शहरातून
गावात आलो...
गावात हिंडतांना
कावऱ्याबावऱ्या शहरी नजरेत
भरल्या
दोन-तीन गावठी विश्वसुंदऱ्या . . . . .
मनातला बेडूक
स्वतःच्याच डबकी-विश्वात
उड्या मारत
राहिला ओरडत ड्राँव . . . ड्राँव . . . . .
शेतावर आलो
अन् लक्षात आलं,
ज्या काळ्या मातीत
हिरवी हिरवी पिकं डोलायला हवी होती,
तिथं
गर्द पिवळं तण माजलं होतं . . .
माय निंदत होती . . .
नकळतच
हाती खुरपं घेऊन
मी ही निंदू लागलो
जसजसं तण साफ होत होतं . . .
तसतसं मनही साफ होत होतं . . . . . !
~ राजीव मासरूळकर
'मनातल्या पाखरांनो'
मार्च २००६