सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Wednesday, 10 May 2017

कसे आहात, मित्रांनो?

कसे आहात, मित्रांनो ?

जरा बोला, मने खोला, कसे आहात, मित्रांनो ?
असे मी ही, असा तुम्हीहि आनंदात, मित्रांनो !

कुणाला पाय नाही, कान, डोळा, कामही नाही
बघा देताच आला तर तयांना हात, मित्रांनो !

कळीचे फूल अन् निर्माल्य होते ना फुलाचेही ?
जिथे संयम, तिथे वर्षावतो परिजात, मित्रांनो !

दिव्यावर घालता प्रेमळ जरी तुम्ही हळू फुंकर
दिसे अंधार, तेथे पेटवावी वात, मित्रांनो !

बघा विश्वात लाखो तारका, तारे कसे जगती
तसे राहू, न व्हावा घात वा अपघात, मित्रांनो !

~ राजीव मासरूळकर

पाऊस

पाऊस
दिवसरात्र
कोरत बसतो
सहेतुक
दूरवरच्या
दुर्गम
पहाडावर
एक
सुंदरशी कविता....
तेव्हाकुठे
खोल
द-याखो-यांच्या
कान्याकोप-यांत
काट्याकुपाट्यांत
घाणीमातीत
सशक्तपणे
उगवून येतो
वाया गेलेला शब्दन् शब्द....!

~ राजीव मासरूळकर
    सावंगी, औरंगाबाद
    15/12/15 01:15am

पिंपळपान


गझल

एवढ्यावर शान करतो
मी जिवाचे रान करतो

बाण ती करते नयन.... मी
हृदय पिंपळपान करतो

कर दया वा कर दिखावा,
की जरासे दान करतो(स)?

काल जे मज येत नव्हते
आज ते मी छान करतो

बोलली काही कुठे ती?
छळ मनाचा कान करतो

तू स्वत: शिकतोस सारे
'तो' कुठे सज्ञान करतो?

~राजीव मासरूळकर
   सावंगी, औरंगाबाद

उसासे

उसासे

मला काय झाले
उरी युद्ध चाले

उन्हाला खुणावी
तमाधीन प्याले

सुखाच्या दूकानी
दुखाचे मसाले

सले पावसाला
(ढगांचे उमाळे)

मतांच्या महाली
पडे रोज घाले

वसंतास सांगा
फुलोरे गळाले

हवे नेमके ते
कुणाला  मिळाले ?

हसू लागता मी
उसासे निघाले !

- राजीव मासरूळकर
दि . २०.७.१२
रात्री ९.३० वा

आनंदाचे मोती

http://www.baliraja.com/node/909

आनंदाचे मोती

खाली पाचू विखूरले,
नभ जांभूळले वर
दह्यासारख्या धुक्याने
पुरे माखले डोंगर!

चांदी दुधाळत वाहे
नदी नागीणीची सखी
वेल डांगराची फुले
होई छप्पर पालखी!

मका मिशीतून हासे
केळी गर्भार लाजती
धुंद संभारगंधात
पीकं डौलात डोलती

बघे सुखावत डोळे
गोठ्यातून बैलजोडी
येई हिरव्या चा-याला
पोळ्या-पुरणाची गोडी

असे घडो दरसाल
यावी घरभर पोती
मुखी सुखाची भाकर
डोळी आनंदाचे मोती!

  #राजीव मासरूळकर
  सोयगाव ते औरंगाबाद प्रवासात
  दि.17/09/16

मनासारखे झाले माझ्या मनासारखे



मनासारखे झाले माझ्या मनासारखे
आठवपक्षी नयनी आले घनासारखे

कोकिळ गेले गात एकटे अमराईतुन
कुणीच नाही बाई गं साजनासारखे

मनासारखे झाले आल्या पाउसधारा
पेटुन उठले रान मनाचे वनासारखे

आभाळाला मिठी मारण्या कशास सांगू
पाय तुझे दिसतात सदा वामनासारखे

आत्मा परमात्मा मुक्ती की विराट दर्शन
तृप्त मनाला करेल कोणी तनासारखे ?

- राजीव मासरूळकर
दि २३.५.१२
रात्री १०.३५ वाजता

पानगळ

पानगळ

जेवढा मी धट उखळ होतो
काळही निर्दय मुसळ होतो

योग्य वेळी घे वळण, लिलया
वाकडा रस्ता सरळ होतो

पांढरा होतो फळा काळा
तसतसा माथा उजळ होतो

शेवटी झालीच ताटातुट
फार गेलेलो जवळ होतो

शांत होऊ दे जरा वादळ
डोहही नंतर नितळ होतो

दे खरे स्वातंत्र्य पोराला
बघ ध्रुवासम तो अढळ होतो

ती बरसते मेघ अवकाळी
मी हवीशी पानगळ होतो

~ राजीव मासरूळकर