नद्या वाहती गळ्यात लेवून मंजुळ घुंगूरमाळा
नव्या डहाळ्यांवरती भरती नव्याच पाखरशाळा
लक्ष पित अश्वांवर आरुढ पूर्वराज मग येई
कळ्यांस चुंबून कोमल अधरे हसू तयांचे पाही
पहाटवारा वेडा सुटतो स्पर्शत चराचराला
अन् सर्वत्र चलाचलांच्या धावपळीचा पोळा
कलकल वळवळ शिव्याशाप अन् चळवळ मारामारी
काळही बघतो भांबावून ते थांबवून एकतारी
दुपार होता स्वेदसिंंधुला उधान भरती येते
त्यात अधांतरी अर्धी पृथ्वी गटांगळ्या खाते
संध्यासमयी सुटतो ताजा गृहआकर्षक वारा
चिमण्यांसाठी घेऊन चारा येती वत्सलधारा
काळोखाची जाड घोंगडी घेऊन अंगावरती
काळ, कळा अन् स्वप्ने लेवुन भविष्यचक्रे फिरती !
- राजीव मासरूळकर
आदरणीय सर
ReplyDeleteBlog सुंदर बनवला आहे.
धन्यवाद खंडागळे सर. हा ब्लॉग सन 2012 मध्ये बनवलेला आहे. पहिली पोस्ट 2012 मधील आहे. मध्यंतरी वापरत नव्हतो. 2017 पासून पुन्हा सक्रीय झालो इथे.
Delete