सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Wednesday, 10 May 2017

रमी

स्वप्नात ती आणि स्वप्नात मी
प्रेमात आहे कशाची कमी?

का रंग जपतोस तू एवढा?
वापर तुझा होत जुळते रमी

घेतोय मी मोकळा श्वास, ही
कोणी फुलांना दिली बातमी?

कायम ऋतूंनी दिलेला दगा
झालीत मग माणसे मोसमी

देवा, सुरू कर नवी योजना
'जन्मास या, घ्या : सुखाची हमी'

~ राजीव मासरूळकर
    दि.4+12=16

हे पक्ष्यांनो

हे पक्ष्यांनो...

जगण्यासाठी मिळालेत पर, हे पक्ष्यांनो
कुणी बांधले नभात छप्पर, हे पक्ष्यांनो

शेतक-याला कष्टाचे लाभू द्या दाणे
किडे, अळ्यांनी भरले वावर, हे पक्षांनो

जे दिसते ते तसेच नसते, पारखून घ्या
वरून दिसते हिरवे गाजर, हे पक्ष्यांनो

आसपासच्या झ-यात असते जिवंत पाणी
कशास फिरता शोधित सागर, हे पक्ष्यांनो

कु-हाड, वणवा, अतिवृष्टी, दुष्काळ सोसता
कुठे लपविता नयनी पाझर, हे पक्ष्यांनो

जात नव्हे, हे पंखच तुमचे पक्के लक्षण
तुम्हा न लागो मानवी नजर, हे पक्ष्यांनो

~ राजीव मासरूळकर
   दि.8/12/2016
   रात्री 11:35 वाजता

खरपूस

माणूस नाही

गोडवा संपून गेला, ती चिपाडे, ऊस नाही
क्रूरतेने वागतो जो , तो पशू , माणूस नाही !

मायभू आधार देते , कास्तकाराच्या पिकांना
सावलीचे सोंग घेतो तो खरा पाऊस नाही !

पापपुण्याला विरक्तीला जरासा अर्थ देऊ
दान गरजूलाच देऊ, देव वा साधूस नाही

घण जरा आवर, समीक्षा स्पर्शुनी शब्दांस तू कर
लागला चटका न तर म्हण, ही गझल खरपूस नाही

जिंकल्या लाखो लढाया, घाव छातीवर मिरवले
ही कशी आता निरवता... स्पंदनी धुडगूस नाही.... ?

- राजीव मासरूळकर
  दि.10/12/2013

तिच्या मायला

#मराठीगझल_राजीवमासरूळकर_7

गझल : तिच्या मायला

मनात नुसती होते ठसठस.... तिच्या मायला
प्रेमाविण हे जगणे भंकस...... तिच्या मायला

मुका बोलतो, लुळा डोलतो, खुळा ज्ञान दे
बॉटल नसते नुसती फसफस.... तिच्या मायला

स्वार्थाआडुन उपकाराचे केळ कशाला....?
मेलो तर मेलो बेवारस... तिच्या मायला

असो बघोणे, तवा, ग्लास वा तांब्या कोणी
पत्नी असते दणकट सांडस..... तिच्या मायला

मरणा-यालाही जगण्याचे स्फुरण चढावे
गझल पकडते ती दुखरी नस..... तिच्या मायला!

~ राजीव मासरूळकर
   सिल्लोड, जि. औ'बाद
   दि.31/10/2014
   रात्री 11:45 वाजता

उगव ना आज थोडासा उशीरा यार चंद्रा

उगव ना आज थोडासा उशीरा, यार चंद्रा
निशेचा पूर्ण होऊ दे जरा शृंगार, चंद्रा

धरेवर जन्म, मृत्यू, मोह, माया, सर्व आहे
कशासाठी फिरत आहेस गोलाकार चंद्रा?

जिच्यावर प्रेम तू करतोस ती सूर्यास ध्याते
तिला बहुतेक जडला मानवी आजार, चंद्रा!

तुझ्या मातीस साधा माणसाने स्पर्श केला
किती डोळे तुझे झालेत पाणीदार, चंद्रा!

युगांपासून नुसते स्वप्न तू बघतोस, राजा
कधी होणार आहे सांग हिरवागार, चंद्रा?

~ राजीव मासरूळकर

इथे कुणाला परी पाहिजे.... हजल


💖हझल💞

इथे कुणाला परी पाहिजे..? 👰
दिसायला बस बरी पाहिजे😜

स्वप्नामध्ये हजार येती👸👧👩
पण एखादी खरी पाहिजे💑💏

हापिसातली जीव लावते😋😋😍
तिच्यासारखी घरी पाहिजे....🏠😁😁

पिस नसले तर नसु दे,  बाकी🍗🍖🍴
रस्स्यावरती 'तरी' पाहिजे😭😭😭

'बसल्या'वर कळते की कुठली🍺🍻
चव या ओठांवरी पाहिजे💋💋

कुणास येथे हवीय पत्नी🙇👪
कुणास बस लॉटरी पाहिजे💴💶💰

~ राजीव मासरूळकर😜😜

येणा-याचे स्वागत आहे

येणा-याचे स्वागत आहे

युगे संपली, वर्षे गेली, काळ क्षणांना चाटत आहे
जाणा-याने खुशाल जावे, येणा-याचे स्वागत आहे

तुजसोबत मी आलो इथवर, वादळास छातीवर झेलत
अर्ध्यावर तुज कसे म्हणवते, दिशाहीन हे गलबत आहे ?

धन, सौंदर्याच्या न यशाच्या नशेत जो झिंगला कधीही
थेंब थेंब दरदिवशी अमृत त्यास मिळावे, वाटत आहे

कुणी ठरवले तुझे न् माझे नाते अचूक माहित नाही
लाकुडतोड्या असेल तो; पण लाकुड मी, तू करवत आहे

किती सुखावत जपतो आपण जन्मापासुन स्वप्ने सगळी
सरताना कळते इतके की जगणे म्हणजे फसगत आहे

- राजीव मासरूळकर
दि. 31/12/2013