सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Thursday, 11 May 2017

एक टेकडी

एक टेकडी

गावकडेला विरक्त निर्जन एक टेकडी रेखिव ठाशिव
तिच्या शिरावर तिच्यासारखे एकट राकट पडके देउळ
दोन तरूंचे दोन हात ती पसरुन नभास बघते आहे
इतिहासाला ठसवुन पचवुन स्वतः स्वतःला ठगते आहे !

पिकापिकांतुन गवतफुलांतुन धावत येतो शीतल वारा
हाच सखा नित जवळी राहुन शीण तिचा घालवतो सारा
अधुनमधुन ती हलते डुलते खुलते फुलते या वाऱ्‍यास्तव
नंतर बसते अविरत झेलत निरर्थकाचा मुजोर विस्तव !

ओढ तिला पण असते कायम स्वैर खगांची, श्याम ढगांची
हजार क्रोधित जिभा दाखवित कडाडणाऱ्‍या लख्ख विजांची
झिमझिम रिमझिम टपटप सरसर रपरप थडथड जलधारांची
तळहातांवर घेता घेता वितळत जाणाऱ्‍या गारांची
खळाळ पाझर झऱ्‍या नद्यांची, गवततुऱ्‍यांची, कळ्याफुलांची
चरता चरता हुंदडणाऱ्‍या, हंबरणाऱ्‍या जित्राबांची
खऱ्‍याखुऱ्‍या उघड्या शाळेतील झिम्मा . . . फुगड्या . . . सवंगड्यांची . . . . !

खिन्न मनाने युगे युगांते तपस्विनी ती तपली आहे
जखमांवरती जखमा लेवुन खपल्यांसंगे खपली आहे

मानुषतेच्या
वरती आहे
तिचे राहणे . . . .
काळोखाच्या
पुढती आहे
तिचे पाहणे . . . .

खोटी हिरवळ, लटका पाझर- तिला कधी ना जमले आहे
विसावण्या त्या पायथ्यास जग मनामधुन डगमगले आहे
झाडी गेली, पक्षी गेले, तिथे खायला नाहित दाणे
जुळून आले तिचे न् माझे बेसुर भेसुर जीवनगाणे !

हल्ली नियमित संध्याकाळी तिच्याकडे मी जाउन बसतो
हताशशी ती माझ्यामध्ये तिला स्वतःला खोदत बसते
मी ही नकळत तिच्यात माझे उदास मीपण शोधत बसतो !

- राजीव मासरूळकर
दि. २९ जून २०१३

सांग...

सांग . . . . .

वाळवंटी पायखुणा अजूनही पाहतेस
प्रेमाचे हे विरही क्षण सांग कशी साहतेस ?

पहाटेचे उन जसे फुलला तुझा चेहरा
बोलावून बाहेर मला देते तुझा शहारा
सांग माझ्या शहाऱ्‍यांत तू कशी दाहतेस ?

मेघांतून बरसतेस तू थेंब होऊन
तन मन चुंबून तुझ्या आठवणींत नेतेस वाहून
आठवांच्या सरीत माझ्या तू कशी नाहतेस ?

संध्याकाळच्या हवेतून होतात तुझेच भास
रातराणी सुगंधातून येतात तुझेच श्वास
सांग माझ्या श्वासांविना तू कशी राहतेस ?

किती दिवस आता असे दुरून दुरून पहाणे
कुणकुण ऐकून होईल जुने वारे शहाणे
सांग कधी वाऱ्‍यासारखी माझ्या मिठीत येतेस ?

- राजीव मासरूळकर
मासरूळ , बुलडाणा

माझ्या त्या सा-या कविता..

माझ्या त्या साऱ्‍या कविता

अत्यानंदातच विरल्या
दुःखातही नुरल्या काही
माझ्या त्या साऱ्‍या कविता
शब्दांत उतरल्या नाही !

आईच्या डोळ्यांमधल्या
बापाच्या छातीवरल्या
माझ्या त्या साऱ्‍या कविता
दगडाच्या लेणी ठरल्या !

कधि शेताच्या बांधावर
कधि रस्त्याच्याच कडेला
सूर्याचा वंशज कोणी
देवास पुकारून गेला
कोसळला तरिही नाही
कुठल्याच ढगातून पाऊस
माझ्या त्या साऱ्‍या कविता
बसल्यात उजाडुनिया कुस

एकांती तडफडणाऱ्‍या
मौनाला कुरतडणाऱ्‍या
माझ्या त्या साऱ्‍या कविता
रूधिरातून पाझरणाऱ्‍या !

माझ्या त्या साऱ्‍या कविता
हृदयात बसवलेल्या मी
होईलच देह निकामी
तेव्हा त्या येतील कामी !

- राजीव मासरूळकर
दि . २४.८.१२
सकाळी ८.४५ वाजता

मनासारखे झाले नाही

मनासारखे झाले नाही

नको मानवा मनास लावू क्षुल्लक खोचक उगीच काही
विस्मरून ते हसत म्हणावे मनासारखे झाले नाही

सुंदर कोमल फुले चुलीतच आयुष्याला जाळत बसती
उमरावांच्या इमल्यांसाठी निरागसांची जळते वस्ती
नियमांआडुन चोरांसाठी सदाच असती पळवाटाही
हसून खोटे पुन्हा म्हणावे मनासारखे झाले नाही

जन्म मिळाला रंकघरातून जसे मिळाले जगून गेलो
स्वप्न कशाचे वास्तवातही कितीकितीदा मनात मेलो
अन्यायाने लाचारीने सर्वांगाची होते लाही
नशीब नियती म्हणू कशाला.... मनासारखे झाले नाही

जे कामाचे ते दुसऱ्‍याचे, कुचकामी ते सगळे माझे
चुकलेमुकले स्विकारूनही नवागतांना झालो ओझे
हे मित्रांनो , विश्वच तुमचे , आनंदाने देतो ग्वाही
पंख उभारुुन म्हणू नका पण मनासारखे झाले नाही

जन्मा येणे, खाणे, पीणे, हसणे, रडणे, कष्ट उपसणे
निरर्थभरल्या आयुष्याला झिजवून सजवून विझून जाणे
माझे माझे जपून सारे नसते माझे धन कायाही
कशास गावे रडगाणे की मनासारखे झाले नाही !

- राजीव मासरूळकर
मासरूळ जि बुलडाणा
दि २५.५.१२, ५.०० वा

तू...

तू....

सोनकोवळ्या सांजउन्हातुन
तुला पाहतो अंतरामधुन
दूर मंदिरी वाजे घंटा
रव येई तव पैंजणांमधुन !

धरणावरचा वारा ओला
स्पर्शुन जाता तुझ्या तनाला
सलज्ज तृप्ती तुझ्या मुखीची
मोहीत करते सांजनभाला !

गालावरची बघून तुझिया ,
आभाळीही चढते, लाली
तुझ्या पावलांना स्पर्शाया
श्वास रोखते धुंद लव्हाळी!

सूर्य थांबतो क्षितिजावरती
ढगाआडुनी तुला बघाया
गवतफुलेही तुझ्या दर्शनी
उधळुन देती मधाळ फाया !

तुला लपेटुन घेण्यासाठी
अंधाराला होते घाई
किर्र वनापल्याडुन येऊन
चंद्र तुझी बघतो नवलाई !

घरास तुझिया , मनात माझ्या
चालत डोलत पोचतेस तू
शब्दरूप तुज देतो , कायम
मम हृदयी वसतेस तूच तू !

- राजीव मासरूळकर
मु पो मासरूळ
ता जि बुलडाणा
दि १४.१०.२०१०
सायंकाळी ६.०० वाजता

प्रवास



आज
अगदी अनोळखी  असूनही
सोबत प्रवास केला आपण...
तुझं वागणंही सहाजिकच होतं
अनोळखीचं....
शुन्यात बघत राहिलीस खिडकीतून बाहेर काही वेळ
तर थोडा वेळ कानांना  हेडफोन लावून
डोळे बंद करून
गढून गेलीस गाणी ऎकण्यात...
मी सुद्धा मग
तुझ्याकडे लक्ष नसल्यासारखं भासवत
मोबाईलमध्ये डोकं घातलं बराच वेळ...
उतरण्यासाठी उठताना 
एक कटाक्ष टाकावासाच वाटला तुझ्याकडे
तर तुझे डोळे बंदच....
एक शब्दही न बोलल्याचं शल्य
सद-यावरची धूळ झटकावी
तसं झटकून मी खाली उतरलो
तर खिडकीतून तू 
खिन्न डोळ्यांनी
माझ्याकडेच बघत असलेली.......

का गं ? ? ? ? ? 

~ राजीव मासरूळकर
19/9/2014
05:30pm

सखे तुझी निराळीच त-हा

*तुझी निराळीच तऱ्‍हा*

ओठातून ओसंडतो गुलाबाचा गंध
गालातली खळी करे नयनांना धुंद
झुकते पापणी मान कलवते जरा
लाजण्याची सखे तुझी निराळीच तऱ्‍हा !

खोल खोल डोळ्यांमध्ये लखलखे पाणी
मधाळसे शब्द तुझे पडतात कानी
हृयाच्या आत आत फुलतो मोगरा
बोलण्याची सखे तुझी निराळीच तऱ्‍हा !

भांडतेस रूसतेस शोधतेस पुन्हा
आवेगाने मिठीमध्ये शिरतेस पुन्हा
मनातला पाझरतो तुझा प्रीतझरा
वागण्याची सखे तुझी निराळीच तऱ्‍हा !

कधी कुठे थांबतो मी होतो मला वेळ
मनामध्ये सुरू होतो तुझ्या वैरखेळ
चेहराही होतो तुझा घाबराघुबरा
साहण्याची सखे तुझी निराळीच तऱ्‍हा !

कित्ती कित्ती करशील माझ्यावर प्रेम
कधी कुठे काय होई नसतोच नेम
सत्यवान नाही तरी तुझा खराखुरा
प्रिय मला सखे तुझी निराळीच तऱ्‍हा !

- राजीव मासरूळकर
दि . ४ जून २०१२
दुपारी २.०० वाजता