ग्रामीण अस्वस्थतेचा हुंकार अभिव्यक्त करणारी वास्तव लयबद्धता : मातीत हरवल्या कविता
शहापूर ता.गंगापूर जिल्हा औरंगाबाद या शेतीमातीतून आलेल्या व पेशाने शिक्षक असलेल्या संतोष आळंजकर या नव्या दमाच्या कवीने 'मातीत हरवल्या कविता' या आपल्या पहिल्याच कवितासंग्रहाद्वारे मराठी साहित्यक्षेत्रात दमदार पाऊल ठेवलं आहे. या कवितासंग्रहात एकूण 81 कविता असून काही कवितांना लौकिकप्राप्त नियत-अनियकालिकांत, दैनिकांत पूर्वप्रसिद्धी मिळालेली असल्याने या कवीचा परिचय महाराष्ट्राला झालेला आहेच. 'मातीत हरवल्या कवितां'च्या निमित्ताने तो अधिक दृढ होऊ घातला आहे.
चित्ताकर्षक मुखपृष्ठ, उत्तम मुद्रण व मुद्रितशोधण ,मजबूत बांधणी व माफक किंमत ही या कवितासंग्रहाची बाह्य वैशिष्ट्ये.
आपण अंतरंगात शिरू लागतो अन् अगदी मनोगतापासूनच कवी आपल्या मनात घर करू लागतो. 'पिढ्यानपिढ्या कुणबीपण खांद्यावर घेऊन राबराब राबणा-या माणसांभोवती बालपण' अनुभवलेल्या कवीच्या 'माथी वारसाहक्काने गावाच्या माथी लागलेला कुणबीपणाचा टिळा' लागलेला असल्याचं वर्णन कवी मनोज्ञपणे करतो आणि ग्रामीण जीवनातील समकालीन कालवाकालव नेमक्या शब्दांत उद्धृत करतो.
सुरूवातीच्या 3 कवितांतून कवी बालसुलभ प्रश्नांतून अवतीभवती घडणा-या नैसर्गिक व मानवांकित घटनांचं चौकस चित्रण उभं करतो.
कोण बैसला नभात जाऊन
कोण कुंचला बसला फिरवत
मातीच्या या पाटीवरती
हिरवे अक्षर बसला गिरवत
किंवा
पाखरांचे लक्ष थवे
कोण नेतो आभाळाला
कसा फुटतो जारवा
खोल रूतल्या पायाला
अशा शब्दांतून संवेदनशील बालमनाचा अविष्कार आपल्या मनाचा ठाव घेत राहतो व कवीच्या प्रतिभेची चुणुक दिसल्याशिवाय राहत नाही. मग पुढील कवितांतून 'कुणब्याच्या डोळ्यासमोर हिरवं सपान फुलवणारा मिरूग' येतो. 'पावशाचे गोड गाणे' सुरू होते. पाभर सजते. कवीला बापात विठूराया दिसू लागतो. 'कोळप्यासंगे काळ्या ढेकळांत रोज सावळे अभंग' रंगू लागतात. 'दोनपंखी वारकरी'ही 'शेताच्या पंढरी'त जमू लागतात. दुसरीकडे सखीला हिरव्या स्वप्नाचा 'वळीवस्पर्श' होतो. बीज टरारून आल्यावर कवी श्रावणसरींची आराधना करू लागतो.
यावं श्रावण सरींनी
निळ्या पहाळ्या बनून
द्यावी गर्भार ढगांची
कूस मोकळी करून
मग पावसाची सर येते. अंगणात 'लाज-याबुज-या पोरी भिजत धुंद नाचतात.' मग पुन्हा मायबाप देवाचं 'काळीज निबार' होतं. शेतक-यांची कोवळी हिरवी मनं करपू लागतात. टाहो फुटू लागतो..
रोज माझ्या शेतावर
काय येतो आभाळून
येथे रोजचं मरण
थेंब थेंब डोळ्यांतून
'दान द्यायचंच असेल तर मोकळ्या हाताने शिवाराची झोळी मोत्यांनी भरभरून दे' अशी आर्जवं सुरू होतात. 'कुणबीण कुणब्याच्या सदा आसपास' राहू लागते. तिला बाभूळझाडाचा भास होऊन भिती वाटू लागते.
थोडी चुकता नजर
ठोका चुके काळजाचा
पाही बाभूळझाडाला
कधी तळ विहिरीचा
अशी तिची अवस्था होऊन जाते. कवी कुणब्याला खचू नकोस म्हणून धीर देऊ पाहतो. कुणब्याचा पोरगा असलेला कवी बापाचीी व्यथा मांडू लागतो..
माझ्या बापाच्या शेतात
ढग फिरलेच नाही
त्याच्या प्राक्तनाचे भोग
कधी सरलेच नाही
आपण कवितांमागून कविता वाचत जातो आणि कवी आपल्याला शेती आणि एकूणच ग्रामीण जगण्याच्या लांबलचक चकव्या गुहेत सोडून मोकळा होतो.
पुढील कवितांतून अडाणी असूनही मुलांना शाळेत घालणारी, पहाटं उठून सडारांगोळी घालून जगण्याला रंग देणारी, दळण दळून दु:खाला वळण लावणारी आई येते. उदास दुपारी दारी वाळण घालून कपाळी हात लावून गुरंढोरं चिमण्यांना दूरदुरून हाकणारी, चिमण्यांना पाहून सोडून गेल्या पाखरांची सय काढत डोळे भरून आणणारी, कुडाच्या घरात एकटीच राहणारी म्हातारी येते. चांदणझाडाला हिंदोळा देत माहेरचं बालपण अंगणात गोळा होतं. पंख लावून उडालेल्या माहेरच्या सईजणी बाभळीच्या झाडावर खोपा बांधून नांदू लागतात. सरकारी सपान डोळ्यात सलणारी, हातात काळ्या पाटीऐवजी डोंबा-याची काठी असलेली भुकेली भटकी दरवेशी पालं येतात, पाठीवर चाबकाचे कितीही फटकारे बसले तरी कधीच बंडाचे इशारे न देणारे बैल येतात. गोफण वेग घेताच नजर चुकवून कधी भुर्रकन झाडावर तर कधी सर्रकन चिकळल्या कणसांच्या धाटावर बसणा-या हट्टी पाखरांचं शब्दचित्र येतं. कवीला इथल्या दु:खी जगण्यातलं गमक दिसून येतं नि तो म्हणतो :
दिसे वृषभांचं राज्य इथे
माणसं बांधली दावणीला
उगळ टाकून त्यांच्यापुढ्यात
बैलं गेली लावणीला!
अष्टाक्षरीचा हात सोडून 'मातीत हरवल्या कविता' मुक्त वळण घेऊ लागतात.
मग लागेबांधे करून लोणी खाणारे बाजारबसवे दलाल कवीला सलू लागतात. जातीपाती, धर्म, रंग, झेंडे इत्यादिंना बळी पडून अख्खं गाव जाळायला निघालेले हात दिसू लागतात. शेतीमातीत रमणारी, गणगोत जपत आभाळ पांघरणारी माणसं गर्दीत हरवून गेल्याचं लक्षात येऊन आपण दु:खी होऊन आत्मचिंतन करू लागतो. कवी आपल्याला झाडाझुडपांत दडलेल्या, माणुसकीने भारलेल्या, कोंबड्याची भूपाळी अन् पाखरांची भजनं असणा-या आणि आता नावातच उरलेल्या गावाची सफर घडवतो. कवी म्हणतो,
मातीच्या भिंतींना लाकडांचा धीर होता
मंदिराच्या शेजारीच पावणारा पीर होता
आल्यागेल्या झोळीसाठी ओंजळभर दाणे होते
अन् अंगणातल्या झाडावर चिमण्यांचे गाणे होते
वाचत वाचत आपण अंतर्मुख होत जातो. 'सपान' कवितेत 'फक्त एवढं साल जास्ती राबून सावकाराचं रिन फेडून एक इटाचं घर बांधायचं' मायबापाचं उरी कवटाळलेलं सपान सावकाराची कोठी भरून खोपटातंच राहून जातं आणि वाचकाच्या पापण्या ओलावल्याशिवाय राहत नाहीत. 'जातं' कवितेत जात्याकडे एकटक पाहत जात्याशिवाय जगल्या सुखदुखाला भरडत मनातल्या ओव्यांचं पीठ करत राहणारी आई भेटते आणि आपल्या काळजाला पीळ पाडते. सशाचं काळीज घेऊन आलेली ,फाटका संसार शिवायला कायम सुईदोरा बाळगणारी, कधीच नव्या लुड्यासाठी हट्ट न करणारी कवीची आजीही कवी हुबेहूब उभी करतो आपल्यासमोर. कवीला शेताच्या बांधावरून 'साद' घातल्यावर शिवार ओलांडून त्याच आर्ततेनं ओ येते, जित्राबंही आवाजाच्या दिशेने कान टवकारून बघतात तेव्हा हायसं वाटतं, पण शहरात आल्यावर माणसांच्या अफाट गर्दीची आणि त्यात आवाज हरवून जाण्याची भिती वाटते आणि आपण अस्वस्थ होऊ लागतो. 'गाव सोडताना दाराला लावलेलं कुलूप पुन्हा उघडता येत नाही कधीच!' अशी गावातून शहरात एकमार्गी वाटांनी स्थलांतरीत होणा-या माणसांची मनोवस्था चित्रित करून कवी आपलं मन विदीर्ण करतो. कवी धरणग्रस्तांची वाताहत कथन करतो, गोडगोड बोलून पोटात चोचा खपसून आतडे पळवणा-या वेगवेगळ्या रंगांच्या नि झेंड्यांच्या गावात येणा-या झुंडी चितारतो, सरकारी टँकरची वाट पाहणारी देवपाण्याचे झरे आटलेली पापण्यांची कपार दाखवत दुष्काळकळा शब्दबद्ध करतो, तरीही कोणत्याही हंगामात चौकाचौकात हसणा-या पांढ-याशुभ्र प्रतिमांचे वाभाडे काढत बॅनरबाजांवर हल्ला चढवतो आणि कष्टक-यांच्या हाती विळी, खुरपी, कोयते देत 'एल्गार' पुकारतो. बदलत्या गावाचं वास्तव चित्रण करून तेथील खदखद व्यक्त करतो. पेशाने शिक्षक असलेला हा खडू, फळा आणि लेकराबाळांत रमणारा कवी अष्टाक्षरी, मुक्तछंद, अभंग, गझलसदृष्य रचना व गेय कवितांतून वाचकांच्या डोळ्यांसमोर गाव उभा करीत राहतो.
एकूणच 'मातीत हरवल्या कविता' या तशा हरवलेल्या नाहीतच. त्या शेणामातीत रूजून सशक्तपणे टरारून उगवून आलेल्या आहेत. त्यांना ग्रामीण लय, ग्रामीण शब्दांचं खतपाणी घालून वाचकाहाती देत कवी संतोष आळंजकरांनी या कवितासंग्रहाच्या निमित्ताने ग्रामीण साहित्यात बहुमोल भर घातली आहे असे नि:संशय म्हणावेसे वाटते.
★★★
शेवटी या कवितासंग्रहातली माझ्या मनाचा आत्यंतिक ठाव घेणारी ग्राम्यसंस्कृतीच्या सुकाळी उत्सवाचे चित्रण करणारी मनोहर कविता देण्याचा मोह आवरत नाहीय. ती 'सुगी' या शिर्षकाची कविता अशी:
आले सुगीचे दिवस
विळे पाजळून ठेवा
चला चला रे रानात
हळदला रानमेवा
धाट पिवळे पिवळे
वर मोती लगडले
जणू देवाचे मापडे
शेत शिवारी सांडले
मनामनाला हुरूप
टिळा मातीचाच माथी
कसे कंबर कसून
चाले आथीवर आथी
भर उन्हात सोंगणी
तरी मनात चांदणे
पीक पाहता शिवारी
सुख मावेना पोटात
असे सुगीचे दिवस
नित येऊ दे रे देवा
तुझ्या देणा-या हाताचा
कोणा वाटू नये हेवा
★★★
~ राजीव मासरूळकर
औरंगाबाद

No comments:
Post a Comment