋💋

कुणास येथे हवीय पत्नी🙇👪
कुणास बस लॉटरी पाहिजे💴💶💰

~ राजीव मासरूळकर😜😜

येणा-याचे स्वागत आहे

येणा-याचे स्वागत आहे

युगे संपली, वर्षे गेली, काळ क्षणांना चाटत आहे
जाणा-याने खुशाल जावे, येणा-याचे स्वागत आहे

तुजसोबत मी आलो इथवर, वादळास छातीवर झेलत
अर्ध्यावर तुज कसे म्हणवते, दिशाहीन हे गलबत आहे ?

धन, सौंदर्याच्या न यशाच्या नशेत जो झिंगला कधीही
थेंब थेंब दरदिवशी अमृत त्यास मिळावे, वाटत आहे

कुणी ठरवले तुझे न् माझे नाते अचूक माहित नाही
लाकुडतोड्या असेल तो; पण लाकुड मी, तू करवत आहे

किती सुखावत जपतो आपण जन्मापासुन स्वप्ने सगळी
सरताना कळते इतके की जगणे म्हणजे फसगत आहे

- राजीव मासरूळकर
दि. 31/12/2013

तुझ्या हृदयात माझे घर कुठे आहे?

तुझ्या हृदयात माझे घर कुठे आहे?
तुझ्याबाबत मला आदर कुठे आहे?

घसरतो संस्कृतीचा पाय केंव्हाही
जिण्याला ती जुनी पाचर कुठे आहे?

दिसे स्वप्नात हिरवे पीक बापाला
खरे त्याला इथे वावर कुठे आहे?

कशाला आजवर तू लाज जपलेली?
तुझ्याइतकीच ती सुंदर कुठे आहे?

उगा दमछाक झाली वाजवुन पुंगी
गळाली लाळ पण गाजर कुठे आहे?

~ राजीव मासरूळकर
    दि.14/01/17

दिल में सुंदर ख्वाब रख्खा है

दिल में सुंदर ख्वाब रख्खा है
नाम उस का गुलाब रख्खा है

छलक सके ना प्यार आखों से
चेहरे पर नकाब रख्खा है

रात की सरकार न काली हो
चाँद जैसा नवाब रख्खा है

सीख़ मैं ना सका जमाबाकी
पर खुशी का हिसाब रख्खा है

जिंदगी की रेस जीतो तुम
एक आंसू खिताब रख्खा है

~ राजीव मासरूळकर
    दि.7/2/2017 22:30

वादळे

'वादळे'

चंद्र चांदणीस रोज भेटतो नवा नवा
भेट तू तशीच, आत पेटवून गारवा !

मोरपीस, बासरी, सवंगडी नि राधिका
जीव गुंततो तुझ्या कथेत यार माधवा!

सूर्य पाठ दाखवी असूनही अमावस्या
मित्रहो, करू उजेड , या, बनून काजवा !

नेस तू महागडे नवीन वस्त्र भरजरी
मी उभा तुझ्या समोर नागवाच नागवा !

चूल पेटते , चुलीस काम फक्त पेटणे
घास दे कुणा, कुणास दाह देतसे तवा !

मेघ दाटता नभात वादळे मनी उभी
झोपडी , पिके , मुले ; नको नको, हवा हवा !

- राजीव मासरूळकर
मासरूळ , जि. बुलडाणा
दि ३.११.१२

तुला कळू दे

तुला कळू दे

कुणी कुणाचे नाही इतके तुला कळू दे
तरी फुलाचे फळ होण्या पाकळी गळू दे !

केवळ नाते बघून का गलबलून यावे?
मुक्या तरूपर्णासाठी आसवे ढळू दे !

शहाणपण येऊ दे इतिहासाला जोखुन
व्यथा जगाची समकालाची तुला छळू दे !

किती दिवस कापूस मनाचा करपू द्यावा?
प्रकाशीत जग होण्यासाठी वात जळू दे !

इथे हजारो वळणे, वाटा क्षणाक्षणाला
तुझे नव्या वाटेने पद 'राजीव'  वळू दे !

- राजीव मासरूळकर

मायबाप


===मायबाप===

संसारसर्पाच्या विळख्यात
दारिद्र्याचं गरळ गिळून
प्रत्येक दिवशी स्वतःला
मजुरीच्या मोलात विकून
थकून भागून
माझे मायबाप
सांजावतांना
कवेत घेऊन येतात
एक अंधारसत्य . . . . . . . . . . . . !
त्यांच्या पिचलेल्या हाडांतून
उसळते आग
तिलाही देतात ते
रक्ताचे डाग . . . .
मी मात्र बसलेलो
थंडचा थंड
शिक्षणातल्या शौर्याने
बनलेलो षंढ . . . . . . !

- राजीव मासरूळकर
"मनातल्या पाखरांनो" मधून