सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Wednesday, 10 May 2017

मनासारखे झाले माझ्या मनासारखे



मनासारखे झाले माझ्या मनासारखे
आठवपक्षी नयनी आले घनासारखे

कोकिळ गेले गात एकटे अमराईतुन
कुणीच नाही बाई गं साजनासारखे

मनासारखे झाले आल्या पाउसधारा
पेटुन उठले रान मनाचे वनासारखे

आभाळाला मिठी मारण्या कशास सांगू
पाय तुझे दिसतात सदा वामनासारखे

आत्मा परमात्मा मुक्ती की विराट दर्शन
तृप्त मनाला करेल कोणी तनासारखे ?

- राजीव मासरूळकर
दि २३.५.१२
रात्री १०.३५ वाजता

पानगळ

पानगळ

जेवढा मी धट उखळ होतो
काळही निर्दय मुसळ होतो

योग्य वेळी घे वळण, लिलया
वाकडा रस्ता सरळ होतो

पांढरा होतो फळा काळा
तसतसा माथा उजळ होतो

शेवटी झालीच ताटातुट
फार गेलेलो जवळ होतो

शांत होऊ दे जरा वादळ
डोहही नंतर नितळ होतो

दे खरे स्वातंत्र्य पोराला
बघ ध्रुवासम तो अढळ होतो

ती बरसते मेघ अवकाळी
मी हवीशी पानगळ होतो

~ राजीव मासरूळकर

कविता

कविता

कविता
निघाली आहे
नवा रस्ता तुडवत
कल्पनेचा पदर वा-यावर सोडून
प्रतिमेची कंबर मोडत
प्रतिसृष्टीची छाती उभारून
परंपरेचे एकेक वस्त्र भिरकावत
येणा-या निर्वस्त्र काळाकडे......

तिचा तो
भडक मेकप
बेधडक चाल
अन् सैल आकृतिबंध बघून
चांदणफुलांनी केले आहेत डोळे बंद
सूर्याचे तळपणे आले आहे गोत्यात
अन् अवखळ वारा मात्र चाललाय भाव खाऊन.......

~ राजीव मासरूळकर
    दि.22/10/2016

दिवाळी

दिवाळी

दिव्यातील वातीस जाळे दिवाळी
जगाला सुखाचे उमाळे -दिवाळी !

मने काळवंडून जाती धनाने
तनातील काळे उजाळे दिवाळी !

फटाके, फराळे, वसन, रोशनाई
हिशेबी खिसे, ठोकताळे दिवाळी !

कुठे बंगल्यांतून लोळे झळाळे
कुठे झोपडीलाच जाळे दिवाळी !

दहा दिन मजेची सुखाची उबेची
हिवाळ्यातले मग उन्हाळे - दिवाळी!

इथे नांदता शांतता दीपकांची
धरेवर जणू स्वर्ग भाळे :  दिवाळी !

- राजीव मासरूळकर
मासरूळ , बुलडाणा
दि ७.११.१२

��HAPPY DIWALI��

अंधारात खितपत पडलेल्यांना,
त्यांच्यासाठी वातीप्रमाणे जळून
त्यांचेही जगणे प्रकाशमान करणा-यांना,
मनात कुणाकुणाविषयी काळेबेरे असलेल्यांना,
ते दूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असलेल्यांना,
झगमगाटातच सुख मानणा-यांना,
त्यांचा झगमगाट बघण्यातच
आपलीही दिवाळी साजरी झाल्याचे सुख मानणा-यांना.....

बाजारपेठा आतोनात सजवून
ग्राहकांना आकर्षित करणा-या विक्रेत्यांना,
खरेदीची लवंगी लडीसारखी लांबलचक यादी दाखवून
 नव-याच्या छातीत धडकी भरवणा-या बायकांना,
पगारदारांना....
बोनसवर जल्लोष करणारांना,
बिगरबोनस दिवाळखोरी करणारांना,
सीमेवर देशासाठी रात्रंदिन गोळीबाराचीच दिवाळी साजरी करीत
वेळ आलीच तर प्राणांची आहुती देणा-या
राष्ट्राभिमानी जवानांना,
घडणा-या चांगचांगल्या घटनांचे श्रेय स्वत:कडे घेणारांना,
स्वत:च्या यशाचे श्रेय नम्रतेने इतरांना देणारांना,
दुष्काळी स्थितीतही मानधनात, निवृत्तीवेतनात
 दुप्पट वाढ करून घेणा-या आपल्या प्रतिनिधींना,
त्यांच्या नावाने खडे फोडणा-या सुशिक्षित अडाणी नेमस्त मतदारांना.....

बरंवाईट लिहिणा-या सर्व साहित्यिक बंधुभगिनींना,
बरंवाईट छापणा-या सन्माननीय प्रकाशक व पत्रकारांना,
समस्त दिवाळी अंकांना....
त्यात जाहिराती देऊन पृष्ठसंख्या वाढवत
शुभेच्छांद्वारे हातभार लावणा-या हितचिंतकांना....

कर्ज काढून का होई ना
 लेकीबाळींचा माहेरवास सुखाचा करणा-या
समस्त वंदनीय सहनशील शेतक-यांना,
मामाच्या गावी जाऊन
फटाक्यांचा जल्लोष अनुभवण्यासाठी
दिवाळीच्या सुट्ट्यांकडे डोळे लावून बसलेल्या बाळगोपाळांना....

तुम्हा सर्वांना
हा दिपोत्सव शारीरिक, मानसिक, आर्थिक,
नैसर्गिकदृष्ट्या आरोग्यदायी व सुखमय जावो ही सदिच्छा!!!

शुभ दीपावली!!

~राजीव मासरूळकर

एक निनावी कविता

सोडून द्यायचीय मलाही whatsapp वर
माझीच एक कविता निनावी....

सोडून द्यायचीय मलाही whatsapp वर
माझीच एक कविता निनावी
जोडून तिला एक वेधक शिर्षफलक
कि
"फारच सुंदर कविता आहे ही.
कुणाची आहे माहित नाही.
पण एकदा अवश्य वाचा,
अन् आवडली तर अवश्य share करा... "
असं इंग्रजीत वगैरे टायपून....

कविता असेल इतकी साधीभोळी
कि
कवितेची अॅलर्जी असलेल्यांनीही
ती वाचावी अगदी मन लावून....

कवितेत पाळलेलं नसेल कुठलंच काव्यमुल्य
सोडलेला नसेल मी ही
माझ्या काव्यशैलीचा कुठलाच ठसा बेमालुमपणे...
नसेल कुठलंच आडवळण,
कोणताच आडपडदा वगैरे...
असेल सगळं सरळ.... सहज.... सुंदर....

कवितेत पेरलेली असेल अलगद
एखादी आल्हाददायक प्रेमधून
पावसात भिजलेल्या प्रेयसीच्या ओठांतून
स्वप्नवत निघालेली....
ओतलेला असेल ऋतुगंध
ज्या त्या हंगामाप्रमाणे...
शब्दबद्ध केलेला असेल प्रत्येक सण,
त्याची समकालाशी विसंगत पुराणकथा वगैरेे,
मिसळलेल्या असतील रितीभाती, फराळ, मेनु, इत्यादी
हातोहात......

रंगविला असेल आतोनात वर्तमान
राजकारणाला मारली असेल
वर्मावर घाव घालणारी कोपरखळी,
काढला असेल शब्दांचाच मूकमोर्चा,
मनात काहीही असलं तरी
हासडलेली असेल एखाददुसरी अर्वाच्य शिवी
बलात्का-यांच्या नावानं....
हतबल शेतक-यांच्या समस्यांना दिलेला असेल गळफास....
रंगविलेली असेल
रंगेल रगेल दुष्काळअवर्षणाची कोरडी कथा,
सीमेवर पराक्रम गाजवणा-या सैन्यासाठी
नोंदविलेला असेल कोपरापासून सलाम
अन् शहिदांसाठी ढाळलेले असतील दोनचार शब्दाश्रू......
अभिव्यक्त झालेली असेल
शत्रूराष्ट्राविषयी जिवंत ज्वालामुखीइतकी तिव्र खदखद....

कविता असेल अघळपघळ
यमकांची सोसलेली असेल तीने झळ
ओकलेले असेल नसेल
जातीधर्मांबाबत, शासनप्रशासनाविरूद्ध गरळ
व्यक्त झाली असेल झाडाप्राणीमात्रांविषयी हळहळ
दिवसाढवळ्या घातलं असेल
सुज्ञ वाचकाच्या डोळ्यांत काजळ.....

वाटेल प्रत्येकाला
अरे, ही तर माझीच कविता आहे...
विचारेल कुणीतरी कुणाला
अरे, कित्ती सुंदर आहे ही कविता!
कुणाची आहे....?
करेल कुणीतरी तिला share
खाली अज्ञात, अनामिक वगैरे लिहून
किंवा सहेतुक स्वत:च नाव लिहून
करेल कुणीतरी कुणालातरी impress.....

सोडून द्यायचीय मलाही whatsapp वर
माझीच अशी एक साधीशी कविता
निनावी....
जी होईल share प्रत्येक ग्रुपवर अनेकदा
येईल माझ्याही वैयक्तीक चॅटवर
अथवा मी असलेल्या असंख्य ग्रुप्सवर
माझ्या जवळदूरच्या मित्रमैत्रीणींकडून
"नक्की वाचा'' या खास प्रतिसादासह....
आणि घेता येईल मलाही व्हर्च्युअल आनंद
माझी कविता प्रचंड वाचली जात असल्याचा...... ☺☺

(लोच्याच आहे राव...
 तरीही सुरूवात म्हणून नाव लिहिण्याचा मोह काही सुटत नाही...)

~ राजीव मासरूळकर
   दि.5/11/2016
   सकाळी 10:30 वा
   सावंगी(हर्सुल), औरंगाबाद

48 तासांची कहाणी....... नोटाबंदीची पोथी

||48 तासांची कहाणी||

आठ अकराच्या सायंकाळी
आठ वाजता ऐन वेळी
मोठ्या विचारांती खेळीमेळी
घोषणा केली मोदीजींनी ||

नऊ अकराला होतील खोट्या
पाचशे हजाराच्या सर्व नोटा
ख-या उत्पन्नाला कधीच तोटा
होणार नाही म्हणाले ||

माजली सर्वत्र मोठी खळबळ
Whatsapp/facebook/tv वर चळवळ
अभिनंदन, शुभेच्छा, विनोदांची अघळपघळ
चर्वणचर्चा सुरू झाली ||

असंख्य नोटा होत्या घरात ज्यांच्या
काय करू, कसं करू चिंता मनात त्यांच्या
पिशव्या भरल्या त्यांनी नोटांच्या
रात्रभर सोनं खरेदी केलं ||

विकले गेले मोठ्या तोट्यात गांधी
सोनारांची नफ्याने झाली चांदी
नव्या भ्रष्टाचाराची उघडउघड नांदी
चारच तासांत दिसू लागली ||

तरी लोकांनी केले जंगी स्वागत
संकटात असलेल्यांना केली जमेल ती मदत
हसावे की रडावे अशी अनेकांची गत
मोदीजींनी एका क्षणात केली ||

राजकारणी, अधिकारी, व्यापारी, शेतकरी
आर्थिक समता आली दोन दिवस घरोघरी
झाली नाही एकही लुट किंवा चोरी
जणू काही पुन्हा रामराज्यच अवतरले!!

उडाली सगळीकडे दाणादाण
नोटा मोजताना मोडली मान
झाली सगळ्या स्वप्नांची धुळधान
मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे||

उधा-या क्षणात वसूल झाल्या
मोठ्या व्यापा-यांनी सवलती दिल्या
शक्य तितक्या नोटा सर्वांनी खपवल्या
जिथे शक्य होईल तिथे तिथे ||

इतकी गरीबी येईल आपल्यावर
वाटलं नव्हतं, विश्व मुठीत आल्यावर
हलकं हलकं झालं तन, मन, घर
अच्छे दिन हेच आले म्हणे ||

चौकातले अधिकारी अन् भिकारी
घोषित झाले सर्वाधिक वैध कॅशधारी
इतरांची नोटांनी भरलेली तिजोरी
रद्दीमोल ठरली खरी ||

घ्यावा वाटला चौकात हातात कटोरा
बायकांनी केला रडवेला चेहरा गोरा
म्हणाल्या कुठे माहिती होता हा होरा
आमच्याकडेही काही नोटा आहेती||

नव-यांजवळ फुटले बायकांचे बिंग
रसातळी गेले दहशतवादी किंग
मोदींनी गाजवली पुन्हा इनिंग
मंत्रोच्चारण झाले नमो नमो ||

कुणी म्हणाले हे आधीच भीमबाबांनी
प्रॉब्लम ऑफ रूपीत ठेवलेय सांगुनी
कुणी म्हणे बरोबर! आता रात्रीतुनी
आरक्षण असेच बंद होईल ||

निर्णयाने अनेकांना आल्या अडचणी
प्रवास, दवाखाना, समारंभाच्या लढले रणी
"काला धन वापस लाना है" म्हणुनी
सर्वांनी सगळे सहन केले ||

देवांनी नाकारले पाचशे हजाराचे दान
बाम्हणांनी चेक घेऊनच वाचले पोथीपुराण
भिका-यांनीही नाकारले ते काळे धन
शेवटी कच-यात आढळून आले||

टीव्हीवर दिवसरात्र चालली हीच चर्चा
कुणी म्हणे छान झालं, कुणी जर तरच्या
भाषेत बोलत राहिले पट्टीमधे वरच्या
दोनहजारी नोट कशासाठी म्हणे ||

मोदी सरकारने केली तजवीज मोठी
24 तासांत नव्या चलनाने बँकांची भरली कोठी
रात्रपहाट एक करून बँकांनी दाखवली सचोटी
जनसामान्यांच्या ओठी हसू फुलले ||

बँक कर्मचा-यांचे तरीही डोके झाले जॅम
टॅक्स डिपार्टमेंटला आता गाळावा लागेल घाम
बरे झाले शिक्षकांना आले नाही नवे अशैक्षणिक काम
बँकेत जुन्या नोटा मोजण्याचे||

असे केले मोदीजींनी काळ्या धनाचे सर्जिकल स्ट्राईक
अडचण झाली, टीका झाली तरी केले लाईक
48 तासी कथा रचिता झाला पाईक
राजीव मासरूळकर बुलडाण्याचा ||

😊☺😉😃😊☺😉😃🙏🏻🌹

हा रस्ता सरळ आहे

हा रस्ता सरळ आहे
फक्त...
वळण आलं की वळायचं....!

कुणासाठी कमान आहे
कुणासाठी तोरण
कुणासाठी कुरण तर
कुणासाठी धोरण
कुठे आहे पाऊलवाट,
कुठे दुर्गम घाट
कुठे किर्र जंगल तर
कुठे सागरकाठ
मिळेल ते फळ चाखतमाखत
सावध पाऊल टाकत चालत
निर्धार करून पळायचं...
हा रस्ता सरळ आहे
फक्त... वळण आलं की वळायचं...!

इथले फिरस्थ ऋतू आहेत
सतत आपल्या सोबत
खेळण्यामधल्या भोव-यासारखी
त्यांची-आपली गत
कुठे कळ्या, कुठे फुले
कुठे विकृत कचरा
कुठे सण-उत्सव, कुठे
तमासगीर..... जत्रा
आली तरी येऊ द्यावी
कधी आपली छाती वर
पंख फुटले तरी आपण
चालत जावे मातीवर
झाडे, वेली, शेती, तळे
प्राणी, पक्षी, मोकळी हवा
दिवसभर तेजस सूर्य
रात्री चांदण्यांचा थवा
आहेत थोडे काटेकुटे
हिरव्या पाऊलवाटेवर
थकल्यावरती आहेच इथे
बिनछपराचं मोहक घर
मुक्काम करून ओव्या गात
दुखणं आपलं दळायचं....
हा रस्ता सरळ आहे
फक्त..... वळण आलं की वळायचं...!

इथे आहेत भ्रमविभ्रम
इथे आहेत सापळे
अडथळ्याची शर्यत अन्
कडूगोड फळे
जिंकत हारत यायचंच आहे
पुन्हा याच रस्त्यावर
कारण काळ नसतो कधी
सारखा एकाच था-यावर
उंच पर्वत चढल्यावरही
शेवटी एक घसरण आहे
रस्ता कधीच संपत नाही
मात्र अटळ वळण आहे
तेंव्हा काही मुक्काम सहज
स्मृती बनून दिठीत येतात
सांत्वनाचे कोरडे ढग
दुष्काळाच्या भेटीस येतात
अशावेळी थांबा घेऊन
विश्वासाने नि:श्वास सोडत
मुद्दामच अडखळायचं....
डोळ्यांमध्ये पाणी ठेऊन
हसत हसत जळायचं.....
हा रस्ता सरळ आहे..
फक्त... वळण आलं की वळायचं ......!!!

~ राजीव मासरूळकर
   दि.14/9/2014