सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Friday, 27 March 2020

कोरोना संकटाचे जीवनशैलीवर होऊ शकणारे दीर्घकालीन परिणाम

कोरोना विषाणूचे जागतिक संकट लक्षात घेऊन वेगवेगळ्या खबरदा-या जागतिक स्तरावर घेण्यात येत आहेत. हे संकट निवळल्यानंतर त्याचे जागतिक (विशेषत: भारतीय) जीवनशैलीवर होणारे काही सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय परिणाम नक्कीच दिसून येतील. त्यातील काही शक्यता पुढीलप्रमाणे असू शकतील  :

1)नेहमी घराबाहेर फिरणा-या लोकांना घरात बसून राहण्याची, घरात अधिक वेळ घालवण्याची सवय लागू शकते.

2)लोकांचा धर्मसंस्थेवरील विश्वास कमी होऊ शकतो. प्रार्थनास्थळे व धर्मस्थळांच्या भेटी, सहलींत घट होऊ शकेल. अशा ठिकाणी भरणा-या यात्रांच्या गर्दीत दरवर्षी घट होत जाईल. धार्मिक स्थळांच्या जागतिक पर्यटनावरही परिणाम होईल. जगावर आपली पकड निर्माण करण्यासाठी धर्मसंस्था वेगवेगळे उपाय योजत पुन्हा सक्रीय होईल आणि भौतिक सुखापेक्षा आत्मिक सुखाचे दाखले देत यशस्वीही होत राहिल.

3)मास्क हा दैनंदिन जीवनाचा भाग होईल. पुरूषांमध्ये कदाचित याची फॅशनही येईल. गर्दीच्या ठिकाणी पुरूष मास्क लावून (व महिला नेहमीप्रमाणे स्कार्फ बांधून) फिरताना दिसतील. दवाखान्यांत मास्क घालून येणारांणाच प्रवेश दिला जाण्याचा निर्णय अनेक ठिकाणी घेतला जाईल. मास्क निर्मिती करणा-या कंपण्यांना चांगले दिवस येतील. कदाचित पुरूषांच्या पेहराव्याची फॅशन बदललेली असेल.

4)घरोघरी बाहेरून आल्याबरोबर हात धुण्याला प्राधान्य राहिल. ज्यांच्याकडे वाशिंगमशीन आहे त्यांना बाहेरून आल्याबरोबर कपडे धुवायला टाकण्याची सवय लागेल व पुढे ती एक प्रथाच होईल. सॅनिटायझर्सच्या कंपन्यांची भरभराट होईल. दवाखान्यांत प्रवेशद्वाराजवळच हँडवॉश स्टेशन उभारले जातील. घर, शाळा, प्रार्थनास्थळांवरही ही व्यवस्था प्रवेशद्वारांवरच असेल. स्मशानभूमीवरही ही व्यवस्था राहिल. सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवली जाईल व त्यांची स्वच्छता हा प्राधान्याचा विषय होऊन जाईल.

5)Work from home हा कार्यसंस्कृतीचा एक भाग होऊन जाईल. घरी बसून करता येण्यासारख्या कामांचा शोध घेतला जाईल. या क्षेत्रात नव्या कंपन्या उतरतील. गंभीर आजारी कर्मचारी वगळता दीर्घ रजेवर जाणा-या कर्मचा-यांना कदाचित work from home ची अट घातली जाऊ लागेल.

6) Study from home या संकल्पनेला प्रोत्साहन मिळेल. Home schooling रूजू लागेल. बायजूस, वेदांतू, टॉपस्कोअरर यांसारख्या शैक्षणिक Apps चे पीक येईल आणि घरी बसून online शिकण्याचा खर्च खाजगी इंग्रजी शालेय खर्चाच्या कितीतरी पट कमी होईल.

7)लोकांची भेटतांना हातात हात घेण्याची, मिठी मारण्याची, मित्रांच्या घरी सहपरिवार जाऊन यथेच्छ गप्पा मारण्याची सवय कमी होत जाईल. कुणाच्या घरी मुक्काम करणे  नामशेष होत जाईल. लग्नकार्यात होणारी गर्दी घटत जाईल. रजिस्टर पद्धतीचे लग्न, एका दिवसात विवाह यांचे प्रमाण वाढू लागेल.

8)वर्षभरात एक दिवस 'Lockdown Day' (भारतात 22 मार्च) म्हणून पाळला जाऊ लागेल. प्रदुषण व पर्यावरणविषयक इतर जागतिक समस्यांवरील उपाययोजना म्हणून हे केले जाईल. भविष्यात प्रत्येक महिन्यात एक दिवस, त्यापुढेही जाऊन आठवड्याचा शनिवार किंवा रविवार Lock down करण्याच्या आवश्यकतेवर निश्चितच विचार होऊ शकेल. संकटकाळासाठी तर 'Lockdown' हा परवलीचा शब्द होऊन जाईल.

9)दुस-या महायुद्धानंतर अणवस्रांबाबत जागतिक पातळीवर जशी पावले उचलली गेली, तशीच पावले प्रयोगशाळेत विषाणुनिर्मिती करण्याबाबत उचलली जातील. तरीही काही देश राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत विषाणुनिर्मिती व त्यांच्या चाचण्या करत राहू शकतील.

10)देशावर आलेल्या आरोग्यविषयक भयावह महामारीसारख्या संकटकाळात वयोवृद्ध, गंभीर आजारी व बेवारस , भिकारी लोकांना मरू दिले जाणे शिष्टसंमत मानले जाईल .

11)युवाल नोव्ह हरारी म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या हालचालींवर पाळत ठेवण्याचे तंत्रज्ञान वाढत जाईल. आपण बाळगत असलेल्या व आपल्या शरीरावर बसवलेल्या यंत्राद्वारे सरकार अथवा त्रयस्थ संस्थेकडे जमा होणा-या माहितीद्वारे देशाचा व जगाचा बाजार नियंत्रित केला जाऊ लागेल. देशाचे व जगाचे राजकारणही या माहितीद्वारे प्रभावित असेल. काही देश हुकुमशाहीकडे झुकू लागतील. गोपनियतेला सुरूंग लागत राहिल.

तर कोरोनाव्हायरसचं संकट टळल्यावर आपलं जग एकंदरीतच वरील बाबींसारखं बदलत जाईल असं मला वाटतं.
अर्थात या सगळ्या जरतरच्या बाबी असल्या तरी त्यातल्या काही निश्चितच ख-या ठरणा-या असू शकतात.

आपली काही खास निरीक्षणं असतील तर नक्कीच सुचवावीत.

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
    दि.27/03/2020
    

3 comments:

  1. यापैकी नमूद केलेल्या काही बाबी होणं खरच गरजेचं आहे. संभाव्य परिणामांची मांडणी सुयोग्य

    ReplyDelete