सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Friday, 12 February 2016

गझल: प्रलय

वाढता कामा नये नुसतेच वय
रोज यावा जीवनामध्ये प्रलय

भेट आयुष्यात केवळ एकदा
अन्यथा होइल तुझीसुद्धा सवय

दे तुझ्या हृदयातले ठोके मला
मी तुला कवितेतली देईन लय

नाचतो डोक्यावरी उद्धटपणा
थेट हृदयाला भिडत असतो विनय

कोण गॅरंटी जगाची घेतसे
आज नाही तर उद्या आहे विलय

~राजीव मासरूळकर
  दि.12/02/2016
  सकाळी 06:00 वा
  सावंगी, औरंगाबाद

Monday, 8 February 2016

गझल: माणूस

गझल
सांग खरे की निखळ सुखाने कितीक हसतो माणुस
स्वत:स फसवत फसवत हसतो म्हणून फसतो माणुस!

क्षणोक्षणी मरतो पण जगतो पुढचा क्षण जिद्दीने
कोणत्या चिवट सहनशील धातूचा असतो माणुस?

रहावयाला कुणास जागा सुईएवढी नाही
अन् एखादा विश्वभराच्या मनात वसतो माणुस!

निवांत बसणे कुठे कुणाच्या नशिबामध्ये असते
म्हणून मित्रांसोबत सायंकाळी 'बसतो 'माणुस!

पुस्तकात कोंबून ठेवणे शक्य कुणाला आहे
पुस्तकातल्या शब्दांइतका लहान नसतो माणुस!

साप कधी बघतो का पुढचे कोण जनावर आहे?
डूख धरुन पण माणसास ठरवूनच डसतो माणुस!

कधी कधी या माणसास काडीची किंमत नसते
कधी कधी या पृथ्वीच्या मोलाचा असतो माणुस!

~राजीव मासरूळकर
   मासरूळ ते औरंगाबाद प्रवास
   दि.07/02/2016
   19:30 वाजता

Wednesday, 3 February 2016

तरू आपले आपण


तरू आपले आपण

सूर्य बुडाया लागतो
कोण धरायला येतो?

चंद्र घटे दिनोदिनी
अश्रु कुण्या ये नयनी?

आप्त स्वर्गवासी होतो
कोण त्वरे मागे जातो?

फूल पायासी सडले
काय देवासी पडले?

ज्याचा त्याला पुरे ताण
तरू आपले आपण....!

~राजीव मासरूळकर
  दि.3/2/2016
सोयगाव, औरंगाबाद

Tuesday, 2 February 2016

एक आठवण


एक आठवण

सांज जाहली
अजून आई
घरी परतुनी
कशी न आली ?

हृदयी माझ्या
व्याकुळ हुरहुर
काहुर वादळ
लाटा गहिवर
क्षितिज आंधळे
वाटा विव्हल
पक्षी चिंतित
वारा जर्जर !

हजार चकरा
घरी अंगणी
अबोल झाडे
कातर गाणी !

चूल पेटवुन
वरण घालता
भरले डोळे
भय अश्रुंनी
मनास समजुत
गेलो घालून
धुपटामध्ये
असेच होते

वैरी मन हे
स्वतःस सोलत
लाखो शंका
बसले काढत -
शेतामध्ये
साप चावला
नसेल ना तिज ?
वाघ लांडगे
की वैऱ्‍याने
घात न केला
कुणास ठावे ?
की वाटेच्या
काठावरच्या
विहिरीमध्ये
असेल पडली. . . . . . ?
अधीरतेने
सुटलो धावत
शेताकडच्या
वाटेवरुनी
विहिरीमधल्या
अंधाराला
डोकावुन मी
बघू लागलो
चार चांदण्या
डोळ्यांमधल्या
उदासवाण्या
गळून पडल्या
त्या अंधारी . . . . .

तेवढ्यात वळ
पायावरती
उठला मोठा
"मेल्या मुडद्या
मरायचय का ?
पुस्तक सोडुन
कशास आला
विहिरीकाठी
तडफडायला ?",
पाठीवरती
दोनचार वळ
अजून उठले
तसाच वळुनी
गळ्यात पडलो
बराच रडलो
ओक्साबोक्सी
गहीवरुन ती
मला म्हणाली,
"चुकलं माझं
बघु दे, बघु दे
कुठं लागलं ?"
पायांवरचे
पाठीवरचे
काठीचे वळ
बघून आई
देत राहिली
स्वतःस दूषण !

मी का रडलो
तिला न कळले
तिला पाहता
काहुर शमले
हृदयी बहरुन
गेली जाई
जिवंत होती
साधी भोळी
प्रेमळ सोज्वळ
माझी आई !

- राजीव मासरूळकर

पाऊस

पाऊस

थेंब थेंब प्रेमाचे घेउन येतो पाउस
स्पर्श सुखाचे हळवे देउन जातो पाउस !

विरहचांदणेठिबकत येता गालावरती
मिठीत घेउन अलगद चुंबुन घेतो पाउस !

शेतपिकांच्या पानोपानी दंवासारखे
सहवासाचे गीत दिवाने गातो पाउस !

स्वार्थामध्ये गढूळ होता नातीगोती
एकांतातच दुरात जाउन झुरतो पाउस !

अंगावरुनी ओघळून जाते ते पाणी
भिजणाऱ्‍याच्या उरात कायम उरतो पाउस !

- राजीव मासरूळकर
मासरूळ , ता जि बुलडाणा

सांज होताच येते तुझी आठवण

गीत

सात जन्मांतली दिव्य ही साठवण
सांज होताच येते तुझी आठवण

भेट होते तुझी सांजवा-यातुनी
लाभते मन्मना प्रीतसंजीवनी
नाचती छनछनन सांजवेडे चरण

तो तुझा स्पर्श अन् ती तुझी चुंबने
ती मिठी त्यातली धुंदशी स्पंदने
तो विरह ती मजा स्वप्नवत ते वचन

कोण गातोय क्षितिजावरी गीत हे
मी तुझा शोध शब्दांतुनी घेतसे
प्रीत ओसांडुनी लाल होती किरण

मी कपाळावरी कोरला तव ठसा
मोडला डाव अर्ध्यावरी तू कसा
ही जखम अंतरी भळभळे आमरण

~ राजीव मासरूळकर
    सिल्लोड दि.25/4/15
    सायं7:30 वा'

पीक

पीक

कोरडवाहू शेतीमधल्या
करपून गेल्या पिकासारखा
तुझा चेहरा सुरकटलेला...
पिकवूनही घासास पारखा...

अंगावरल्या बंडीमधला
विटून गेला धागा धागा
पायांवर गोंदवून नक्षी
नशीब झाल्या स्थावर भेगा....

पाऊस केवळ डोळ्यांमध्ये
येतो वांझपणाचा रिमझिम
नंतर दुष्काळाचा हृदयी
मुक्कामच ठरलेला कायम...!

बैलमनाला अन्यायाच्या
वखराला जुंपुन ठेवावे
कर्जबियाणे व्याजसरीतुन
उधळत झाकत पेरत जावे
दगड भिरकवावा मोठासा
स्वप्नकल्पनापक्ष्यांवरती
पोटाला लावावे गोटे
भरुन बिडीने घ्यावी छाती...........

असा तुझा दुर्मुखला दिनक्रम
सहज सुखेश्वर दुर्लक्षिततो
अश्रुंविण ये दु:खाचे पिक.....
काळाविण वेळेची टिकटिक.........!

~राजीव मासरूळकर

Monday, 1 February 2016

झोपा आता


झोपा आता.....

थकले विटले असाल दिनभर, झोपा आता
ओढून घ्या दु:खाची चादर, झोपा आता

रातपावले भूरळ घालती भरबाजारी
आयुष्यच बाजारू खेटर.... झोपा आता!

स्वप्नांचा धुरळा झालेला बघता दिवसा
सुख स्वप्नांचे भोगा मनभर, झोपा आता!

यंत्रालाही हवीच थोडीशी विश्रांती
यंत्र न होतो तोच खरा नर, झोपा आता!

आभाळाला लख्ख लगडल्या लाख चांदण्या
एक चांदणी तुम्हास सादर.... झोपा आता!

मरमर मरमर मरता फिरता कितीक वाटा..
मरणे अंती एक धरोहर.... झोपा आता!!

~राजीव मासरूळकर
 

अवतार घे

अवतार घे

नको गुंतवू पुस्तकातच स्वत:ला
सभोतालचा सार, संस्कार घे
किती दु:ख, दारिद्र्य वसते इथे तू
श्रमातून सोशीक आकार घे
नवे ज्ञान, विज्ञान घे सोबतीला,
तमोद्धार करण्यास अंगार घे
नको वाट पाहू कुण्या ईश्वराची,
तुझा तू इथे दिव्य अवतार घे....!!!

~राजीव मासरूळकर
  सोमवार, दि.25/01/2016
  सकाळी 11:20 वाजता
  सोयगाव, जि. औरंगाबाद