सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Thursday, 30 April 2020

खिडकी

खिडकी

विरंगुळा जगण्याचा आहे झाली खिडकी
विश्व नव्या इच्छांचे  साजुक व्याली खिडकी

देहाचे डोळे करतो अन् पाहत बसतो
चेटुक ओठांवरची दाहक लाली खिडकी

थेट नभाच्या घरातही डोकवता येते
खिडकीमध्ये खिडक्या घेउन आली खिडकी

रस्त्यावरचा मधाळ वारा खुणावतो, मग
लाजत लाजत हसू फुलवते गाली खिडकी

सूर गोडवा गंध गारवा सळसळ कातर
देत कवडसा सुखात एकट न्हाली खिडकी

क्षण दु:खाचे किती पचवले एकांती अन्
दबली आनंदाच्या ओझ्याखाली खिडकी

लग्न प्रेयसीसोबत झाले त्या घरट्याचे
म्हणून दिसते प्रसन्न त्याची साली खिडकी

झाली तर होऊ दे सगळी बंद कवाडे
एक असावी उघडी पण भवताली खिडकी

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि.30/04/2020

Wednesday, 29 April 2020

चंगळ

चंगळ

सुरूवातीचे काही दिवस
सहस्त्राक्ष अन् लक्षकर्ण होत
आम्ही चिकटून बसलो टीव्हीला
ब्रेकिंग न्युज झाल्यासारखेेच
मग व्हाट्सॅप, फेसबुक, युट्युब, टिकटॉक, इंस्टाग्रामवर
आळीपाळीने उड्या मारत
टाईमपास केला यथेच्छ
टाळ्या वाजवल्या, दिवे लावले, प्रार्थना केल्या
पुन्हापुन्हा किराणा भरला
पुन्हापुन्हा भाजीपाला आणला
व्यायामही केला जमेल तसा
साऊथ, बॉलीवूड, हॉलीवूडचे
अंगांगांगांगावर चालून येणारे
रग्गड सिनेमे बघितले
नेटफ्लिक्सवरच्या वेबसिरीज बघत
रियाज केला स्वत:तल्या क्रौर्याचा
रात्रंदिवस जमेल तशी
संधी साधत
कधी कंटाळलेल्या जीवनसाथीसोबत
तर ब-याचदा पोर्नस्वर्गसाईट्सवर
मिळवला हवाहवासा अघोरी ऑरगॅझम
गच्चीवर जाऊन न्याहाळल्या
इतरांच्या गच्चीवरल्या चुकचुकत्या चांदण्या
घरात मुद्दाम साठवून ठेवलेला
ईश्वरीय अमृतकुंभ संपवत
झिंगत राहिलोत काही दिवस
रात्रीबेरात्री गुपचूप घराबाहेर पडत
अधाशासारख्या फुंकल्या फकाफक सिगरेटी
एकदोनदा पार्श्वभागावर बसली जादूची कांडी
डोळ्यांसमोर प्रकटले
लक्षावधी लखलखते विषाणू
मग घरात असल्यानसल्या पुस्तकांत डोकं खुपसून बसलो
पोरांसोबत खेळत बसलो
चेस, कॅरम, चंफूल, पत्ते, अंताक्षरीसारखे पोरखेळ
आखाजीदिवाळीला करतात तशी
लखलखीत साफसफाई केली घराची
स्वत:च स्वत:च्या बटा (आय मीन जटा) सावरत
घोटून घोटून केला चकचकीत गोटा
गुळमुळीत कविता लिहिल्या,
आंबटचिंबट व्हिडीओज केले
चटकमटक पदार्थ बनवून खाल्ले
काही नव्याने शिकून घेतले
आदळआपट करत भांडी घासली
मरणयातना सोसत पायपीट करणा-या
बेघर मजुरांसाठी कळवळलो
ऋतूंचा द्रोह सोसणा-या
हतबल शेतक-यांसाठी अश्रू ढाळले
एका आदिम टोळीचेे आजीव सदस्य होऊन
दुस-या आदिम टोळीला शिव्या हासडल्या
सगळंसगळं केलं
अगदी भक्तीभावानं
आलटूनपालटून
उततमातत

तरीसुद्धा
मनमेंदूच्या सर्वशक्तिमान गारूडावर
फिरूनफिरून घिरट्या घालतच आहेत
भीती, नैराश्य, कंटाळा, वैफल्य, वैराग्याचे
थवेच्या थवे...

काम नाकारलेल्यांच्या
बेघरांच्या रांगेत
रहावं लागलं असतं आपल्यालाही उभं
तर.....?

किती दिवस करता येईल
अशी खाण्यापिण्याजगण्याभोगण्याची
परावलंबी चंगळ ...?

म्हणून
सतत जीवघेण्या संकटांच्या युद्धजन्य जबड्यात
अडकत चाललेल्या
वर्तमानांकित भविष्यात
हे बिचारं वैफल्यविषाणुग्रस्त हळवं मन
रमवावं तरी कसं
हा एकच प्रश्न
मला भंडावून सोडतोय.

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि.29/04/2020

Monday, 27 April 2020

सत्य



मी शोध घेत राहिलो
वारंवार शोध घेत राहिलो

अन् सापडल्या फक्त दोनच गोष्टी...

एक  :
देव नाही
म्हणून हे जग इतकं क्रूर आहे.

दोन  :
देव आहे
आणि तो खूप क्रूर आहे...!

~ राजीव मासरूळकर
    औरंगाबाद

Tuesday, 21 April 2020

चेहरा माझा खरा नाही दिसत ना?

गझल

पाहिजे आहे तसे नाही मिळत ना
जग तुम्ही आहे तसे आहे विकत ना?

फक्त दिसतो मीच सोशल मीडियावर
चेहरा माझा खरा नाही दिसत ना?

जायचे आहे घराबाहेर थोडे
पाय तुमचाही तरी नाही निघत ना?

मी कशी ही भूक मिटवावी स्वत:ची
आग आहे आग ही नाही विझत ना

हात कोणाच्या कसा हातात देऊ
व्हायरस देहातला नाही दिसत ना

श्वापदांना झोप सध्या येत नाही
माणसांचा प्लॅन तर नाही शिजत ना?

एक येते साथ आणिक जग बदलते
जग तसे स्वत: कधी नाही शिकत ना

काळजी घेतील रस्ते यापुढे ही
माणसे रस्त्यावरी नाही फिरत ना?

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि.21/04/2020

तो म्हणाला

तो म्हणाला,
जगावरचं हे संकट टळलं की
सगळं काही ठीक होईल.
मी म्हणालो, काय ठीक होईल?
तो म्हणाला, हे जे गरीब आहेत ना,
ते गरीब राहतील अन् हे श्रीमंत श्रीमंतच.

★  ★  ★

मी म्हणालो, पण हा सगळा खटाटोप कशासाठी?
तो म्हणाला, गरीबांना जगवण्यासाठी.
मी पुन्हा म्हणालो, पण गरीबांना का जगवायचं?
तर तो गंभीर होत म्हणाला, मग हे श्रीमंत कसे जगू शकतील?

★  ★  ★

तो म्हणाला, गरिबांचा विकास झाला पाहिजे.
मी म्हणालो, त्याने काय होईल?
तो म्हणाला, बाजार वाढेल.
मी पुन्हा म्हणालो, त्याने काय होईल?
तो छाती फुगवत म्हणाला, श्रीमंत आणखी श्रीमंत होतील.

★  ★  ★

मी म्हणालो, हे बिचारे गरीब
पिढ्यान् पिढ्या गरीबच का आहेत?
तो म्हणाला, त्यांना श्रीमंत होता येत नाही म्हणून.
मी कळवळून म्हणालो, त्यांना श्रीमंत कसं होता येईल?
तर तो हसत हसत म्हणाला,
ते गरीबांनाच श्रीमंत करू लागतील, तेव्हाच.

★  ★  ★

~ राजीव मासरूळकर

Saturday, 18 April 2020

क(रो)णा : विडंबन

(कुसुमाग्रजांची क्षमा मागून) विडंबन

क(रो)णा

'ओळखलंत का सर मला', दारात आला कोणी
कपडे नव्हते अंगावरती, होते डोळ्यांत पाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
'रस्त्यांवरती कुणीच नाही, सगळेच घरात काहून;
घरजावयासारखा भारतात आलो, मनासारखा नाचलो
मोदीजींनी लॉकडाउन केलं- एकटाच रस्त्यावर वाचलो
मंदिर गेले, मस्जिद गेले, बियर बार बंद झाले
प्रसाद म्हणून पोलिसांहाती दंडे तेवढे ठेवले
धर्म, राजकारण घेऊन संगे सर, आता लढतो आहे
भाजीबाजार हिंडतो आहे, बागेत प्रेमी शोधतो आहे.'

डेटॉलकडे हात जाताच हसत हसत उठला
'औषध नको सर, जरा एकटेपणा वाटला-
मोडला तुमचा संसार तरी मोडला नाही कणा
हृदयावरती कोरुन ठेवा फक्त न् फक्त करोणा.'

~ राजीव मासरूळकर
    दि.18/04/2020

किती तरी दिवसांत : विडंबन


(कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांची माफी मागून)

किती तरी दिवसांत
नाही रस्त्यावर गेलो
किती तरी दिवसांत
नाही उन्हात नहालो

खुल्या रस्त्यांची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि कोवळ्या उन्हाची
ऊब ओळखीची तीच

केव्हा तरी रस्त्यावर
पुन्हा जाईन निर्भय
शहरातल्या गर्दीत
होईन मी गर्दीमय

आज अंतरात भीती
खुळ्या कोरोनाची थोडी
आणि बाहेर पोलिस
अंगावर काठी तोडी

बरा म्हणून हा इथे
टुबीएचकेचा फ्लॅट
बरी न्यूजचॅनलची
जीवघेणी वटवट!

~ राजीव मासरूळकर

Friday, 17 April 2020

वैफल्यग्रस्त वर्तमानाचं मौन


डोक्यावर अळ्या पडलेली किळसवाणी जखम घेऊन
पिसाळल्या कुत्र्यागत किंचाळत
दिशाहिन फिरत असलेलं हे अतिरेकी वर्तमान
पकडता येत नाहीये मला शब्दात

मला अर्थ लावता येत नाहीये
एकाच वेळी
आपल्या लाडक्या मनुष्यप्राण्यासह
सगळं अस्तित्वच गिळंकृत करण्यासाठी
सतत आ वासून सज्ज असलेल्या
या अथांग भयावह विश्वाला
लिलया जन्माला घालणारे तथाकथित असंबद्ध ईश्वर
आणि
अवघं विश्वच एका क्षणात पायदळी तुडवण्यासही मागेपुढे न पाहणारी
स्वयंघोषित सर्वश्रेष्ठ बुद्धिमान उन्मादी मानवजात
का झाले आहेत आपापल्या
अत्यंत असुरक्षित तकलादू मातीमय बिळांत कुलूपबंद?

मी थकून गेलोय
समाज व सामाजिक या ऐतिहासिक युद्धखोर शब्दांचं
शवविच्छेदन करून करून
पण सापडू शकलेला नाहीय मला
त्याचा कालनियोजित आदीमोत्तर भविष्यवाही डीएनए

घराविषयीच्या काहुरभरल्या भयगंड भावनांचं
मनात उधानलेलं एकाकी हळवं वादळ
पोटातल्या जालिम जीवघेण्या आगडोंबावर मात करत
का निघालं असावं अनवाणी पायांनी
हजारो मैलांचं सामाजिक अंतर कापत...?
कुणी का कापले असतील इतक्या क्रुरपणे
हे सुंदर कुशल निर्मितीक्षम हात
एकाच अघोरी घावात....?
असे प्रश्न सध्या माझ्या मुर्दाड मनाला
आपलेपणानं स्पर्शही करू शकत नाहीयेत

हे  मास्क, सॅनिटायझर, लॉकडाऊन, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग, वगैरे वगैरे...
ही शाब्दिक दहशत का लादू पाहतेय
ऐतिहासिक गुलामगिरीतून नुकत्याच सावरलेल्या
माझ्या वैचारिक पंखफुटल्या समाजमनावर
एक अत्याधुनिक अस्पृश्यता....

माझ्या डोळ्यांसमोर पसरलाय इतका भयग्रस्त लख्ख प्रकाश
की मला दिसू शकत नाहीये
शेतावरून अमानुष यंत्र फिरलेल्या
लसलसत्या भाजीपाल्याचं हिरवं रक्त
आणि रस्त्यावर बेमौत चिरडल्या गेलेल्या
टंच टरबुजांचे लालभडक आगतिक अश्रू...

या निरस होत चाललेल्या बेचव जगण्याच्या
अळणी कविता लिहून
कुठली क्रांती घडवून आणणार आहे
माझ्यातला समाजवेडा कवी...?

एका अदृष्य विषाणूच्या दहशतीखाली
आपल्या प्रिय व्यक्तीला स्पर्श करून
प्रेम व्यक्त करायलाही घाबरणारा,
शहराच्या गल्लीबोळांतून गुरं  कोंबावीत तशी लेकरं कोंबून
अनेक पिवळ्याधम्मक स्कुलबसेसमधून गोळा करून
एकेका बेंचवर तीन तीन लेकरं बसवत
इंटरनॅशनल ज्ञान देणा-या महागड्या शहरी शाळेत
आपल्या लेकराला कसं पाठवावं
या विवंचनेत असलेला माझ्यातला भेदरलेला कवी
कसं लिहू शकणार आहे
नव्या युगाच्या स्वागताचं जाज्वल्य क्रांतिगीत....?

पण
क्रांतीबीज तर कधीचंच रूजत घातलं गेलंय मनामनात
आता कोणत्याही क्षणी फुटू शकतील त्याला
मानवतामुलक नवतेचे लुसलुशीत कोंब
हे अगम्य कालजेय ऋतुचक्रा, माझा हा भाबडा आशावाद खरा ठरव....!
या वैफल्यग्रस्त वर्तमानाचं मौनव्रत सोडवून
नव्या ऐक्यमय भविष्याची तुतारी फुंकण्याची
हीच तर योग्य वेळ आहे....!

~ राजीव मासरूळकर
    दि.17/04/2020
    औरंगाबाद

Wednesday, 15 April 2020

वेढा

आम्ही गडावर आहोत
एवढे दिवस गडावरच काढावे लागतील असं वाटलं नव्हतं
गनिम मोठ्या फौजेसह आमच्याकडे चालून येत आहे
ही बातमी लागताच
आम्ही आमच्या अभेद्य गडावर सुरक्षित पोहोचलोत
आमच्या हेरांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच
पण फितुरी काही कमी नाहीय आमच्या राज्यात
आम्हाला गडावरून सोडवण्यासाठी
असंख्य मावळे लावताहेत प्राणाची बाजी
कित्येक पडताहेत धारातिर्थी
पण काळाचं भान अन् परिस्थितीची जाण नसलेले
हे अज्ञानी फितूर उठले आहेत आमच्या मुळावर
आणि आता गनिम हजाराचे पाच लाख होऊन
घालत आहे गडाला वेढा
मावळे देतायत कडवी झुंज
करताहेत जखमींवर उपचार
घालताहेत बेघरांच्या तोंडी दोन घास
शोधताहेत गनिमी काव्याचे नवे मार्ग
फंदफितुरीच्या नादात रस्त्यावर उतरलेल्यांना
लावताहेत परतवून
पण
जीवनावश्यक चिरीमिरीच्या मोहात पडून
रयत अडकतच चाललीय गनिमाच्या जाळ्यात
धारातिर्थी पडलेल्यांच्या प्रेतांचा खच पडायला सुरूवात होतेय
गनिमाच्या धाकाने देता येत नाहीय
आपल्यांनाच मूठमाती
गडावरील जनता हवालदिल होत चाललीय दिवसेंदिवस
पण आम्ही हरलेलो नाहीयोत अजून
आम्ही स्वत: दक्ष आहोत
रयतेला सांगताहोत दक्षता घ्यायला
गडावर राहून का होईना पुरवतो आहोत आवश्यक ती रसद
गरजू युद्धग्रस्तांपर्यंत
आणि मुख्य म्हणजे वाढवतो आहोत त्यांचं मनोबल
जमेल त्या पद्धतीनं...

तरीही
धर्म, राजकारण आणि विनाकारण फिरणारे फितुर
यांच्यापुढे आम्ही होत आहोत हतबल
या हतबलतेनं आमच्या अभेद्य गडाचाही
उडतोय थरकाप
पण आम्ही घाबरणारे नाहीयोत...

लढाई सुरूच आहे
आम्ही जिंकून दाखवूच.....!

~ राजीव मासरूळकर
    औरंगाबाद
    दि.15/04/2020



Saturday, 11 April 2020

भयंकराच्या पलिकडे

भयंकराच्या पलिकडे
असू शकतं महाभयंकर
अन् अलिकडे
सुंदर

महाभयंकराच्याही पलिकडे
असू शकतं अतिसुंदर
अन् अलिकडे
भयंकर

आपण कुठे उभे आहोत
इतकंच शोध
अन् कामाला लाग.

~ राजीव मासरूळकर
    दि.10/04/2020

Saturday, 4 April 2020

पेराल तेच उगवेल

             लॉकडाऊनमुळं संपूर्ण भारत घराघरात कोंडला गेला आहे. शाळा-महाविद्यालयं बंद असल्यानं औपचारिक शिक्षण बंद आहे, परंतु अनौपचारिक शिक्षण अव्याहत सुरू आहे. भारतातील अंदाजे 75% कुटुंबांकडे टीव्ही आहेत. फेब्रवारी 2020 च्या एका अहवालानुसार भारतातील सुमारे 40 कोटी लोक whats app वापरतात. सुमारे तेवढेच लोक फेसबुक वापरतात. ग्रामीण भागातील सुमारे 90% कुटुंबांकडे मोबाईल फोन्स आहेत. यावरून असं म्हणता येतं की 0 ते 6 वयोगटातील बालकं (सुमारे 10 ते 15%%) वगळली तर उर्वरीत 85 ते 90% जनता घरात (अत्यावश्यक सेवेतील लोक घराबाहेर वेळ मिळेल तेव्हा) टीव्हीवरील न्युज चॅनल्स पाहून, व्हाट्सॅप-फेसबुकवर वाचून, चर्चेत सहभागी होऊन, 6 ते 18 वयोगटातील मुलं बातम्या पाहून, घरातील चर्चा ऐकून- चर्चेत सहभागी होऊन देशातील एकूणच परिस्थितीबाबत माहितीचं देवाणघेवाण करत आहेत, आपापली मतं बनवत आहेत. दुस-या शब्दांत सांगायचं तर भारतातील सुमारे 85 ते 90% मेंदुंचं वैचारिक/बौद्धिक पोषण सध्या मिडीया व सोशल मिडीयाच्या माध्यमातून होत आहे. (वाचन व तत्सम बाबींचा अपवाद आहेच.)
                पेराल तेच उगवेल ही म्हण माणसांच्या बाबतीतही 100% लागू पडतेच हे कुणीही अमान्य करणार नाही. म्हणूनच लॉकडाऊनच्या या चिंताग्रस्त काळात औपचारिक शिक्षण बंद असल्यामुळं अनौपचारिक शिक्षण देणा-या पालक, मिडीया व सोशल मिडीयाची जबाबदारी किती वाढली आहे हे लक्षात येईल. या काळात  मनामनावर जे जे बिंबवलं जाईल, ते ते मनात घट्ट बसून कोरोनासंकट निवळल्यावर विचार म्हणून, संस्कार म्हणून आज घरात बसलेल्या 6 वर्षाच्या शिक्षणक्षम बालकांपासून वयोवृद्धांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहू शकतं. या काळात घडणा-या घटना, झडणा-या चर्चा गांभिर्यपूर्वक ऐकणा-यांपैकी  किमान 50% लोकांच्या मनाततरी त्या कायम घर करून राहण्याची शक्यता आहेच आणि त्याचा सर्वांच्या भविष्यावर काहीएक परिणाम निश्चितच होणार आहे.
                ही शक्यता जर खरी वाटत असेल तर सर्वांना यावर गांभिर्यपूर्वक विचार करण्याची गरज आहे हे मला सांगायचं आहे. मिडीयापर्सन्सनी व सोशल मिडीया वापरकर्त्यांनी, पालकांनी बातम्या, घटना, घोषणा, इत्यादीबाबत तर्कशुद्ध विचार करूनच, खात्री करूनच चर्चा करावी. घराघरातल्या बालकांच्या, युवकांच्या मनात कुणाविषयीही द्वेष निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. कोरोनासारखी संकटं
येतील, जातील, पण भारतासारख्या खंडप्राय देशाच्या ऐक्यासाठी संकट निवळल्यावरही शांततामय जनजीवनासाठी आताच काळजी घेणं महत्त्वाचं आहे हे नाकारून कसं चालेल?

(आणि हो, कोरोनाचं जागतिक संकट निवळल्यानंतर संपूर्ण जगाला जणू नवजीवन प्राप्त होणार आहे. नवं युगच अवतरणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातील आपल्या राजकीय भूमिका भावी नवयुगावर नव्या संकटाचं सावट निर्माण करणार नाही यावर विचारमंथन होणंही अतिआवश्यकच.)

~ राजीव मासरूळकर

Thursday, 2 April 2020

विंचू आपण


जरी न लिंबूटिंबू आपण
सागरातले बिंदू आपण

युद्ध आपले सुरू स्वत:शी
ठेवू संयम, जिंकू आपण

इतरांचा का ठेका घ्यावा
स्वत: स्वत:ला निंदू आपण

माणसास, धरतीला डसतो
भुजंग आपण विंचू आपण

एकांतातच पटते ओळख
शोधू अत्तर, शिंपू आपण

~ राजीव मासरूळकर