सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Tuesday, 31 March 2020

कोरोनाच्या सावटाखालचं सैरभैर जग

कोरोनाच्या सावटाखालचं सैरभैर जग

मी घरातच आहे.
मी निस्सीम देशभक्त होण्याचा भाबडा प्रयत्न करत आहे.

मी उठतो. बसतो. चालतो. डोलतो. कधी गादीवर, कधी सोफ्यावर लोळतो.
कित्तीही कंटाळा आला तरीही घराबाहेर पाऊल टाकत नाही.
मी टीव्ही लावतो. (त्यासाठी बायको व मुलांसोबत लढावं लागलेलं असतं.) न्युज चॅनलवरचा ब्रेकिंग न्युजचा भडिमार बघतो. राज्याचे, देशाचे, जगाचे कोरोनाबाधितांचे वाढते आकडे बघून घाबरतो. मला सोफ्यावरून खाली उतरावसं वाटत नाही. मी चॅनल बदलत राहतो. भाजीपाल्यासाठी, किराण्यासाठी गर्दी करणा-या, सकाळी मॉर्निंग वॉककरता बाहेर पडलेल्यांचा, घरात करमत नाही म्हणून सहज फेरफटका मारायला म्हणून गर्दी करणा-यांचा, मुंबईपुण्यात कोरोना वाढण्याच्या भीतीपोटी स्वत:ची गाडी घेऊन किंवा ओला-उबर मागवून खेड्याकडे निघालेल्या येड्यांचा मला जाम राग येतो. सोज्वल शिव्या हासडत मी कुस बदलतो. चॅनल बदलतो. ब्रेकमध्ये 20 सेकंदात हात धुण्याची सूचना आल्याबरोबर बेसिनकडे पळतो. हातावर डेटॉल घेऊन Suman M पद्धतीनं हात धुतो. सकाळपासून ओल्याच असलेल्या टॉवेलला पुन्हा हात पुसतो आणि टीव्हीसमोर येऊन बसतो. एखादा चित्रपट लावतो. गढून जातो त्यात. हसतो. खोकतो. नाक ओढतो. बोटांनी नाक साफ करतो. हाताकडे बघतो. घसाही खरखर करतोय. कपाळाला हात लावून बघतो. आपल्याला कोरोना तर झाला नाही ना? चिंताक्रांत होतो. बेसिनकडे धावतो. हात धुतो. नाक धुतो. पुन्हा हात धुतो. हात नाक टॉवेलला पुसतो. नाकही त्याच टॉवेलला पुसले म्हणून पुन्हा हात धुतो. हात पुन्हा त्याच टॉवेलला न पुसता घातलेल्या बर्मुडा चड्डीला पुसतो. टीव्हीसमोर येऊन बसत नाही तोच नाक गळतंय की काय असं जाणवतं. अंगठा व तर्जनीनं नाकपुडीतून काही बाहेर येतंय का ते तपासतो. फिक्कट पिवळा शेंबूड बोटांना लागतो. तो तसाच दोन्ही बोटांनी कुस्करतो. घट्ट होऊन त्याची लेंडी झाली की तशीच अंगठ्यावर घेऊन तर्जनीनं भिरकावतो. तितक्यात हात धुवायचा ब्रेक येतो. पुन्हा बेसिनकडे पळतो. मग मला आठवतं आपण नियोजनपूर्वक महिनाभराचं मेडिसीन व किराणा भरल्याचं. मी सर्दीची एक गोळी घेतो. एक चमचा कफसिरप घेतो. स्वत:ची तारिफ करत पुन्हा सोफ्यात बसतो. टीव्ही बोर झालेली असते. मग मी मोबाईल काढतो. Whats app वर क्लिक करतो. चीनमध्ये इतके, इटलीत तितके लोक मेल्याच्या, खबरदारी घ्यायला सांगणा-या पोस्ट वाचतो. घरात बसणारांवरचे, बाहेर पोलिसांचे फटके खाणारांवरचे , नवराबायकोवरचे विनोद वाचतो. हसतोही. मग इटलीतून मराठी माणसाचा मराठी माणसांना घरातच बसा म्हणून कळकळीची विनंती करणारा भीतीदायक व्हिडीओ पाहतो. आपण कोरोनानं मेलो आहोत आणि आपलं प्रेत उचलायलाही कोणी उरलेलं नाही असं दृश्य डोळ्यांसमोर येऊन मी थरथरायला लागतो. जवळच्या लोकांच्या चारपाच ग्रुपवर तो व्हिडीओ पाठवून मी त्यांना सतर्क करतो आणि न्युज चॅनल लावतो. लोक घराबाहेर फिरतच आहेत, पोलिस त्यांच्यामागे धावताहेत, ढुंगणावर फटके देताहेत असे मनोरंजक दृष्य पाहत बसतो. मग राज्याचे आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री मिडीयासमोर येतात. राज्यात किती रूग्ण दाखल आहेत, काय काळजी घेतली जात आहे, जनतेने काय दक्षता घ्यावी याबाबत माहिती देतात. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. ब्रेकिंग न्युजचा भडिमार सुरू राहतो. मला आठवतं टीव्ही मोबाईल पाहताना मी अनेकवेळा नाकाला, चड्डीला हात लावलाय. घशातली खरखर वाढत चाललीय. आता आपलं काही खरं नाही म्हणत पुन्हा बेसिनकडे पळतो. कफसिरप काम करत नाही तर मग काय करावं? बायकोला सांगावं का? नाही नकोच. तिची आवडती मालिका न लावता टीव्हीच्या रिमोटचा ताबा आपणच घेऊन अत्यंत निरंकुशपणे तिची इच्छा चिरडल्याच्या रागानं ती बेडवर जाऊन झोपलीय. नकोच तिला सांगणं म्हणत मी किचनकडे वळतो. मीठाच्या कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्या म्हणून लाईटरनं गॅस पेटवतो. हँडल ओढून किचनट्रॉलीतून छोटं पातेलं काढून गॅसवर ठेवतो. प्युअरेटच्या नळाची तोटी वर करून ग्लासभर पाणी घेऊन पातेल्यात ओततो.  हँडल ओढत अलमारीतून मिठाचा डबा काढतो. चुकटीदोन चुकटी मिठ पातेल्यातल्या पाण्यात टाकतो. पुन्हा किचनट्रॉलीतून चमचा काढण्यासाठी हँडल ओढताना लक्षात येतं की बाप रे! किती वस्तुंना हात लावला आपण? यांच्यावर आधीच कोरोना विषाणू बसलेला असेल तर? बायको फार काही काळजी घेत नाही आपली. बोललं की अंगावर धावून येते अन् तुम्हीच का नाही करत म्हणून टोमणेही मारते. तिच्या हातावरूनही विषाणू या हँडल्सवर बसू शकतो. अरे हो... हे पाणी गरम करण्याच्या नादात मी नाकातोंडाला कितीवेळा हात लावला? बापरे... चिंता खायला लागते. मी किचनओट्याशेजारच्या नळाखाली हात धुतो. ट्रॉलीतून सांडस घेऊन गॅस बंद करत पातेल्यातलं पाणी ग्लासात ओततो. गॅलरीत जाऊन इकडेतिकडे बघत गुळण्या करतो. किती मोकळी हवा आहे बाहेर! अहाहा! व्वा... एकदा यावं का बाहेर फेरफटका मारून?  पाच वाजलेत. ऊनही उतरलं. किती लोक फिरताहेत बिनबोभाट बाहेर? आपणच काय कुणाचं घोडं मारणार आहोत असा विचार करत  रूमालाला हात पुसतो. कोरोनाचा विचार पिच्छा सोडत नाही हे लक्षात घेऊन रूमालासह हॉलमध्ये येऊन पुन्हा सोफ्यात बसतो. मोबाईलवर फेसबुक उघडतो. सगळीकडे करोनाच करोना. करोनावरच्या विनोदी पोस्ट, कविता, घराबाहेर पडणारांना मुर्खात काढून शिव्या हासडत परिस्थितीचं गांभिर्य समजावून सांगत घरातच गपगुमान बसण्याची धमकीवजा विनंती करणा-या पोस्ट्स, मोदीचं गुणगान गाणा-या, मोदीला येड्यात काढणा-या पोस्ट स्क्रोल करत जातो. लाईक केलेल्या लोकसत्ता, लोकमत, सकाळ वगैरे पेजेसवरील ताज्या बातम्या डोळ्यांसमोर येत जातात. इटलीत एका दिवसात 800 पेक्षा जास्त लोक मेलेत. प्रेतं गाडीत सरपणासारखे रचून नेले. चिनपेक्षा अमेरिकेत कोरोना जास्त पसरलाय. मोदींनी 21 दिवस भारत लॉकडाऊन केलाय. फेरफटका मारायला घराबाहेर पडला आणि पोलिसांनी त्याची अशी जिरवली. पोरानं बापाचा मृतदेह मोटरसायकलवरून नेऊन केले अत्यंसंस्कार. लॉकडाऊनचा फायदा घेत सोळावर्षीय विद्यार्थीनीवर 10 जणांचा आळीपाळीनं बलात्कार. जमावबंदी असूनही अमुक ठिकाणी मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जमले नागरिक: गुन्हे दाखल. लॉकडाऊनचा फायदा घेत 60 वर्षाच्या आजीवर बलात्कार करू बघणा-याच्या जिभेचा आजीने पाडला तुकडा, काळाबाजारीसाठी नेत असलेल्या कोट्यावधी किंमतीच्या मास्कचा साठा जप्त. कुण्या रविशंकरचा मृतदेह उचलायला कोणीच न आल्यानं शेजारच्या मुस्लिम बांधवानी त्याची अंत्ययात्रा काढत केले अंतिमसंस्कार. अमुक अभिनेत्री कोरोनाग्रस्त - बॉलीवुड व राजकीय वर्तुळात खळबळ. फलान्या गावात भरदिवसा ट्रॅक्टरमधील धान्य व पीठाच्या गोण्यांची जमावाकडून लूट. बापाने अडीच वर्षाच्या मुलीचे प्रेत खांद्यावर नेत केले अंत्यसंस्कार. अमुकटमुक हॉस्पिटलमधून कोरोग्रस्त रूग्णाचे पलायन- शोधाशोध सुरू, मुलाच्या 13व्याला आईने केले मोफत 2000 मास्कचे वाटप,  घरातच बसा असे सांगणा-या पोलिसांवर केला गावक-यांनी हल्ला - गुन्हे दाखल. कंपन्या बंद केल्यानं,  बांधकामं बंद केल्यानं रोजगार नसलेले शेकडो मजूर कामगार निघाले पायीच घराकडे. खायलाप्यायला काहीच मिळत नसतानाही गावी जाण्यासाठी  हजारो मजूर उपाशीपोटी उतरले रस्त्यावर. शेकडो किमी पायी प्रवास. लॉकडाऊनची ऐसी की तैसी. संसर्ग पसरण्याचा वाढला धोका. इंग्लंडचे प्रिन्स , इंग्लंडचे पंतप्रधान व आरोग्यमंत्रीही करोनापॉझिटीव्ह. बारामतीत शेकडो प्रवाश्यांना सोडणा-या रिक्षाचालकाला झाला कोरोना, लोकांनी घरातच बसावे म्हणून रामायण, महाभारत, स्वराज्यरक्षक संभाजी, शक्तिमान या मालिका पुन्हा सुरू.  ट्रक, टँकरमध्ये जनावरांसारखे कोंबून अनेक मजूरांचा विनापरवाना प्रवास सुरूच, राज्यावर कोरोनामुळे कोसळलेल्या आर्थिक संकटाच्या भितीने जर्मनीतल्या अर्थमंत्र्याची आत्महत्या, लॉकडाऊनमुळे दारू प्यायला मिळत नाही म्हणून केरळमध्ये पाच तळिरामांची आत्महत्या, घरातला कर्ता माणूस गेल्यावर चार खांदे न मिळाल्यांनं दोन दिवस घरातच पडून कुजलेल्या प्रेतावर ग्रामसेवकाने केले अंत्यसंस्कार,  दिल्लीत स्टेशनसमोर हजारो परप्रांतीय घरी जाण्यासाठी ताटकळले, आधीच संकटात असलेल्या शेतक-यांना अवकाळी पावसाचा फटका, संत्री-द्राक्षांच्या बागांचं मोठं नुकसान, कलिंगडं उचलायला मजूर मिळेना, सोंगणी करून पडलेला गहू भिजला, लाखो रूपये खर्च करून मेहनतीनं पिकवलेल्या पिकाला बाजारापर्यंत नेण्याची व्यवस्थाच नाही. नेलं तर भाव नाही. कर्जबाजारी शेतकरी चिंताग्रस्त. कुण्या राज्यात पायी प्रवास करणा-या मजुरांना जंतुनाशकाने अंघोळ घालत केलं निर्जंतुकीकरण- सर्वत्र संतापाची लाट , मजुराला आपल्या दहा वर्षाच्या लेकराचा  मृतदेह 88 किमी पायी चालत हातांवरच न्यावा लागला वाहून. गावक-यांनी गावात येण्याच्या सगळ्या सीमा केल्या बंद - स्थलांतरीतांची होतेय हेळसांड,  नफेखोरी करणा-या दुकानदारांवर शासन करणार कारवाई. कोरोना विषाणू चिननेच निर्माण करून पसरवल्याचा अमेरिकेचा दावा, तिसरे महायुद्ध होणार? नागरिकांत नैराश्य पसरू नये म्हणून अमेरिकन यंत्रणेने नागरिकांना योग्य दक्षता घेत हस्तमैथुन करण्याची केली सूचना...... अशा एक ना अनेक बातम्या डोळ्यांसमोरून सरकत जातात. कोरोनाने मरणा-यांपेक्षा भुकेने, आजाराने मरणा-यांची संख्या जास्त असल्याचं लक्षात येतं.करोनानं मरणारे तर भाग्यवानच. शासकीय गाडी, अंब्युलंसतरी मिळते स्मशानभूमीपर्यंत. इतरांच्या प्रेतांची हेळसांड बघून, कामगार मजूरवर्गाचे हाल बघून माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. अश्रू गालांवर ओघळणार तोच मी ते हातातल्या रूमालानं पुसतो. पोटासाठी या राज्यातून त्या राज्यात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, या गावातून त्या गावात स्थलांतरीत झालेल्या आणि आता मालकानं हाकलून लावल्यानं पुन्हा पोटासाठी गावाकडे पायीपायी निघालेल्या मजुरांच्या हतबलतेशी तादात्म्य पावण्याचा मी प्रयत्न करतो. कोरोनाच्या सावटाखाली लॉकडाऊनच्या विळख्यात सुकलेल्या ओठांचं रक्ताळल्या पायांसह सैरभैर झालेलं त्यांचं विझुविझु झालेलं जग स्मरून मन विषण्ण होत जातं. गलबलून आल्यानं फुरफुरायला लागलेलं नाक मी रूमालानं  पुसतो. घसा पुन्हा खरखरायला लागलाय हे पुन्हा माझ्या लक्षात येतं. मी हात धुवायला बेसिनकडे पळतो. एव्हाना बायको उठलेली असते. हात धुताना बायकोला लाडात हाक मारत आल्याचा चहा करायला सांगतो. "तुम्हीच करा. माझं ऐकता का काही? साधी आवडती मालिका बघू देत नाही मला...... " तिच्या तोंडाचा पट्टा सुरू होतो तसा मी पुन्हा हॉलकडे पळतो. खरंच मला कोरोना तर झाला नाही ना? बायकोला आपली काडीचीही चिंता नाही म्हणत गुगलवर पुन्हापुन्हा कोरोनाची लक्षणं सर्च करत राहतो. कफ सिरप घेतो, कोमट पाण्याच्या गुळण्या करतो, आलं मिरी दालचिनी घालून उकळलेला चहा घेत राहतो. हळद टाकून दुध पीत राहतो. वारंवार हात धुत राहतो.

घरात सोशल डिस्टंसींग न पाळणा-या माझ्या मुलांवर मी वारंवार खेकसतो. बायकोसोबत वाद होणार नाही याची दक्षता घेतो. दररोज आपण आठदहा तास आणि मुलं सहासात तास घराबाहेर असताना तिला घरात असलेलं स्वातंत्र्य आता 24 तास सगळे घरीच असल्यानं हिरावल्या गेल्याचं समजून घेऊन अनेक दिवस असेच घरात काढावे लागणार आहेत हे लक्षात घेता मी प्रकरण सामोपचारानं सोडवण्याचा प्रयत्न करतो. मुलांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणत्या वेळी कोणतं काम करायचं याचा टाईमटेबल बनवायला सांगतो. मुलं मोठ्या मेहनतीनं तो पक्षपातीपणे बनवतात. त्यात हस्तक्षेप करून मी खास वेळ व्यायाम, वाचन, बातम्या व बायकोच्या मालिकांसाठी राखून ठेवतो. सर्वांनी तो कटाक्षानं पाळावा याकडे लक्ष देतो. अर्थात तो पाळल्या जात नाहीच. थोडीफार धुसपुसही सुरू राहते. मी समेट घालत राहतो.
मी घरातल्या घरात धावतो. हलकासा व्यायाम करतो. बायकोमुलांत रमण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासोबत चेस, कॅरम, चंफुल, अंताक्षरी... खेळतो. पुस्तकं वाचतो. जमेल तशी पुन्हापुन्हा टीव्ही पाहतो. लॉकडाऊनचं पालन न करणा-यांना साजुक शिव्या हासडत चरफडत राहतो. गावाकडे फोन करून आईवडिलांना, भावाबहिणींना, मित्रांना काळजी घेत कटाक्षानं घरातच रहायचं सांगतो. काही सकारात्मक बातम्याही येतात. मराठमोळ्या गर्भवती रणरागिणीने बनवली कोरोना चाचणी किट. अनेक कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण निगेटिव्ह होऊन घरी रवाना. टाटांकडून तसेच अनेकांकडून भारत व राज्यसरकारला कोरोनाशी लढण्यासाठी कोट्यवधी रूपयांची मदत. कोरोनामुळे मरणारांची संख्या फक्त 2 ते 3 टक्केच!  जरा बरं वाटतं. मी नाकाची, घशाची, माझ्या मुलांची काळजी घेतो. घरातल्या सगळ्या दारांच्या कडीकोंड्यांची डेटॉलच्या पाण्यानं वारंवार सफाई करतो. बायकोला कामात मदत करतो. व्हाट्सॅप, फेसबुक पाहतो. भारतासह जगभरातले कोरोनाग्रस्तांचे मृत्युंचे भराभर वाढणारे आकडे पाहत पॅनिक होत राहतो. हळहळतो.

माझी दाढी लोंबली आहे. डोक्याचे केस वाढले आहेत. घरच्या घरी दाढी करणं शिकून घेतलं असतं तर किती बरं झालं असतं या विचारात मी दररोज काही मिनीटं घालवतो. ज्यांना ते येतं त्यांचा मला हेवा वाटतो. सुस्कारा सोडत मी दाढी वाढवून नवा लुक स्विकारण्याचं ठरवतो. जास्तीत जास्त सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो. बेघरांसाठी प्रार्थना करतो. आहे त्या परिस्थितीत दिवस ढकलू लागतो.

बाहेर काहीही झालं तरी मी घरातच राहतो. मी जगावर आलेल्या या भयंकर संकटात एक सुजाण नागरिक बनून राहण्याचा, देशावर कोसळलेल्या या जीवघेण्या आपत्तीत देशाचा निस्सीम देशभक्त होण्याचा भाबडा प्रयत्न करत राहतो.

~ राजीव मासरूळकर

No comments:

Post a Comment