सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Wednesday, 19 February 2020

पुरुषा तुझी


एवढी झाली नजर का वाकडी पुरुषा तुझी
वाटते सोलून घ्यावी कातडी पुरुषा तुझी

तू तुझा इतिहास घे समजून जन्मापासुनी
घेतली गिरवून मी बाराखडी पुरुषा तुझी

जीभ छाटावी तुझी सीतेस वाटे कैकदा
लांघते भाषाच रेषा रांगडी पुरुषा तुझी

तूच तर केलीस खिचडी जात धर्माची तुझ्या
रीत पाळावी कशी घाणेरडी पुरुषा तुझी

सिद्ध कर श्रेष्ठत्व सत्कार्यातुनी प्रत्येकदा
सोड वर करणे कुठेही तंगडी पुरुषा तुझी

आजवर तू पेटवत आलास नारीला म्हणे
पेटवत होतास तू तर झोपडी पुरुषा तुझी

राऊळी करतोस पूजा, घालशी लाथा घरी
केवढी भक्ती निखालस बेगडी पुरुषा तुझी

हक्क देहाचा अबाधित ठेवते आहे स्वत:
प्रेयसी असले जरी मी भाबडी पुरुषा तुझी

भिडवुनी डोळा, तुझ्या खांद्यास खांदा लावुनी
सज्ज आहे मी वळवण्या बोबडी पुरुषा तुझी

(कोणत्या शाळेमधे पुरुषार्थ शिकवावा तुला
दाखवी पुरुषत्व केवळ काकडी पुरुषा तुझी)

कृष्ण शिवबा बुद्ध गांधी ज्योतिबा भिमराव तू
सद्गुणांनी भर पुन्हा तू पोतडी पुरुषा तुझी

~ राजीव मासरूळकर
   शिवजयंती
   दि. 19/02/2020, 02:30 AM

Thursday, 13 February 2020

जागा

रान केल्यावर जिवाचे भेटली जागा
आपली वाटे कशी ना आपली जागा

फारसा अंदाज घेता येत नसतो पण
सारखी डोळ्यास दिसते आतली जागा

आपल्या विश्वापलिकडेही किती विश्वे...
कोणत्या विश्वात आपण राखली जागा

जन्मत: आजन्म भटके जीव ना आपण
शोधतो आहोत का मग चांगली जागा

ठेवली काबूत त्रिज्या वर्तुळाची मी
मोकळी कोणाकरीता सोडली जागा

भेट ठरलेल्या स्थळी पाऊस भुरभुरला
केवढी तितक्यात ती मग तापली जागा

पावले वळतात आपोआप का तिकडे
विसरता येते जिथे आपापली जागा

~ राजीव मासरूळकर

Saturday, 25 January 2020

गझल : तिळाची ऊब राहो अन्


तिळाची ऊब राहो अन् गुळाचा गोडवा राहो
सदा नात्यामधे विश्वास आदर गारवा राहो

जगाशी गोड पण कायम खरे बोलू, खरे वागू
इथे अपुलेपणाची वाहती हसरी हवा राहो!

हरवते बालपण अन् एकटेपण वेढते हल्ली
सभोती ओल राहो पाखरांचाही थवा राहो

थकू दे देह कष्टाने वयाने दे जुना होऊ
परंतू श्वास अन् उल्हास कायमचा नवा राहो

मला होता न आले सूर्य अथवा चंद्र , ना हरकत
कुणासाठी तरी प्रेरक जिवाचा काजवा राहो

~ राजीव मासरूळकर

Sunday, 27 October 2019

अवकाळी अभंग


सणासुदी आला
काळतोंड्या पाण्या
कोंब दाण्या दाण्या
फोडलेस

तुझी आय अशी
अवेळी का व्याली
पिके वाया गेली
हातातली

दलिंद्र्यावाणाच्या
पेरणीच्या वेळी
कशी तू बखाडी
पाडतोस

गेल्या साली मेल्या
आला इतकुसा
जीव कसाबसा
वाचविला

आणि यंदा किती
बरसतो बापा
बंद कर खेपा
गयभान्या

बारा बापाचा तू
कितव्या बापाने
भिजवले दाणे
सांग तुझ्या

येड्याच्या बजारा
केला सत्यानास
किती गळफास
हवे तुला

अती केल्यावर
होतोस नकोसा
जाई ना तू कसा
सुक्काळीच्या

अक्कलीच्या कांद्या
कळे ना का तुला
घामातून आला
आहे तू ही

~ राजीव मासरूळकर
    दिवाळी 27/10/19
    दु. 3:30 वा

Tuesday, 15 October 2019

मला अद्यापही वाचता येत नाही

मला अद्यापही वाचन करता येत नाही

माझ्याकडे पदवी आहे
मी पदव्युत्तर पदव्या संपादन केलेल्या आहेत औपचारिकपणे
पण मला वाचन करता  येत नाही

मला वाचन करता येत नाही माझ्या दारिद्र्याचे
माझ्यातल्या कर्मदारिद्र्याचे
माझ्या नियोजनशुन्य दिनचर्येचे
माझा भवतालही माझ्यासारखाच होत चाललाय का
याचं वाचन मला करता येत नाही
सोशल मिडियावर रात्रंदिवस बरंच काहीबाही वाचत असतो मी
सुविचार, विनोद, गोष्टी, बातम्या, वगैरे
पण वर्तमान वास्तव माझ्या वाचनात येत नाही

मला वाचताच येत नाही
शिक्षित-अशिक्षितांच्या डोक्यातला आप्पलपोटा अंधार
निरागस ओठांवरचं निखळ हसू
भुकेल्या पोटाची असह्य अडवणूक
पात्रतेच्या कसोटीचे सगुणसाकार मापदंड
वाचताच येत नाहीत मला

आणि मुख्य म्हणजे
या वेगवान युगाची गती
केवळ लकाकी आणते माझ्या डोळ्यांत
पण काही केल्या ती वाचताच येत नाही मला अद्यापही....

फक्त साक्षात्कार होत राहतो मला
मी साक्षात निरक्षर असल्याचा
आणि आऊटडेटेड होत असल्याची भीती
घोर घाम फोडत राहते....

मी अक्षरं चाचपडतो आहे
21 व्या शतकाच्या दिग्मुढ वाचनपाठाची....!

राजीव मासरूळकर
दि.15/10/2019

Thursday, 15 August 2019

गझल : कुठे स्वातंत्र्य आल्यावर कुणाला देश मिळतो


कुठे स्वातंत्र्य आल्यावर कुणाला देश मिळतो
मला आनंद याचा की मला गणवेश मिळतो

दिलेले काम तो करतो निमुट बैलाप्रमाणे
मिळत काहीच नाही, बस् नवा आदेश मिळतो

इथे सर्वस्व लावावे पणाला लागते बघ
तरी केवळ सुखाचा खिन्नसा लवलेश मिळतो

किती आटापिटा केलाय बोलायास आपण
अता एकाच क्लिकवर आतला संदेश मिळतो

मनाला पाहिजे असते मदत किरकोळशी पण
नकोसा नेमका तेव्हा खडा उपदेश मिळतो

स्वत:सोबत अनेकांचे मरण तात्काळ दिसते
अशावेळीच जगण्याचा खरा उद्देश मिळतो

मला मी शोधतो आहे कधीचा पण मिळेना
कधी राजू कधी राजीव वा राजेश मिळतो

~ राजीव मासरूळकर
   दि.15 ऑगस्ट, 2019

Friday, 7 June 2019

गझल: करू शकतो

गझल

फक्त भासानेच आपण घाबरू शकतो
तो करायाचेय ते, तेव्हा करू शकतो

आज तू वापर मला वाटेल तसले पण
जप, तुला मीही तसे मग वापरू शकतो

हे खरे की पाहिजे वारा जगायाला
वादळामध्ये कुणीही गुदमरू शकतो

सावली करूणाढगांची दे फिरू काळी
देह आशेवर बळी मग नांगरू शकतो

पेटला हट्टास तर मी जिंकतो नक्की
खेळला राखून आदर तर हरू शकतो

संपली आहे तुझ्या हृदयातली हिरवळ
अन्यथा (?) तेथे मला मी अंथरू शकतो

मी पसारा हा तुला रमवायला केला
नासवू बघशील तर मी आवरू शकतो

~ राजीव मासरूळकर
   मासरूळ, दि.8/5/19