सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Tuesday, 27 June 2017

किशोर काळेंनी मातीत जिरवलेला घाम : बांडा हंगाम

बांडा हंगाम

अजिंठ्याच्या पायथ्याशी वसलेल्या किन्ही(फत्तेपूर) ता. जामनेर या जळगाव जिल्ह्यातील मराठवाडी दुष्काळी हवा लागलेल्या छोट्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या, शेतक-यांचा संघर्ष बघत, अनुभवत शिक्षण घेऊन नोकरीनिमित्ताने सध्या विदर्भात बुलडाणा येथे स्थायिक झालेल्या *कवी किशोर भगवान काळे* यांचा शेतक-यांची व्यथा मुखर करणारा 87 कविता असलेला पहिलाच काव्यसंग्रह म्हणजे *बांडा हंगाम*!

अस्सल ग्रामीण विशेषत: शेतकी तावडी शब्दधन घेऊन आलेली ही समृद्ध ग्रामीण कविता आहे. कवितेतलंं मला फारसं कळत नाही असं मनोगतात कवी म्हणतो, पण ते खरं नाही. ती कवीची विनम्रता आहे फक्त.
शेतीमातीशी कवी इतका एकरूप झाला आहे, कि जणू तो आपली आत्मकथाच कवितांतून डोळ्यांसमोर उभी करतोय असं वाटत राहतं वाचताना.

तसं पाहिलं तर या काव्यसंग्रहाला *प्राचार्य डॉ. किसन पाटील, जळगाव* यांची सविस्तर 16 पानांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांनी कवीच्या ग्रामीण तावडी बोलीबाबत, शेतकी शब्दसंग्रहाबाबत, प्रत्येक कवितेवर सांगोपांग उहापोह आपल्या प्रस्तावनेत केला असल्यानं आपण वेगळं काय लिहिणार असा प्रश्न मनात होताच. परंतु कवी किशोर काळे यांनी जाणीवपूर्वक कवितासंग्रह पाठवून अभिप्राय कळविण्याचा आग्रह धरला होता. म्हणून आस्वाद घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.

*बांडा हंगाम मधील बाप :*
'बांडा हंगाम'मध्ये अनेक कवितांतून कवी किशोर भगवान काळे यांनी गावागावात घरोघरी आढळणारा शेतकरी बाप आपल्या खास शैलीत उभा केला आहे. अनेक ग्रामीण उपमारूपकांतून हा बाप वाचकांना आपलासा करून जातो. बापाचं शेतीभोवती गुरफटलेलं व्यथाविश्व रेखाटताना
त्यात डोळे खोल गेलेला, वांझोट्या हंगामात शिवाराचा झालेला उन्हाळा किलवाण्या नजरेनं पाहत राहिलेला बाप येतो. पावसाळा तोंडावर आला तरी विरत नसलेल्या; वखराला, रोट्यालाही दाद न देणा-या इरेला पेटलेल्या ढेकळांना कुटण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून तो हातात 'मोगरी' घेतो.

हवामान खातं नेहमीप्रमाणंच चुकीचा अंदाज व्यक्त करत राहतं. हंगाम आणखीच बांडा होत जातो.
*प्रमुख पाहुणे वेळेवर न आल्यानं*
*उडावा बोजबारा*
*एखाद्या साहित्यसंमेलनाचा*
*तसंच होतं शेतक-याचं*
*पाऊस वेळेवर न आल्यानं*
दुबार पेरणीची वेळ येते. शेतकरी बाप कर्जाच्या ओझ्याखाली दबू लागतो. 'आयुष्य मिरचीच्या ठेच्यासारखं कोरडं खट्ट' होत जातं. जमवलेली पुंजी, बायकोच्या अंगावरचं किडूकमिडूक जमिनीत पेरून बटाईनं शेटजीची शेती कसताना हा बांडा हंगाम येतो तेंव्हा, हवालदिल होऊन
*हातात तांब्याभर पाणी घेऊन*
*तो चेकाटत असतो ढगांकडे पाहून*
*घ्या रे कोल्ड्या ढगाडाहो*
*घोटभर पाणी प्या*
*नल्डा सुकला अशिन तुमचा*
मग या बापाला दिलासा द्यायला मोफतच्या टोलेजंग व्यासपिठावरून समोर केवळ कापसाच्या गंज्याच दिसणारे, चहातून गायब झालेली साखर भाषण करताना तोंडातून ओघळणारे पुढारी येतात. हे माफ... ते माफ , मालाला गच्च भाव अशी 'गंदीबात' शिवी वाटणारी आश्वासनं तोंडावर मारून निघून जातात. 'देवाधर्माच्या नावांनं थोतांड'ही घडत राहतं ठिकठिकाणी. म्हाता-या बैलाशी 'सायड' करत नाही कुणी, तसं एकाकी होत जातं जगणं. पाऊसही त्याच्या पडलेल्या नशिबाशी युती करून घेतो. 'गणितात हुशार असलेला बाप टुघ्नी लागून' आयुष्याच्या गणिताला शरण जातो. 'स्वत:च्याच विषयात अभ्यासाच्या कैक आवृत्त्या करूनही नापास ठरतो.' शेतकरी होऊन जगणं हे औत ओढण्याइतकं सोपं नाही हे समजून घेऊन बैलही दानचा-याला जागू लागतात. पाऊसरूपी 'फॅमीली डॉक्टर' काही केल्या वेळेवर येत नाही. आलाच तर 'बैलाच्या थेंब थेंब मुतासारखा' येतो. मुलीची सोयरीक, मुलाची फी साठी कटकट, सावकाराचा तगादा सुरू होतो. समुद्र नाहीच मिळाला तरी चालेल, पण
*आपलेपणानं*
*दोन थेंब देऊन*
*आतून बाहेरून*
*चिंब करणा-या ढगांसाठी*
ईश्वराचा धावा सुरू होतो.

*माणसाने द्यावी माणसाला उभारी*
*पण माणूसच सावज इथे माणूसच शिकारी*

*ढोरा पोरांच्या चा-यासाठी*
*भुईदासाचे रोम जळे*
*थेंबासाठी हैराण तो...*
*बगळ्यांच्या ताब्यात तळे*
अशी अवस्था होऊन जाते. घोषणांची झुल अंगावर चढवून आश्वासनांच्या नाथा टोचून घेऊन आमिषाच्या चाबुकानं मुरलेल्या भाद्या बैलासारखं खाली मान घालून लोकशाहीचं गाडं हाकलं जातं.

 *"शेती ही पिकविण्यासाठी असते, विकण्यासाठी नाही"* , हे हृदयाच्या ठोक्याठोक्यात बिंबवलेलं असतं त्यांनी. पण
'सोईरपणातल्या सौद्यांचे सोहळे पार पाडून पोरीचे हात पिवळे करण्यासाठी विकावी लागते त्याला शेती.' कुणाला विकतो?
*ना गाळला घाम कधी*
*ना अंगाला माती आहे*
*काळ्याचं पांढरं करण्या*
*नावे त्यांच्या शेती आहे*
अशा काळा पैसा लपविण्याचा घाट घातलेल्या पांढरपेशा, भ्रष्ट धनदांडग्यांना शेती विकली जाते. खरा शेतकरी बाप भुमीहीन शेतकरी बनून त्याच मातीत राबत राहतो. हातात केवळ रूमण्याचे मुठ्ठे अन् त्यानं हातावर पडलेले घट्टेच राहून जातात.

*'बा'चं जीणं जीर्ण*
*धुडक्याचा बोळा*
*मनामधी तरी*
*मातीचा उमाळा* अशा प्रकारे कवी शेतकरी बापाचं हुबेहूब चित्र वाचकाच्या डोळ्यांसमोर उभं करतो.

तसाच बारवर 'दर्यादिली' दाखवत मित्रांसोबत चखण्यात घरदार चघळणारा अन् मद्यात सातबारा रिचवणारा बापही कवीने जोरकसपणे रेखाटलेला आढळतो.

*बांडा हंगाम मधील माय* :

या कवितासंग्रहात माय फारशी आढळत नसली तरी ती संघर्षरत बापासोबत परिस्थितीशी लढा देताना सतत जाणवत राहते. हताश बाप वाळलेल्या पिकाकडे किलवाण्या डोळ्यांनी पाहत बसल्यावर लेकराच्या रूपात भविष्यातले कैक हंगाम दाखवणारी खंबीर माय इथं बघायला मिळते. चूल फुंकत डोळ्यांतून ओघळणा-या आसवांवर भाकरी थापणारी, लाज झाकण्यासाठी चिंध्या चिंध्या जोडून लुगडं नेसणारी, अडाणी असूनही बापाच्या चेह-यावरचे भाव वाचणारी, पेरणीसाठी अंगावरचं किडूकमिडूक देणारी , दम्यासाठी दवाखान्याची आस धरून बसलेली मायही कवी मांडून जातो. जमीन नावाची माय तर आहेच आहे.

*आजोबा*

बांडा हंगाममध्ये गावात हमखास आढळणारा *आजा*ही एकदोन कवितांतून लक्ष वेधून घेतो. ताटात पडलेलं उष्ट किंवा उकिरड्यावर गेलेले चा-यातील धांड्यातील सग पाहून आज्याच्या आवाजाला धार येते. मग तो त्यानं पचवलेले बरसादीतले उन्हाळे पोटतिडकीनं सांगत सुटतो. काटकसरतीत जगण्याचं तत्वज्ञान मांडत बसतो. मोटारीपेक्षा मोटंच बरी म्हणणारा आजा पीटरकडे पाहून म्हणतो, "जाळा तेल, करा भाकरीला भोकरं महाग."

*मुलगा*
बांडा हंगाममधील बहुतांश कवितांचा निवेदक म्हणून शेतक-याचा मुलगा बनून कवी आपल्यासमोर येतो. तो बापासोबत, आईसोबत, आज्यासोबत घडणा-या घटनांचा जणू साक्षीदारच आहे. तो संवेदनशील आहे. तो शेतकरी बापाच्या आयुष्याची तुलना कवीसंमेलनातून हताशपणे परतणा-या कवीशी करतो. आज्याच्या काटकसरीची कथा समंजसपणे सांगतो. ढुंगणावर ठिगळं असलेली चड्डी घालणारा, पेरणीआधी बापासोबत पैशांसोबत दम देणा-या सावकाराकडे जाणारा, बाजारात डोळे खोल गेलेला बाप तब्बेतीनं गोल असलेल्या लोकांना भेटल्याचं निरीक्षण नोंदवणारा मुलगा येथे आढळतो. मायबाप नशिबाचं गा-हाणं सांगत असताना
*"बाबा, मले नही शिवता येणार*
*आपलं फाटकं आभाय..*
*पण मी लावून घीन माह्या*
*फाटक्या चड्डीले थिगाय*
*मक्याच्या थैलीचं मी*
*बनवून घीन दप्तर*
*रद्दीतल्या वहीत*
*लिहिन प्रश्न उत्तर*
*बाबा, सांग ना कधी जागीन*
*भजनामधला विठू?*
*बंद होतीन पेपरात येणारे*
*लटकलेल्या माणसांचे फोटू?*
असा आत्मविश्वासाची भाषा बोलत व्यवस्थेला प्रश्न विचारणारा मुलगाही कवी अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत रेखाटून जातो. त्याचबरोबर बापाला बाप झाल्याचं पाप वाटावं असं मोठं झाल्यावर वागणारा, नोकरी लागल्यावर भाऊ, मायबापांना टाळणारा, विभक्त कुटुंबपद्धतीला शरण गेलेला मुलगाही कवी ताकदीने शब्दांत उतरवतो.

यासोबतच अनेक कवितांतून कवीने बैलांबाबत कृतज्ञता व बैलांची शेतक-याबाबतची कृतज्ञता शेतीशी संबंधीत विस्मृतीत गेलेल्या अनेक वस्तूंच्या उल्लेखांसह अभिव्यक्त केली आहे. अस्सल ग्रामीण शब्दांतून ग्रामीण व भौगोलिक वातावरणनिर्मिती साधली आहे. एक संपूर्ण गावगाडाच काव्यसंग्रहातून उभा केला आहे. सावकार, राजकारणी व्यक्ती, शिवराय आदिंना पाचारण केले आहे. शेतक-याचं शेतीमातीशी व भवतालाशी जोडलं गेलेलं अवघं आयुष्य चितारण्याचा यशस्वी प्रयत्न कवीने केला आहे. बहुतांश कविता ही छंदमुक्त स्वरूपात असून एक गीतरूपात तर तीन अभंगरचनेच्या स्वरूपात प्रकटलेल्या आहेत. बांडा हंगाममध्ये शेतक-यांच्या आयुष्याची नकारात्मक बाजू मांडत असताना काही प्रेरणादायी कविताही कवी रचून जातो. शेतक-यांच्या उत्थानासाठी शिवरायांना पुन्हा जन्मण्याचे साकडेही घालतो. एकदोन कवितांतून शृंगाररसालाही हात घालतो.

एकूण शेतक-याचं भलं व्हावं या उदात्त हेतूनं शेतक-यांची होणारी अस्मानीसुलतानी होरपळ रेखाटण्याचा कवीचा प्रयत्न अत्यंत यशस्वी झाला आहे असंच म्हणावंसं वाटतं. किशोर भगवान काळे हा नवा ग्रामीण कवी मराठीला मिळाला हे अभिमानानं सांगावसं वाटतं.

आकर्षक सुसंगत मुखपृष्ठ व मलपृष्ठ, कागदाचा उत्तम दर्जा, अचूक अक्षरजुळवणी, उत्कृष्ठ बांधणी व डॉ.किसन पाटील यांची पाठराखण यांमुळे या कवितासंग्रहाचे संग्राह्यमुल्य निश्चितच वाढले आहे यात शंका नाही.

बांडा हंगाम हे शिर्षक जरी नकारात्मक असलं तरी कवी पावसाबाबत, हंगामाबाबत सकारात्मक आहे. याच भावनेतून तो आवाहन करतोय,

*तुझ्यावर सा-या*
*कुणब्याची धौस*
*पूरव ना हौस*
*पेरणीची*||

~ राजीव मासरूळकर
   गटशिक्षणाधिकारी
   पं.स.सोयगाव जि.औरंगाबाद

बांडा हंगाम (कवितासंग्रह)
कवी- किशोर भगवान काळे Kishor Kale
अथर्व प्रकाशन,धुळे
एकूण पृष्ठसंख्या - 112
किंमत - रू.150/-

3 comments:

  1. ग्रेट, आपली समीक्षक म्हणून ओळख झाली. छान लिहिलं. माझा आवडता कवी आहे

    ReplyDelete
  2. धन्यवाद कोळी सर.

    ReplyDelete
  3. आपल्या कविता संग्रहाचे रसग्रहण माझे मित्र सत्यजित साळवे यांनी एका वृत्तपत्रात लिहिलं होतं. त्यानंतर मी काव्यसंग्रह विकत आणून पुर्ण वाचला. कवी किशोर काळे यांनी त्यांच्या कवितेत रेखाटलेले बाप, माय,सावकार, पाऊस,सरकार ही भावस्पर्शी पात्रे ही मला ओळखीची वाटली. शेतकऱ्याच्या दुःखाचं वास्तववादी चित्रण कवितेतून केलं आहे.

    ReplyDelete