सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Thursday, 11 May 2017

घातले आयुष्य आहे दूर वाळत

आयुष्य

घातले आयुष्य आहे दूर वाळत
आसवांवर ठेवतो आहेच पाळत

धावलो ना मृगजळामागे कधीही
अल्पशी तृष्णा तरी आहेच जाळत

कुंपणांच्या पाळल्या जखमा हजारो
बैसलो नाही कधीही त्या उगाळत

भाळलो नाहीच मी, नाही असेही
पण तुझ्यावर मन अता नाहीच भाळत

मी नको म्हणतोय आयुष्या तुला, जा,
का तरी आहे उभा तू लाळ गाळत ?

~ राजीव मासरूळकर

चाळ

चाळ

नाळ तुटली
कि पायी चाळ येतात
अन् सुरू होते
बाळाची आबाळ....
काळाची पावलं चालत राहतात
बाळाची पावलं नाचत राहतात
चाळांच्या तालावर.....
हेच चाळ बाळाला
कधी हातात टाळ घ्यायला लावतात
तर कधी डोक्यावर आभाळ
नांगराचा फाळ घ्यायला लावतात
तर कधी भिकेची थाळ
तेंव्हा कुठे
बाळाला कधी साळ मिळते
तर कधी दाळ...!

चाळ लहान होत जातात
बाळ मोठा होतो
भावनाहीन, निर्दय, वांझोटा होतो
त्याच्या निष्पाप पाणीदार डोळ्यांत
वाळवंट घोंगावू लागतो
रक्तातला विद्रोह दाह देऊ लागतो
रस्त्यात कितीही गाळ असो
काटाळ असो
चढण असो, ढाळ असो
सगळे चाळ टाळ बाळबोध ठरू लागतात
नितिमत्तेचे पर्वत राळ ठरू लागतात
सत्य लाळ गाळत लोटांगण घालू लागतं
नाठाळ वेताळांचा जयजयकार करत
मोठेपण आलेल्या बाळाच्या
चाळविरहित पायांशी...
अहिंसा घायाळ होऊन तडफडत राहते
पंख छाटलेल्या पारव्यांसारखी.......
सिंहासनावरील राज्यकर्तेही मग
उतरवून ठेवतात
आपली असली आयाळ
अन् फायद्यासाठी वापरून घेतात त्याला
ढोंगीपणाची माळ जपत....!

मग बाळाच्या कर्तृत्त्वाच्या
अक्राळविक्राळ कथा होतात
कुणासाठी मलम तर
कुणासाठी व्यथा होतात
बाळ मात्र सगळं काही टाळत जातो
आडवं येईल ते ते जाळत जातो

झिजून झिजून बाळ मग
थोडा थोडा झुकू लागतो
गळ्यात माळ घालणाराच
त्याच्यावरती थुंकू लागतो
हात पाय हळुहळु झडू लागतात
आजार पिकू लागतो
कमावलेलं किडुकमिडुक
बाळ स्वत:साठी विकू लागतो
साथ कुणी देत नाही
होतो एकटा एकटा
मनामध्ये टोचू लागतो
आठवणींचा काटा

त्याला आठवतं....
बालपणीची नाळ
पायात घातलेले चाळ
झालेली आबाळ
फाटलेलं आभाळ
वाजवलेले टाळ
नांगराचा फाळ
भिकेची थाळ
खाल्लेली साळ... दाळ
नीतिमत्तेची राळ
सत्यानं गाळलेली लाळ
मित्रांच्या हातातली ढोंगीपणाची माळ
स्वत:चं रूप आक्राळविक्राळ
अन् जिथे तिथे लावलेला जाळ.....!

बाळाच्या लक्षात येतं
आपण नाहकच
कापून घेतली
आपली चांगुलपणाशी जोडलेली नाळ
अन् योग्यच होते
आपल्या पायात
चारचौघांनी घातलेले
बालपणातले चाळ!

~ राजीव मासरूळकर
    20/04/2015
    दु.4:00 वा

दहन

दहन

दिवसभर नभी लाव्हा उन्हाचा उधाने
जळजळजळ जाळे जीवना जीवघेणे
थबथब निथळोनी देह घामात न्हातो
गवत जळत जाते, वात वातास येतो !

मृगजळ भवती धादांत आव्हान देते
पळत थकत पाणी प्राण डोळ्यांत नेते
मरगळ मरणाची झाडवेलींस येते
भ्रमण खग न करती, सावली शोधती ते !

सदन गरम ज्वाला ओकते भर दुपारी
दहन सहत झाडे, सावल्या दीन दारी
पळ पळ तर भासे एक एका युगाचा
मरण सहज वाटे घास घेते जगाचा !

अवचित मग येतो जोरजोरात वारा
झुकत मुडत झाडे साहती क्रुद्ध मारा
जलद जलद येती घेरती ते नभाला
कडकड चपलांची साद देते जगाला

सर सर सर धारा पावसाच्या बरसती
फिरुन फुलुन येती श्वास, मातीत न्हाती !

हसत सजल वारा स्पर्शतो गार काया
उधळुन धरतीही देत मृद्गंध फाया
मुखकमल मनूजाचे तरारून येते
गगन खग भराऱ्‍यांनी शहारून जाते !

(मरणकळ जगी जे सोसती पेलताती
सृजन सत् शिवाचे सुंदरे त्याच हाती !)

- राजीव मासरूळकर
दि. २८ जुलै २०१३
रात्री ९.०० वाजता

ढग आलंय भरून

मन शिराळ करून
ढग आलंय भरून

हवा घुमली घुमली
धूळ नभास भिडली
त्यात वीज कडाडली
कळ पोटात उठली
कुस मायची होऊन
ढग आलंय भरून

काळवंडलं आभाळ
जणु राखंखाली जाळ
पिलं घरात घायाळ
बाप शोधतो कपाळ
डोळ्यापुढं अंधारून
ढग आलंय भरून

येई कुडातून वारं
भरे घराले कापरं
मनी हंबर हंबर
धाव धाव मुरलीधर
मन कोरडं करून
ढग आलंय भरून

थेंब आले बोरावानी
गंध भरारला रानी
वारं मोहरलं मनी
झाडं झाली पानी पानी
गेली तहान हरून
ढग आलंय भरून

गार झालं तन मन
पोरं नाचली हासून
कोंब आले टरारून
माती गेली शहारून
नाळ जन्माची धरून
ढग आलंय भरून...

ढग आलंय भरून...
ढग आलंय भरून.....!

~ राजीव मासरूळकर
मासरूळ, दि.9/5/15
सायं.7:30 वाजता

एक आठवण

एक आठवण

सांज जाहली
अजून आई
घरी परतुनी
कशी न आली ?

हृदयी माझ्या
व्याकुळ हुरहुर
काहुर वादळ
लाटा गहिवर
क्षितिज आंधळे
वाटा विव्हल
पक्षी चिंतित
वारा जर्जर !

हजार चकरा
घरी अंगणी
अबोल झाडे
कातर गाणी !

चूल पेटवुन
वरण घालता
भरले डोळे
भय अश्रुंनी
मनास समजुत
गेलो घालून
धुपटामध्ये
असेच होते

वैरी मन हे
स्वतःस सोलत
लाखो शंका
बसले काढत -
शेतामध्ये
साप चावला
नसेल ना तिज ?
वाघ लांडगे
की वैऱ्‍याने
घात न केला
कुणास ठावे ?
की वाटेच्या
काठावरच्या
विहिरीमध्ये
असेल पडली. . . . . . ?
अधीरतेने
सुटलो धावत
शेताकडच्या
वाटेवरुनी
विहिरीमधल्या
अंधाराला
डोकावुन मी
बघू लागलो
चार चांदण्या
डोळ्यांमधल्या
उदासवाण्या
गळून पडल्या
त्या अंधारी . . . . .

तेवढ्यात वळ
पायावरती
उठला मोठा
"मेल्या मुडद्या
मरायचय का ?
पुस्तक सोडुन
कशास आला
विहिरीकाठी
तडफडायला ?",
पाठीवरती
दोनचार वळ
अजून उठले
तसाच वळुनी
गळ्यात पडलो
बराच रडलो
ओक्साबोक्सी
गहीवरुन ती
मला म्हणाली,
"चुकलं माझं
बघु दे, बघु दे
कुठं लागलं ?"
पायांवरचे
पाठीवरचे
काठीचे वळ
बघून आई
देत राहिली
स्वतःस दूषण !

मी का रडलो
तिला न कळले
तिला पाहता
काहुर शमले
हृदयी बहरुन
गेली जाई
जिवंत होती
साधी भोळी
प्रेमळ सोज्वळ
माझी आई !

- राजीव मासरूळकर

भिजणा-याच्या उरात कायम उरतो पाउस

**पाऊस**

थेंब थेंब प्रेमाचे घेउन येतो पाउस
स्पर्श सुखाचे हळवे देउन जातो पाउस !

विरहचांदणेे ठिबकत येता गालावरती
मिठीत घेउन अलगद चुंबुन घेतो पाउस !

शेतपिकांच्या पानोपानी दंवासारखे
सहवासाचे गीत दिवाने गातो पाउस !

स्वार्थामध्ये गढूळ होता नातीगोती
एकांतातच दुरात जाउन झुरतो पाउस !

अंगावरुनी ओघळून जाते ते पाणी
भिजणाऱ्‍याच्या उरात कायम उरतो पाउस !

- राजीव मासरूळकर
मासरूळ , ता जि बुलडाणा

तुझी आठवण दाट झाली

तुझी आठवण दाट झाली

सावल्या लांबल्या अन् झुळूकसुद्धा  लाट झाली
संध्याकाळ होताच तुझी आठवण दाट झाली

कित्ती सुखद होती ती ऊब तुझ्या गर्भामधली
वात्सल्याची नाळ तुटली ....... जिंदगी हाट झाली

कितीक रस्ते चालत.... टाळत, वळणांवरुन वळलो
अन् आता.... उभ्याउभ्या जळणे माझी वाट झाली

आत्ता तर आला होता चंद्र, माझ्यासमोर वर
अन् बघता बघता कशी काय खुळी पहाट झाली ?

फार ठरवुन एकदा बसलोच स्वत:स रेखाटत
हजारदा आवडलं, लाखदा काटछाट झाली

आयुष्याची वाकळ शब्दन्  शब्द उसवत गेलो
लोक फक्त हेच म्हणाले, कविता भन्नाट झाली !

~ राजीव मासरूळकर
17/01/2014
18:30