सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Monday, 25 May 2020

वारी

दिंडी निघाली आहे पायी
दोनचार कच्च्याबच्च्यांच्या
एकदोन पिकल्या जीवांची पालखी करून
आयुष्याचं वृंदावन डोक्यावर घेत
कोसो दूर...

विटलेल्या लक्तरांच्या असंख्य पताका लोंबकळताहेत क्षीणपणे
स्वत:च्या जात, धर्म, पंथाची ओळख
उघडी पडू नये
याची काळजी घेत

दिंड्या निघाल्याहेत चहुबाजूंनी
अंधाराची, उजेडाची , ऊन, वारा, पावसाची
भुकेचीही तमा न बाळगता
सरकताहेत पुढे पुढे पुढेच
अबीर... गुलाल उधळण्याइतकी शक्ती उरलेली नाहीय
कुठल्याच हातात
मात्र थकल्याभागल्या अवस्थेतही
स्वाभिमानी जिद्दी पाय
तप्त रस्त्यांवर उमटवत आहेत
आत्मनिर्भर रक्ताचे लालबुंद ठसे
काळमार्गावरील मैलाचे दगड ठरत...

दरवर्षी असायचेच हमखास
इथेतिथे खुणावणारे हवेहवेसे मुक्काम
पण यावेळी मात्र रद्द झाले आहेत मधले सगळे मुक्काम
ठरलेल्या एकमेव मुक्कामाकडे
वारी करीत आहे  बेधडक मार्गक्रमण
अधुनमधुन रंगत आहे
श्वासांच्या उभ्या आणि गोल रिंगणांचा अनुपम्य सोहळा
प्राणांचे प्रकाशवेडे अश्व
सजूनधजून उधळत आहेत चौखूर
हे असं रिंगणात उधळणं
म्हणजेच रिंगणातून खरी सुटका...
हे कळून चुकलंय
सगळ्याच अश्राप वारक-यांना

वारीचं हे आगळंवेगळं रूप अनुभवताहेत
वारीचा जिवंत अनुभव नसलेले असंख्य बिचारे लोक
घरबसल्या लोळत आळसावत साग्रसंगीत

ही वारी जातेय एखाद्या गडगंज किर्तीवंत तिर्थक्षेत्राकडे
असं म्हणावं
तर त्यांचे सर्व दरवाजे झालेयत कधीचेच कडेकोट कुलुपबंद...
ही वारी निघालीय
गाव नावाच्या तिर्थक्षेत्रातल्या
घर नावाच्या मंदिराकडे...

वारकरी करताहेत प्रचंड घाई
त्यांना पोहोचवायची आहे आपापली दिंडी
गंतव्यस्थळी वेळेत
गाभा-यातली महापूजा अनुभवण्यासाठी!

मात्र
महापूजा होणार की नाही
झालीच तर करणार कोण
हे काही ठरता ठरत नाहीये....!

~ राजीव मासरूळकर
   दि.25 मे, 2020
   औरंगाबाद

Sunday, 17 May 2020

मोक्ष


कातरवेळ संधी देते
आणि ते आत येतात
भटकभटक भटकतात
जमेल तसं गुणगुणतात
मिळेल तसं पोट भरतात
रात्र बंद करून घेते दरवाजा अचानक
हवा यावी
आणि हवं तेव्हा स्वप्नांचं चांदणंही बघता यावं
म्हणून खिडकी तेवढी ठेवते उघडी
जाळीदार झडप घट्ट लागल्याची खात्री करून घेत.
मग कसलीशी कळ दाबून रात्र जाते झोपी
मग बदलत जाते तिथली हवा क्षणाक्षणाला
अन् गुदमरू लागतो त्या आगंतुकांचा जीव
होऊ लागते प्रचंड दमछाक
भीतीचे महाकाय मेघ दाटून येतात
सुरू होते मार्गांची शोधाशोध
अन् अखंड धावपळ
जाळीवर मारून होतात हजार टकरा
मार्ग तर दिसत असतो स्पष्टपणे
पण भेदता येत नाही काही केल्या
तरीही सुरूच राहतो अविरत संघर्ष
ताजीतवानी होऊन जेव्हा येते पहाट
आल्हाददायक खिडकीत
तेव्हा तिला दिसतात
जाळीला लटकलेले काही किडकिडीत मृतदेह
दिसतात अद्यापही जाळीशी झटत असलेले काही आशावादी जीव
त्यांचे होऊ नये अधिक काळ हाल
म्हणून आपल्या लांबसडक सराईत नाजूक बोटांनी
ती जाळीवरच टाकते त्यांना चिरडून
आणि बघत बसते हतबल जीवांना मोक्ष दिल्याच्या आनंदात
पूर्वेकडून उगवत असलेल्या नव्या सूर्याकडे
लोभसपणे!

राजीव मासरूळकर
दि.17/05/2020
औरंगाबाद

Saturday, 16 May 2020

ती म्हणजे


#लॉकडाऊनमध्ये_आलेला_लॉकअप_डे

ती म्हणजे

प्रेम हक्क अन् त्याग वगैरे ती म्हणजे
एक सुगंधी बाग वगैरे ती म्हणजे

दिवसदिवसभर जरी मला ती आठवते
रात्ररात्रभर जाग वगैरे ती म्हणजे

दोन क्षणांनी सरतो मागे पण येतो
नाकावरचा राग वगैरे ती म्हणजे

श्रावण ओलाचिंब कधी तर कधी शिशिर
रंग उधळता फाग वगैरे ती म्हणजे

ती म्हणजे चाहूल जणू सुख येण्याची
आयुष्याचा माग वगैरे ती म्हणजे

~ राजीव मासरूळकर
    दि.14 मे, 2020
    #लग्नाचा_वाढदिवस_वगैरे

कवी कविता लिहिताहेत

कवी कविता लिहिताहेत
कवी भरमसाठ कविता लिहिताहेत
भरमसाठ कवी भरमसाठ कविता लिहिताहेत
का लिहिताहेत कवी भरमसाठ कविता?

ज्येष्ठ प्रथितयश पुरस्कारप्राप्त साहित्यिक
समाजमाध्यमावर येऊन पाहताहेत
की भरमसाठ कवी भरमसाठ कविता लिहिताहेत
आणि मुख्य म्हणजे तोंड वर करून पुन्हा पुन्हा live सादरीकरण करून का मांडताहेत उच्छाद?
हे हौसेनवसे कवी का इतक्या कविता लिहून बदनाम करीत आहेत कवीकुळाला?
दररोज हजारो लोक किड्यामुंग्यांसारखे मरत असताना
मुकाट आसवं गाळत श्रद्धांजली अर्पण करत बसण्याऐवजी
घरात बसून का लिहिताहेत हे कवी उथळ वगैरे कविता?
या हौशानवश्यांच्या कवितांमुळे
चांगल्या कवितेचं होत असलेलं प्रचंड नुकसान
अस्वस्थ करीत आहे पुरस्कारप्राप्तवगैरे प्रस्थापित साहित्यिकांना..

समीक्षक पडले आहेत भयंकर पेचात
की का लिहित असावेत कवी भरमसाठ कविता?
का लिहिताहेत हे वेडे लोक हातोहात
डॉक्टर्सवर, पोलिसांवर, मजूरांवर, राजकारण्यांवर, दात्यांवर, प्राणीपक्ष्यांवर, निसर्गावर
सर्रास सहजसुलभ कविता?
का करीत आहेत दीर्घकाळापासून घराघरात कोंडलेल्या
हवालदिल हतबल सामान्य रसिकांचं
उठल्याबसल्या live येऊन मोफत मनोरंजन?
या संख्यात्मक वाढीचा किती जबरदस्त फटका बसेल आपल्या अभिजात वगैरे भाषेला?
स्वत:च्या घरात दाळदाणा असो नसो
संकटग्रस्तांना घरोघरी जाऊन मदतीचा हात देण्याऐवजी,
घरात स्वस्थ बसून टीव्हीवर सतत मृत्यूचा सोहळा
निर्विकारपणे बघत बसण्याऐवजी
का लिहिताहेत कवी लोकांच्या वेदनेवर, मरणावर इतक्या कविता?
थांबवायचं तरी कसं या जमेल तसं सरळसरळ लिहित्या हातांना
या प्रश्नाने पार भंडावून सोडलं आहे  काळामागे धावताना प्रचंड दमछाक होत असलेल्या समीक्षकांना

वृत्तपत्र, नियतअनियतकालिकांचे संपादक
विभिन्न प्रकारची पुस्तकं छापणारे प्रकाशक विचारताहेत
की का लिहिताहेत हे भरमसाठ कवी भरमसाठ कविता?
वृत्तपत्र, नियतकालिकं , पुस्तकं घरोघर पोहोचवण्यावर निर्बंध असताना
वाचक मिळण्याची शक्यता नसताना
का विनाकारण लिहिताहेत कवी इतकी सडकछाप कविता?
आम्ही छापतो त्यांची कविता न वाचता
का वाचाव्यात, पहाव्यात संकटग्रस्त रसिकांनी
या हौशानवश्या कवींच्या हलक्याफुलक्या, आक्रोश मांडणा-या, वेदना देणा-या चिल्लर कविता?
समाजमाध्यमांसारख्या आभासी जगात कविता व्हायरल करून
का आपला वेळ आणि उर्जा वाया घालवत आहेत हे असहाय जीव?

कवी स्वत:ही संभ्रमात आहेत
कि का लिहिताहोत आपण इतक्या कविता?
शक्य तितकी मदत केली
शक्य त्यांना आधार दिला
शक्य तितका ब्रेकिंग न्युजचा भडिमार सोसला
शक्य तितकं गुपचूप गुदमरत बसलोत घरात
सगळं जग घरात बसलेलं असतानाही
का घडताहेत बाहेर या प्रचंड हालचाली?
का जाताहेत हकनाक असंख्य निष्पाप जीवांचे बळी?
का पसरलं आहे घराघरांवर मृत्यच्या भयाचं सावट?
का नाही थांबत आपली वेदनादायी विचारप्रक्रिया?
का आपलं हळवं मन प्रवृत्त करतंय आपल्याला वारंवार
कविता लिहायला?
याच विचारचक्रातून कवी पुन्हा लिहायला बसले आहेत कविता
आणि कदाचित विचार करताहेत पुन्हा live येऊन
आपण अद्यापही जीवंत असल्याचा पुरावा देत
चारचौघांना जीवंत असल्याचा अनुभव देण्याघेण्याचा

सध्या सर्वत्र एकच जोरदार चर्चा आहे
की कवी भरमसाठ कविता लिहिताहेत.

~ राजीव मासरूळकर

Monday, 11 May 2020

सामना


अखेर
रंगला आहे
पोट आणि मृत्यू यांच्यात
एक अटीतटीचा अंतिम सामना

सामना...
घास मिळवण्याचा!

सामन्याने गाठले आहे
इतके रोमांचक शिखर की
पंचही विसरून गेले आहेत स्पर्धेचे कडेकोट नियम
आणि बघत बसले आहेत बेभान होऊन
कोण कुणाचा घास घेतो ते...

गोंधळभरल्या कोलाहलाच्या चित्कारांत
विरून गेले आहेत निस्तेज आवाज
फाऊल.. हाऊज दॅट आणि निषेधांचेही

मनात असीम उत्कंठा ठेवून
प्रचंड अस्थिरतेचा प्रेक्षक होत
मी ही बसलेलोच आहे
सामन्याच्या अंतिम क्षणाचा आस्वाद घेण्यासाठी
अधाशासारखाच...!

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि.11 मे, 2020

Wednesday, 6 May 2020

कवी


कवी कसा दिसतो हे कुणालाच माहित नाही
कवी शोधूनही अगदी कुठेच सापडत नाही
त्याच्या पत्त्यावरही सापडत नाही त्याचं घर
तिथे सापडतात फक्त
त्याच्या चुकल्याहुकल्या फेकून दिलेल्या काही निष्पाप ओळी
सापडतो एखादा पाळीव प्राणी
त्याने आधीच त्यागलेल्या पाळीव इच्छांचं पालन करणारा
एखादवेळी सापडू शकते
कविता लिहिण्यात मग्न कवीकडे
तासन् तास मुग्धपणे पाहत बसणारी
त्याची लुब्ध प्रेयसी
खरं सांगायचं तर तिलाही कवी कधीच सापडलेला नसतो
कवी कसा दिसतो हे तिलाही माहित नाहीच
कवीच्या घरात
कवी राहत असल्याच्या इतर कुठल्याच खाणाखुणा नाहीत
दारावर एखादी चमकदार पाटीही डकवलेली नाहीय
त्याच्या रुबाबदार वगैरे नावाची

कुठल्याच कार्यालयात उपलब्ध नाही
कवीच्या जन्माचा दाखला

ही कविता त्यानेच लिहिली आहे
कि कुणी खपवली आहे त्याच्या नावावर
स्वत:चे विचार घराघरात पोहोचवण्याच्या उदात्त हेतूने
नकळे

की
हा कवी
आणि त्याची ही कविता
निव्वळ एक थापच आहे?

~ राजीव मासरूळकर
   दि.06/05/2020
   औरंगाबाद

Saturday, 2 May 2020

घोषणा


त्यांनी सांगितलं
भूकंपाचे झटके जाणवले की लगेच घराबाहेर पडा
मी घराबाहेर पडून मोकळ्या जागी आलो

त्यांनी सांगितलं
समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळणार आहेत
मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये
मी टाकला माझ्या बोटीचा नांगर
अन् सुरक्षित पोहोचलो किना-यावर

त्यांनी सांगितलं
त्सुनामी येणार आहे
समुद्रकिना-यावरची सगळी गावं रिकामी करा
मी समुद्रकिना-यापासून कोसो दूर असलेल्या
माझ्या मूळ गावी जाऊन
सुरक्षित जगू लागलो

त्यांनी सांगितलं
तुमच्या शहरात शिरला आहे भयावह कोरोनाव्हायरस
शहराच्या सर्व सीमा बंद करून
घोषीत केली गेलीय कडकडीत टाळेबंदी
मुळीच घराबाहेर पडू नका
मी माझा इवलासा पापभिरू जीव मुठीत धरून
शहरातल्या घरातच
दबा धरून बसलो आहे....

आता
मला राहून राहून आठवण येतेय
भूकंप, वादळ, त्सुनामीवेळच्या
कल्याणकारी करूणामय घोषणांची !

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद
   दि.02/05/2020

Friday, 1 May 2020

पैलू

खोदू लेण्या मंदिर बांधू
ताजमहल अन् स्तूप उभारू
पिरॅमीड ते बुर्ज खलिफा
चढवू मजले, पुट्टी मारू

उचलू ओझे मारू रंधा
लावूनिया खांद्याला खांदा
जगास अवघ्या पैलू पाडू
खात भाकरी चटणी कांदा

डोंगर फोडू काढू रस्ता
वेचू कापुस, बनवू गाठी
यंत्र चालवू, नाल्या काढू
होत मायबाबाची काठी

करू इमानेइतबारे जे
मालक सांगे दमदाटीने
हलगर्जी वा चूक एकही
रस्ता घरचा मत्त सहीने

हातावरचे पोट आपले
डोक्यावर संसारगठोडे
जमेल तितके सहन करू पण
अति झाले तर लावू घोडे

काळ परीक्षा घेत राहतो
बनू संयमी हिंमत दावू
येणारे युग अपुले आहे
मन, मेंदू परजूया बाहू

~ राजीव मासरूळकर
   दि.01/05/2020