पाऊस शोषणाचा पाऊस घोषणांचा
रक्ताळल्या मनाचा पाऊस भक्ताळल्या गणांचा
पाऊस वासनांचा पाऊस दूषणांचा
लाटल्या धनाचा पाऊस फाटल्या क्षणांचा . . . . . . .
आतड्यांना पिळणाऱ्या यातनांचा पाऊस
कातळाला चिरणारा आक्रोशांचा पाऊस
पाऊस माझ्या नितळ निर्मळ आसवांचा भुकेला
पाऊस माझ्या गोरगरीब कासवांचा भुकेला . . . .
भाषणांचा पाऊस शासनांचा पाऊस
रिक्त बंदुकी फैरींंसारखा आश्वासनांचा पाऊस
धर्मआंधळ्या, जातआंधळ्या अमानुषांचा पाऊस
माणसातल्या पिसाटलेल्या जनावरांचा पाऊस
पिसाळलेला पाऊस बोकाळलेला पाऊस
सोकावलेला पाऊस हपापलेला पाऊस . . . .
मधाळ रसाळ ओठांमधून
झुळझुळणारा पाऊस
श्वासांमधला घासांमधला प्रेमाचा पाऊस
दैवतांचा पाऊस दानवांचा पाऊस
रौरवात सडणाऱ्या मानवांचा पाऊस
पाऊस माझा अधूनमधून भूरभूरणारा
पाऊस माझा अधूनमधून हुरहुरणारा . . . . .
पाऊस माझ्या
खेड्यामधल्या माऊलीच्या
डोळ्यांमधून झिरपणारा
पाऊस माझ्या शेतामध्ये राबणाऱ्या
उघड्याबंब देहामधून
रक्तासारखा निथळणारा
कळ्या असून मळ्यावर
राबणारा पाऊस
हात पाय डोके असून
रस्त्यावरती स्वार होऊन
अनंग भनंग हात
पसरवणारा पाऊस . . . . . .. . . . !
पाऊस सतत वाढतोच आहे
पाऊस सतत चढतोच आहे
लक्षावधी हातांनी
पाऊस सतत लढतोच आहे !
एक दिवस पाऊस सगळा
असा तसा जाईल थांबून
कारण तेव्हा माझी तुमची
पृथ्वी गेली
असेल भंगून . . . . . . . . . !
- राजीव मासरूळकर
छान...आणि वास्तव ....
ReplyDeleteआपले हार्दिक आभार!
Delete