सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Thursday, 11 May 2017

एक टेकडी

एक टेकडी

गावकडेला विरक्त निर्जन एक टेकडी रेखिव ठाशिव
तिच्या शिरावर तिच्यासारखे एकट राकट पडके देउळ
दोन तरूंचे दोन हात ती पसरुन नभास बघते आहे
इतिहासाला ठसवुन पचवुन स्वतः स्वतःला ठगते आहे !

पिकापिकांतुन गवतफुलांतुन धावत येतो शीतल वारा
हाच सखा नित जवळी राहुन शीण तिचा घालवतो सारा
अधुनमधुन ती हलते डुलते खुलते फुलते या वाऱ्‍यास्तव
नंतर बसते अविरत झेलत निरर्थकाचा मुजोर विस्तव !

ओढ तिला पण असते कायम स्वैर खगांची, श्याम ढगांची
हजार क्रोधित जिभा दाखवित कडाडणाऱ्‍या लख्ख विजांची
झिमझिम रिमझिम टपटप सरसर रपरप थडथड जलधारांची
तळहातांवर घेता घेता वितळत जाणाऱ्‍या गारांची
खळाळ पाझर झऱ्‍या नद्यांची, गवततुऱ्‍यांची, कळ्याफुलांची
चरता चरता हुंदडणाऱ्‍या, हंबरणाऱ्‍या जित्राबांची
खऱ्‍याखुऱ्‍या उघड्या शाळेतील झिम्मा . . . फुगड्या . . . सवंगड्यांची . . . . !

खिन्न मनाने युगे युगांते तपस्विनी ती तपली आहे
जखमांवरती जखमा लेवुन खपल्यांसंगे खपली आहे

मानुषतेच्या
वरती आहे
तिचे राहणे . . . .
काळोखाच्या
पुढती आहे
तिचे पाहणे . . . .

खोटी हिरवळ, लटका पाझर- तिला कधी ना जमले आहे
विसावण्या त्या पायथ्यास जग मनामधुन डगमगले आहे
झाडी गेली, पक्षी गेले, तिथे खायला नाहित दाणे
जुळून आले तिचे न् माझे बेसुर भेसुर जीवनगाणे !

हल्ली नियमित संध्याकाळी तिच्याकडे मी जाउन बसतो
हताशशी ती माझ्यामध्ये तिला स्वतःला खोदत बसते
मी ही नकळत तिच्यात माझे उदास मीपण शोधत बसतो !

- राजीव मासरूळकर
दि. २९ जून २०१३

No comments:

Post a Comment