कातरवेळ संधी देते
आणि ते आत येतात
भटकभटक भटकतात
जमेल तसं गुणगुणतात
मिळेल तसं पोट भरतात
रात्र बंद करून घेते दरवाजा अचानक
हवा यावी
आणि हवं तेव्हा स्वप्नांचं चांदणंही बघता यावं
म्हणून खिडकी तेवढी ठेवते उघडी
जाळीदार झडप घट्ट लागल्याची खात्री करून घेत.
मग कसलीशी कळ दाबून रात्र जाते झोपी
मग बदलत जाते तिथली हवा क्षणाक्षणाला
अन् गुदमरू लागतो त्या आगंतुकांचा जीव
होऊ लागते प्रचंड दमछाक
भीतीचे महाकाय मेघ दाटून येतात
सुरू होते मार्गांची शोधाशोध
अन् अखंड धावपळ
जाळीवर मारून होतात हजार टकरा
मार्ग तर दिसत असतो स्पष्टपणे
पण भेदता येत नाही काही केल्या
तरीही सुरूच राहतो अविरत संघर्ष
ताजीतवानी होऊन जेव्हा येते पहाट
आल्हाददायक खिडकीत
तेव्हा तिला दिसतात
जाळीला लटकलेले काही किडकिडीत मृतदेह
दिसतात अद्यापही जाळीशी झटत असलेले काही आशावादी जीव
त्यांचे होऊ नये अधिक काळ हाल
म्हणून आपल्या लांबसडक सराईत नाजूक बोटांनी
ती जाळीवरच टाकते त्यांना चिरडून
आणि बघत बसते हतबल जीवांना मोक्ष दिल्याच्या आनंदात
पूर्वेकडून उगवत असलेल्या नव्या सूर्याकडे
लोभसपणे!
राजीव मासरूळकर
दि.17/05/2020
औरंगाबाद
No comments:
Post a Comment