बा, करोना... ये, तुझं स्वागत आहे!
अगदी वेळेवर आलास बघ तू
तुझ्या वाटेला डोळे लावूनच तर बसलो आहोत आम्ही जन्मापासून
ये, तुझ्या स्वागतास हा अखंड हिंदुस्थान सज्ज आहे!
तुझा सामना आता आमच्याशी आहे!
(तशी अगदी संपूर्ण मानवजातच सज्ज आहे म्हणा...
पण मानवजात वगैरे सगळं फोल असतं रे..)
ऑ... विचारात पडलास?
स्वागत वगैरे का म्हणून..?
सोड रे... तुला घाबरण्याइतकं डरपोक थोडंच आहे आमचं रक्त!
(समाजमाध्यमांवर तुझा नायनाट करण्यासाठी
सूचवले जात असलेले जालीम विनोदी उपाय आठवून बघ)
कळ्ळंकाय...?
चिननं दाखवलंय तुझं अक्राळविक्राळ रूप सबंध जगाला.
सतत फुत्कारत, आग ओकत राहणारा एवढामोठा ड्रॅगन
तुला बघताच चळाचळा कापायला लागला हे म्हायती झालंय शेंबड्या पोरांनाही
म्हणून आम्ही घाबरून जावं असं काय नवीन जीवघेणं वैशिष्ट्य आहे तुझ्यात... सांग तरी!
नुकतीच कोवळी लुसलुशीत जावळं दिसू लागलेल्या डोक्याखाली असलेल्या
तुझ्या निष्पाप तुकतुकीत कपाळावर
प्रश्नार्थक आठ्यांचं वाढत चाललेलं जंगल बघून
मला किती असुरी आनंद होतोय तुला कसं सांगू...!
घाबरू नकोस... तुझी उत्सुकता तुटेपर्यंत ताणणार नाही मी ...
ये इकडे, जरा बस, पाणी पी, थोडा हस
लाजू नकोस, नाहीय लस
दुरून आलास, थकुनभागून
पाय पसर... देऊ दाबून....?
हां... किती शहाण्यासारखा वागतोयस आता!
चल, डोळे मिट बघू हळुहळु
तुझ्या सोनेरी जावळांतून माझी करामती बोटं फिरवत
तुला काही गोष्टी सांगेन म्हणतो मी
पण नुकताच जन्मलेला तू...
तुला सांगावं की सांगू नये हा प्रश्न
तुझ्यामुळे सध्या सुरू असलेल्या हाहा:कारापेक्षा
अधिक तिव्रतेने सतावतोय मला...
खूप लहान आहेस रे तू अद्याप,
कळेल तुला हळुहळु
खरं सांगू...?
तुझ्या येण्याचं कुठलंच अप्रुप नाहीये आम्हाला
का म्हणून विचारतोयस म्हणून
इच्छा नसतानाही सांगतोय तुला... नीट ऐक
या भूमीवर आम्ही जन्मलो तेव्हापासूनच
माणसाळवून ठेवलेयत आम्ही HIV सारखे महाभयंकर व्हायरस
बा करोना, HIV तर आमच्याही आधीचा
आमच्या बापजाद्यांच्याही आधीचा
मूळपुरूषासारखाच जणु...
तूही त्याचाच वंशज असावास
म्हणजे दूरचा का होईना .. आमचा नातलगच!
त्यानंतर अनेक आक्रमक व्हायरस आले क्रमाक्रमाने
....देवी, गोवर,पोलिओ, चिकुनगुनिया, इबोला वगैरे वगैरे
आम्ही लढलो त्यांच्याशी निकरानं
या संघर्षात आमच्या असंख्य पिढ्या कामी आल्या
काही आम्ही संपवले,
काही आम्हाला हरवून स्थिरावले इकडेच आमचेच होऊन...
हो हो हो... अरे थांब जरा!
झाली लगेच लागन तुलाही?
इतिहास ऐकल्याबरोबर लगेच लागलास फुगवायला छाती
56 इंचांपर्यंत...
याच भितीमुळे तर सांगणार नव्हतो ना मी तुला हे...
इतिहास हा कडुगोड परिणाम दाखवणारा एक व्हायरसच आहे का
यावर सध्या संशोधन सुरू आहे आमच्याकडे
कधी महिन्याला, कधी आठवड्याला, कधी दररोजच
प्रयोग करीत असतो आम्ही
इतिहास उगाळून रक्तपात घडतो का या विषयीचे
रक्तपात घडतोच पण त्याच्यामागे इतिहास हाच व्हायरस आहे
हे काही केल्या सिद्ध होऊ शकलेलं नाही..
तुला त्याची लागन होऊ नये म्हणून मी काळजी घेतोय... बस्स एवढंच!
(फितुरीचाही मोठा इतिहास आहे बरं का आमच्याकडे
मी ही एक फितुरंच... असं म्हणतोस?
असू दे असू दे.. मला नाही पर्वा त्याची!)
तसं बस एवढंच नाही, बरंच काही सांगायचंय तुला
विचारायचंही आहे...
मला सांग, जन्माला आल्यापासून
किती माणसांचे जीव घेतले आहेस तू पृथ्वीवर?
पाचपंचवीस हजार ना?
तुला माहितीये दररोज अपघाताने जगभरात किती लोक मरताहेत?
कँसरने दररोज जीव गमावणारांचा आकडा माहितीये तुला?
हृदयविकाराने किती जण जग सोडून जातात दररोज?
अजून किती जीवघेणे आजार सांगू?
खायला अन्न नाही म्हणून तळमळून कितींचा प्राण जातो?
आणखी एक,
केवळ आमच्या एकट्या अखंड वगैरे भारतात आत्महत्या नावाचा एक महाभयंकर विषाणू
दरमहा किती गळ्यांना फास लावतो माहितीये? दरमहा सुमारे 1000....
तू आल्यापासून किती न् काय दिवे लावलेस?
तू गर्भगळित व्हावंस म्हणून काही मी हे सांगत नाहीये
अभ्यास कर. पुढच्या वेळी येशील तेव्हा प्रचंड तयारीनिशी ये..
कळ्ळंकाय ..?
महत्वाचा विषय बाजुलाच राहिला बघ...
धर्म नावाचा एक अत्यंत जटिल विषाणू
संपूर्ण पृथ्वीभर पसरलाय
तू येण्याच्या खूप खूप आधी
आमच्या जन्मानंतर लगेचच....
माणसाने धर्म जन्माला घातला कि धर्माने माणूस
इतिहास धर्मातून आला की इतिहासातून धर्म
या वादात पडण्यात बिल्कुल स्वारस्य नाही आम्हाला
आमचा रस धर्म-जातींच्या कडेकोट बंदोबस्तात आहे
अनेक रूपांत प्रकटलेला, अनेक शाखांत विभागलेला
हा महाजटिल विषाणू दररोज
शेकडोच्या संख्येत आमचं रसग्रहण करतो
आणि आम्ही त्याचं रसग्रहण करतो!
सत्य, अहिंसा, प्रेम, कर्म, दया, दु:खमुक्ती, मानवता इत्यादि
प्राणतत्वांतून जन्मलेला असूनही
तो दररोज त्यांचाच प्राण कंठाशी आणत सुटलेला आहे...
आजघडीला तो समाजमाध्यमांवरील अफाट अतिरंजित
असंबद्ध माहितीवर पोसला जात असून
तंत्रज्ञान मुठीत घेऊन फिरणा-या मेंदूमेंदूत
द्वेष पसरवण्याचं, बुद्धीभेद करण्याचं,
दंगली घडवण्याचं कर्तव्य बेमालुमपणे निभावताना दिसतेय...
गेल्या शतकादोनशतकातला दंगलींचा , छुप्या-उघड धर्मयुद्धांचा इतिहास अभ्यासून बघ
विषाणुंच्या धर्मांत जन्मल्याचा तुझा अहंगंड गळून पडेल कदाचित...
नेपाळमध्ये भूकंप होतो, देश मदतीला धावतो
जपानमध्ये त्सुनामी येते, देश मदतीला धावतो
चीनमध्ये करोना येतो, देश मदतीला धावतो
ऑस्ट्रेलियात जंगल पेटतं, आम्ही कळवळून उठतो
प्रसंगी पाकिस्तानात नैसर्गिक, आरोग्यविषयक संकट उद्भवलं तरी आम्ही मदतीला धावून जातोच
पण देशातल्या भिन्नधर्मी, भिन्नजातीयांसोबत उसळणा-या दंगलींचं काय?
महिलांवर होणा-या अत्याचाराचं काय?
देशादेशांत सुरू असलेल्या धर्मयुद्धांचं काय....?
या सगळ्याला सरावलो आहोत रे आम्ही
असे असंख्य महाभयंकर विषाणू आमच्या नित्य जगण्याचा भाग झालेले आहेत,
काही खेळणी म्हणून खेळण्याचा भाग झालेले आहेत...
आम्ही या जुन्या खेळातंच आत्मघात करत संपून जाणार आहोत
हे ठरलेलं आहे..
मग तुझ्या येण्याचं कौतुक ते कितीसं असणार?
तू नवा आहेस इतकंच काय ते नवल
नव्याचे नऊ दिवस म्हणून उदोउदो होईल फारतर
पाहुणा म्हणून काही दिवस रहा,
मग आमचाच होऊन जा
तशी तू येणार असल्याची भविष्यवाणी
आधीच लिहून ठेवली गेलेली आहे आमच्याकडे
फक्त तू काही चमत्कार घडवून आणतोस का
याकडे लक्ष राहिल रे आमचं
तू आलास याचा थोडा आनंद आहेच
आणि हे स्वागतही त्यामुळेच!
(खरं सांगू का?
अजून एक भविष्यवाणी आहे
एका घासात पृथ्वी गिळंकृत करणा-या महाभयावह व्हायरसची..
त्यासाठीच तर अधीर झालेलो आहोत ना आम्ही?
त्यादिशेनंच तर वाटचाल सुरूय बघ.
पण तू आला आहेस तर असू दे... )
चल, मी जरा पाहुणचाराचं बघतो!
~ राजीव मासरूळकर